



सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळा बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाच्या विकासास आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यांत चिपी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी परवानगी मिळणार असून, या विमानतळावरून मुंबई सेवाही अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
नुकतीच मंत्रालयात चिपी विमानतळासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, विमानतळ विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुविधांच्या उभारणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी DPDC (District Planning and Development Council) मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “मुंबई ते चिपी दरम्यानची सेवा कुठल्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. विमानतळाच्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. खास करून रात्री लँडिंगला अनुमती मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवावी”
चिपी विमानतळासंदर्भात लवकरच विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार
तसेच, विमानसेवा अधिक सुलभ आणि नियमित करण्यासाठी नवीन मार्ग आणि कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही लवकरच होणार आहे. या अनुषंगाने विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.