मालवणः जगभरातील शिवप्रेमींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा ८३ फूट उंच पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (११ मे) करण्यात आले. तब्बल ८३ फूट उंच असलेल्या या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. यामुळे हा पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.
या भव्य उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे राज्यातील अनेक मंत्री तसंच शिवभक्त उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, २६ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या दुर्घटनेत वादळी वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने तातडीने समुद्रकिनाऱ्यावरील वातावरणाचा व वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करत नव्यानं पुतळा उभारला आहे.
नवीन पुतळा ८३ फूट उंच आहे. शिवरायांच्या हातातील तलवार २३ फूट लांब आहे. या पुतळ्याचे वजन ८५ टन असून, तलवारीचे वजन २.३ टन आहे. हवामानाचा अंदाज घेत हा पुतळा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याला तब्बल १०० वर्षांची गॅरंटी देण्यात आली आहे. राज्यातील आणि विशेषतः कोकणातील शिवप्रेमींसाठी हा क्षण अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे.
Facebook Comments Box