



Konkan Railway: मुंबई मडगाव वंदेभारत एक्सप्रेसचा मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता कर्नाटक राज्यातून होत आहे. मात्र या मागणीला महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रवासी संघटनांनी आपला विरोध दर्शवला आहे. कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे.
सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे. त्यामुळे ती बंद करण्याची नामुष्की येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र कर्नाटक राज्यातील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी बंद न करता तिचा रेक वापरून 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी पुढे मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली आहे.
मात्र महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सध्या जवळपास आपल्या 98% क्षमतेने चालत आहे. ही गाडी पुढे दक्षिणेकडे विस्तारित केल्यास महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांना या गाडीच्या आसन उपलब्धतेच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येईल. त्याच बरोबर स्थानकांना मिळालेल्या आसन कोट्यात परिणाम होऊन खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थीवी या स्थानकांच्या प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण होईल. तसेच या गाडीचा लांब मार्ग असल्यास गाडीची देखभाल, दिरंगाई या सारख्या समस्या निर्माण होऊन ही गाडी आपली सध्याची लोकप्रियता गमावून बसेल.
दक्षिणेकडील राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाबद्दल अपेक्षा, मागण्या भिन्न आहेत. ही गाडी दक्षिणेकडे विस्तारित केल्यास भविष्यात दोन्ही प्रवासी गटांत या गाडीवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर उपाय म्हणजे ही गाडी विस्तारित न करता कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मंगळुरु पर्यंत नवीन वंदेभारत गाडी या मार्गावर चालवली जावी. मुंबई ते मंगळुरु अंतर पाहता (९०० किलोमीटर) दुसरा आणि उत्तम पर्याय म्हणजे या दोन्ही स्थानका दरम्यान नवीन स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस किंवा अमृत भारत एक्सप्रेस चालविण्यात यावी आणि तिला चिपळूण, कुडाळ आणि सावंतवाडी या वंदे भारत एक्सप्रेस सेवेपासून वगळण्यात आलेल्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्राधान्याने थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात जयवंत दरेकर यांनी केली आहे.