सावंतवाडी: उन्हाळी सुट्टीच्या हंगामात सिंधुदुर्गात येणारे चाकरमानी व प्रवाशांच्या सोयीसाठी सावंतवाडी आगार सज्ज झाले असून आगाराने ज्यादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे मुंबई, बोरिवली व पुणे या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सावंतवाडी आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
एसटी आगाराला अलीकडेच नवीन पाच बीएस-सिक्स बसेस मिळाल्या आहेत. या बसेस ४० सीट असलेल्या पूश बँक, आरामदायी आहेत. चार्जिंग पोर्ट अशा बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सोडण्यात येतील, अशी माहिती आगार व्यवस्थापक नीलेश गावित व स्थानकप्रमुख राजाराम राऊळ यांनी दिली. प्रवाशांनी या बसचे आरक्षण करून लाभ घ्यावा, असे आवाहनही आगारातर्फे करण्यात आले आहे.
सावंतवाडी आगारातून सावंतवाडी-पुणे ही एसटी बस सकाळी सात वाजता सुटणार आहे. आगारातून बांदा-बोरिवली ही बस सोडण्यात येणार आहे. ही बस आगारातून दुपारी तीन वाजता बांदा येथे जाईल. तेथून चार वाजता ती सुटून पुन्हा सावंतवाडीत येणार आहे. त्यानंतर साडेचार वाजता बोरिवलीला मार्गस्थ होणार आहे. प्रवाशांनी या दोन्ही बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या आठ दिवसांत चाकरमान्यांची वाढती गर्दी व आरक्षण पाहता, आणखी ज्यादा गाड्या मुंबई-बोरिवली व पुणे या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी आगाराच्या ताफ्यात नव्याने पाच एसटी बसेस उपलब्ध झाल्याने बसेसची संख्या ८३ झाली आहे. या बसच्या माध्यमातून सर्व मार्गावर वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यास मदत झाली आहे. प्रवासी उपलब्धतेनुसार ज्यादा बसेसही सोडण्यात येणार आहेत.. प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेतली जाणार आहे. नव्याने मिळालेल्या नवीन पाच बसेस या विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत. सोडण्यात येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण सुरू झाले आहे. या सुविधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
Facebook Comments Box