🔘 आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने सुटणार
Follow us on



Konkan Railway :ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा एकदा कोकण रेल्वे मार्गावर विघ्न निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाण खवटी येथे ओव्हरहेड वायर आज मंगळवारी संध्याकाळी ६-६.१५ वाजण्याच्या सुमारास तुटली. यामुळे मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्यांवर परिणाम झाला. दोन्ही गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत . मात्र याची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ उपाय योजना सुरु करण्यात आल्या. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुटलेली ओव्हर हेड वायर जोडण्यात आली होती. फिट सर्टिफिकेट मिळून काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ होतील असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.
या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील केवळ दोन गाड्यांचे वेळापत्रक काही मिनिटांसाठी विस्कळीत झाले आहे. मात्र अन्यथा उर्वरित गाड्या नियमित वेळेत धावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबून आहे तर गोव्याच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस ला रोहा स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.
आजची मुंबई – मडगाव कोकणकन्या उशिराने
गोव्या वरून मुंबईला निघालेली मांडवी एक्सप्रेस उशिरा धावत असल्याने आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने म्हणजे रात्री एक वाजून तीस मिनिटाने सुटणार आहे.