



Volvo Bus On Fire: पुण्यात बसला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भररस्त्यात आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खेडशिवापूर जवळ ही घटना घडली आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर या खाजगी बसला आग लागली असून, आगीचे कारण हे शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता आहे.
पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळ एका एसी व्हॉल्वो बसला आग लागली. बसला आग लागल्यामुळे प्रवाशांनी प्राण वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. चालकाच्या चातुर्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीची ही घटना दुपारी 12 वाजता घडली. बस वेगाने जात असताना खेड शिवापूरजवळ येताच इंजिन क्षेत्रातून धूर निघू लागला. काही क्षणातच गाडीला आग लागली. प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर पडण्यात यश आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एसी व्हॉल्वो बसमध्ये साधारणतः 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. आगीच्या दुर्घटनेमध्ये प्रवाशांचे प्राण वाचले असले तरी काही जण किरकोळ जखमी आहेत. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे दल येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली होती. गाडीचा भडका आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. तसेच यामुळे बघ्याची देखील मोठी गर्दी जमली होती.
गाडीतून धूर येऊ लागताच, चालकाने सावध राहून बस थांबवली आणि प्रवाशांना ताबडतोब खाली उतरवले. राजगड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “संपूर्ण बसने आग लावली, परंतु कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली.” प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मानले जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.