



Pahalgam Terror Attack: पाकिस्तान ची गोची करण्यासाठी भारताने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने आता पाकिस्तानच्या विमानांसाठी आपली हवाई हद्द Airspace बंद केले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात यापुर्वी काही मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानंतर पाकने देखील भारताच्या विरोधात काही निर्णय घेतले. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेशास मनाई केली. पाकिस्तानने भारतातील विमान वाहतूक क्षेत्राला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. त्यानंतर आता भारतानेही पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केलं आहे. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या काळात, पाकिस्तानच्या नोंदणीकृत, चालवल्या जाणाऱ्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या विमानांसह पाकिस्तानी लष्करी विमानांना या क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद झाल्यानंतर त्यांच्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. पूर्वी पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्द वापरून चीन, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंकेत उड्डाण करत होता, परंतु आता हवाई हद्द बंद झाल्यानंतर, त्यांच्या विमानांना पुन्हा या देशांमध्ये पोहोचण्यासाठी जास्त अंतराचा प्रवास करावा लागेल.
पाकिस्तानी एअरलाइन्स पीआयएने उड्डाणे केली रद्द
भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्यापूर्वी, पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले होते की, पाकिस्तानची राष्ट्रीय विमान कंपनी पीआयएने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त काश्मीरला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. उर्दू दैनिक ‘जंग’ ने दिलेल्या वृत्तानुसार, पीआयएने कराची आणि लाहोरहून स्कार्दूला जाणारी प्रत्येकी दोन उड्डाणे रद्द केली आहेत. इस्लामाबादहून स्कार्दू आणि गिलगिटला जाणाऱ्या एकूण सहा विमान उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत. पाकिस्तानने आपल्या हवाई क्षेत्राची देखरेखही कडक केली आहे.
एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व व्यावसायिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, ही सर्व पावले खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रादेशिक तणावादरम्यान राष्ट्रीय हवाई सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उचलण्यात आली आहेत. याशिवाय, पाकिस्तान प्राधिकरणाने सर्व विमानतळांना हाय अलर्टवर ठेवले आहे.