



सावंतवाडी: सावंतवाडी शहर ते ओटवणे मार्गावरील चराठा येथे अल्टो कार मधून होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकीत २ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांसहित एक लाख रुपये किमतीची अल्टो कार मिळून सुमारे ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. बाबाजी विजय नाईक (४२, रा. खासकीलवाडा सावंतवाडी) व उमेश रघुनाथ सावंत (५०, रा. वायंगणी तालुका मालवण) अशी संशयतांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली.
ओटवणे ते चराठा अशी कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पाळत ठेवून मंगळवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या संशयित अल्टो कारला थांबवून त्याची पाहणी केली असता या गाडीत अवैध गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हा सर्व मुद्देमाल तसेच अल्टो कार ताब्यात घेण्यात आली तर या अवैध वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.
या दोघांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम, जयेश करमळकर यांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.