



Konkan Railway:सीमावर्ती भागातील मराठी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना आता कोकण रेल्वे प्रशासन सुद्धा त्यांच्यावर अन्याय करत असल्याचे सिद्ध झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर पूर्वी चालणारी कारवार- रत्नागिरी गाडी बंद करून कोकण रेल्वेने कारवारच्या मराठी माणसावर अन्याय केला असल्याची खंत कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी व्यक्त केली आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसचा अतिरिक्त भार कमी व्हावा म्हणून या गाडीला समांतर अशी दुसरी गाडी असावी अशी वारंवार मागणी व्हायला लागली व कोकणकन्याला पर्याय म्हणून कारवार ते मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस (आताची मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस) सुरू करण्यात आली होती. परंतु सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री झाल्यानंतर या गाडीचा थेट मेंगलोर पर्यंत या गाडीचा विस्तार केला गेला.
कारवार या शहरांमध्ये 80 टक्के मराठी लोक राहतात त्यांची मूळ कुलदैवता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. जसे गोव्यामध्ये मराठी तसेच कारवार मधले मराठी हे मूळचे मराठीच आहेत. मेंगलोर पर्यंत विस्तार केला गेलेल्या या गाडीचा कारवार वासियांना कोणताही फायदा होत नाही कारण मेंगलोर पासून कारवारला गाडी येईपर्यंत त्याची जनरल डबे फुल झालेले असतात. इथे पण “केला तुका झाला माका” अशी परिस्थिती आहे.
या गाडीला दक्षिणेकडे मेंगलोर पर्यंत आता दोन थांबे वाढवले परंतु सावंतवाडीला मात्र थांबा दिला जात नाही इथेही अन्याय. ही गाडी मराठी माणसांचीच होती ती थेट मेंगलोरला नेली आहे. मुळात कोकण रेल्वे ही सुद्धा महाराष्ट्रापुरती सीमित होती परंतु जॉर्ज फर्नांडिस यांच्या दूरदर्शी विचारांमुळे कोकण रेल्वेचा मेंगलोर पर्यंत विस्तार करण्यात आला. पण त्यामुळे ज्या महाराष्ट्राने कोकण रेल्वेसाठी पन्नास वर्षे वाट बघितली त्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना अनेक सीमावर्ती मराठी माणसांच्या तोंडाला आता कोकण रेल्वेने पाने पुसल्यासारखीच आहेत. आता सीएसटी मेंगलोर गाडीला कारवार साठी स्वतंत्र डबा जोडण्यात यावा व सीमावर्ती कारवारच्या मराठी लोकांवर होणारा अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर पत्रकाद्वारे केली आहे.