Kashedi Tunnel | मे महिन्याच्या सुट्टीत मुंबई गोवा महामार्गाने कोकणात जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचा कशेडी घाट बोगदा लवकरच पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायक होणार आहे. कशेडीच्या दोन्ही बोगद्यांपैकी पोलादपूर बाजूकडील वीजपुरवठा कार्यान्वित झाला असून, उर्वरित वीजपुरवठा १५ दिवसांत पूर्ववत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम सुरू असून १५ मेपूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बोगद्याचा वापर सणासुदीच्या काळात प्रवाशांनी अधिक पसंत केल्याने, ही सुविधा वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
spacer height=”20px”]
कशेडी घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. यामुळे ४० ते ४५ मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या १० ते १५ मिनिटांत रायगडमधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य होणार आहे.
बोगद्यात दोन्ही बाजूंनी २०० पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी अपेक्षित असून, १५ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोकणात जाणारा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
Facebook Comments Box