



रत्नागिरी:निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या श्री कुलस्वामिनी भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
१३ मार्च रोजी रात्रौ हुताशनी पोर्णिमेला वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी पूजन करून होळी प्रज्वलित केली. १४ मार्च रोजी सकाळी श्री कुलस्वामिनी भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ, शेणी व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजाऱ्यानी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतली. गावच्या पुजाऱ्यानी (गुरवानी) मंदिरातून चांदीने मढविलेली पालखी सजवून “कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी” या देवतांची रुपी लावून मंदिरा व होमा समोरील मानाच्या नूतन सहाणेवर आसनस्थ केली. सकाळी ९ वाजता ढोल, ताश्यांच्या गजरात, वाजंत्र्यासह होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थांनी होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण केले. होमाभोवती पालखीची प्रदक्षिणा घालून “भैरी- केदाराच्या चांगभलं” असे म्हणत पालखी उंचावून उपस्थित भाविकांना उत्साहवर्धक वातावरणात दर्शन देण्यात आले तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सुवासिनींनी सहाणेवर पालखीतील देवींच्या आस्थेने ओट्या भरल्या व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला प्रज्वलीत करण्यात आलेल्या ह्या होळीला “‘भद्रेचा शिमगा'” असे संबोधले जाते, कारण या दिवशी भद्रा करण असते. हुताशनी पौर्णिमेला घराघरांतून पूरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात आली. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा “छबिना” काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्रौ मंदिरात आणण्यात आली. छबिन्याच्या वेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी केली व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. वाडी- वाडीतील सुवासिनींनी छबेन्याच्या वेळी ठिकठिकाणी पालखीतील देवतांची आरती करुन ओट्या भरल्या. गावचा छबेना भक्तिमय आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात व आनंदात पार पडला.
होमाच्या दिवशी व्यापाऱ्यांनी कुरमुर्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, मिठाई, सरबत, आइस्क्रीम तसेच विविध प्रकारची खेळणी अशी नाना तऱ्हेची दुकाने थाटली होती.
रूढी परंपरे प्रमाणे १५ रोजी पालखी प्रथम तळेवाडीतील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली व नंतर निम्मेगाव येथील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली. तदनंतर निम्मेगाव येथील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली व अशा प्रकारे १६ रोजी तळेवाडी – दत्तवाडी १७ रोजी लिंगेश्वरवाडी, १८ रोजी राधाकृष्णवाडी येथे नेण्यात आली. १९ तारखेला पालखी कुंभरवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली. त्याच दिवशी पालखी संध्याकाळी परत मंदिरात आणून रुढी परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करुन “धुळवड” (रंगपंचमी) साजरी करण्यात आली, यालाच “शिंपणे” असे म्हणतात. यावेळी अनेक ग्रामस्थांनी मंदिरात गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली. शिंपणे झाल्यावर पालखी पुनश्च कुंभरवाडीतील उर्वरीत घरे घेण्यासाठी नेण्यात आली.
२० रोजी तांदळेवाडी-गुरववाडी व खांबेवाडी, २१ रोजी दत्तवाडी (हनुमान नगर), २२ रोजी वेतकोंडवाडी, २३ रोजी भारतीवाडी, २४ रोजी तांबडवाडी आणि २५ रोजी सुतारवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली.
प्रत्येक घरात राखणेचे, पूजेचे श्रीफळ पालखीत अर्पण करण्यात आले, तसेच माहेरवाशिणीनी व सासरवाशिनिणी ओट्या भरल्या. काही ठिकाणी नवस करण्यात आले तर काही ठिकाणी नवस फेडण्यात आले. पुजाऱ्यानी रूढी परंपरेप्रमाणे देवतांस “आर्जव” घातले. गोडाधोडाचे नैवद्य दाखविण्यात आले. पालखी वाहणाऱ्या सेवकांस “भोई” असे संबोधले जाते. तसेच पुजारी, भोई, ताशावाला व ढोलवाला बांधवांना स्वखुशीने बक्षीस देण्यात येते त्यास ”पोस्त”असे संबोधले जाते.
घरोघरी पालखी नेण्यात येते यास *भोवनी* असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास अनेक चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित होते. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ करण्यात आली. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी (सेवेसाठी)उपस्थित राहिले होते.
सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल, ताशा वाजविण्यात आला. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधवानी पालखीसोबत ताशा वाजवीला , अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता सुतारवाडीतील घरे झाल्यावर मंगळवार दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी (कांदल) रुपी भंडारुन करण्यात आली. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
राखले पावित्र्याचे भान!
वाढविले संस्कृतीची शान!!
ठेवले उत्सवांचे भान!
केला देवतांचा सन्मान!!
आपले:- ग्रामस्थ श्री क्षेत्र टेरव.
संकलन :- श्री सुधाकर राधिका कृष्णाजीराव कदम, ( विशेष कार्यकारी अधिकारी) राधाकृष्णवाडी, श्री क्षेत्र टेरव.
सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.