चित्रपट अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर

 

   Follow us on        

मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांर्गत रु.१० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाईल. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप रु. ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना घोषित झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे रु. १० लाख व रु. ६ लाख, स्मृतिचिन्ह व मानपत्र, चांदीचे पदक असे स्वरूप आहे.

तसेच, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. १० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार्थीची निवड करण्याकरिता शासन स्तरावर समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे सदस्य असून सांस्कृतिक कार्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.

सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल, २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार असून, संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search