Western Railway: वांद्रे (पश्चिम) येथील वांद्रे रिक्लेमेशन जंक्शनवरील एका होर्डिंग वरील जाहिरातीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीत एका जुन्या काळातील प्रतिमा होती, ज्यामध्ये गर्दीने भरलेल्या मुंबई लोकल गाड्या फूटबोर्डवरून लटकलेल्या प्रवाशांना दाखवण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते या जाहिरातीत भारतीय रेल्वे, विशेषतः मुंबई लोकल गाड्यांचे अपमानजनक आणि दिशाभूल करणाऱ्या पद्धतीने चित्रण केले आहे.
शुक्रवारी पश्चिम रेल्वेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे व्यवस्थापित केलेल्या वांद्रे येथील एका होर्डिंगवर औपचारिक आक्षेप घेतल्यानंतर फेविकॉलच्या जुन्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी हे होर्डिंग, तसेच त्यासारख्या सर्व जाहिरातींमध्ये असलेली प्रतिमा त्वरित काढून टाकण्याची आणि “निर्णयातील चूक” म्हणून वर्णन केल्याबद्दल औपचारिक माफी मागण्याची मागणी केली आहे.
“आपल्या रेल्वेमध्ये अभूतपूर्व परिवर्तन होत आहे. चुकीचे प्रतिनिधित्व किंवा नकारात्मक चित्रण पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही या जाहिरातीला तीव्र आक्षेप घेतला आहे आणि ब्रँडला ती त्वरित मागे घेण्याची विनंती केली आहे,” असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेल्या ११ वर्षांत, मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत, आधुनिक रेकची सुरुवात, डीसी ते एसी सिस्टीममध्ये रूपांतर, वातानुकूलित लोकल ट्रेन सुरू करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय सुधारण्यासाठी अनेक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्या आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वे एकत्रितपणे दररोज ७० लाखांहून अधिक प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देत आहेत. मात्र जुना फोटो वापरून केलेल्या अशा जाहिरातीमुळे जनतेत चुकीचा संदेश जातो असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.
Facebook Comments Box