Konkan Railway: एलटीटी – मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी ११०९९/ १११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस नेहमीच उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मध्यरात्री १२:४५ वाजता एलटीटी येथून सुटणारी मडगाव एक्सप्रेस मुळातच दोन तास उशिराने सुटते. त्यानंतर पुढे ढकलत ढकलत चालते. परिणामी दररोज चार ते पाच तास विलंबाने धावते. गावी जायची ओढ असल्यामुळे कोकणी माणूस निमूटपणे हा त्रास सहन करत आहे. या गाडीच्या नेहमीच्या लेटमार्क मुळे ८/१० तासांचा प्रवास १४ ते १६ तासांवर जातो. ही गाडी नेहमीच उशिराने चालवली जात असल्याने या गाडीची विश्वासहर्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. काहीच पर्याय नसल्याने कोकणकरांना या गाडीने प्रवास करावा लागत आहे.
या गाडीच्या लेटमार्कबद्दल अनेक चाकरमान्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या. पण फारसे गांभीयनि घेतले जात नाही. कोकणवासीयांना होणाऱ्या या त्रासाबद्दल सिंधुदुर्ग रत्नागिरीमधील राजकीय नेत्यांनीच नाही तर मुंबईत विविध पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांनीही कोकण रेल्वेसह मध्य रेल्वे प्रशासनाचे कोकणवासीयांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. हे असे सुरू राहिले तर मग मात्र कोकणी माणूस रस्त्यावर उतरून रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याची चिन्हे आहेत.
मुंबई LTT मडगाव (अप आणि डाऊन) रेल्वेगाडी गेले आठवडाभर 5 ते 10 तास उशिराने धावत आहे. Where is my train app वर गेल्या 8 दिवसांचे वेळापत्रक आपण तपासून पाहू शकता. प्रवाशांना याचे मेसेज गाडी सुटायच्या वेळेवर येतात. त्यामुळे लोक सामान, बोजा आणि परिवारासोबत प्लॅटफॉर्मवर पोहोचलेले असतात व रात्रंदिवस ताटकळत गाडीची वाट पाहत राहतात. याठिकाणी प्रवाशांच्या वेळेचे मोल शून्य गृहीत धरले जातेय. रेल्वे प्रशासन कधी जागे होणार? विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करणारे रेल्वे प्रशासन मात्र स्वतःच्या चुकीवर प्रायश्चित्त घ्यायला किंवा शिक्षा भोगायला तयार आहे का? कोणत्याही वर्तमानपत्रात किंवा टीव्ही माध्यमांवर याविषयी बातमी नाही, याचेही मोठे आश्चर्य वाटते. या विलंबाचे कारण काय? यार्गावरील अन्य गाड्या मात्र थोड्या विलंबाने का होईना धावत आहेत. याकरिता कोकणवासीयांसाठी सावंतवाडी टर्मिनस होणे फार गरजेचे आहे. कोकणी माणूस संयमी, समजूतदार व सहनशील असल्याने त्याचा हा छळ होत असेल तर जनआंदोलन उभे राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.
– गणेश चमणकर, वेंगुर्ले
मध्य रेल्वेची कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात बेभरवशाची १११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आज (१८ मे, २०२५) मडगावहून तब्बल ९ तास ५६ मिनिटे उशिराने सुटली. मध्य रेल्वेने आता या गाडीला स्वतंत्र रेक उपलब्ध करावा. अन्यथा ही गाडी वेळेत चालणे शक्य नाही.
– अक्षय महापदी, कळवा
मध्य आणि कोकण रेल्वे ११०९९/१११०० ही सेवा गेली दोन वर्षे नीट चालवत नाही. त्यांनी ही गाडी पश्चिम रेल्वेला चालविण्यास द्यावी १०११५/१०११६ व ११०९९/१११०० या दोन्ही गाड्या एकत्र करून एक नियमित गाडी संध्याकाळी ६ तें १० या वेळेत वांद्रे किंवा नवीन होणाऱ्या जोगेश्वरी टर्मिनस येथून सोडण्याबाबत विचार व्हावा.
– केशव नाईक, सावंतवाडी
Facebook Comments Box