आंबोली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावात एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. या गावातील जांभळ्याचे कोंड नदीतील एका पाणवठ्यात हा वाघ खडकावर बसून पाणी पिताना आढळून आला. याचे फोटो आणि व्हिडिओ स्थानिक युवकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
आंबोली वनविभागाशी या घटनेबाबत संपर्क साधला असता त्यांनी या परिसरात पट्टेरी वाघांचे अस्तित्व मान्य केले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो याच वाघाचे आहेत की नाही? याबाबत निश्चितपणे सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वनखात्याकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत नोंदीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्री पट्टयात एकूण आठ पट्टेरी वाघ आहेत. यामध्ये पाच मादी आणि तीन नर वाघांचा समावेश आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृत नोंद वनविभागाच्या दप्तरी झाली आहे. वनविभागाने यापूर्वीच वाघांचे अस्तित्व मान्य केले होते आणि त्यानंतर बऱ्याचदा आंबोली-चौकुळ भागात वाघ दिसून आला होता. काही महिन्यांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील भेकुर्ली येथे दिवसाढवळ्या वाघ आढळला होता.
वनविभागाच्या नोंदीनुसार आंबोली ते मांगेली हा वाघांचा प्रमुख भ्रमणमार्ग आहे. काही दिवसांपूर्वी दाभिळमधील जंगल भागातील विहिरीत मृत पट्टेरी वाघीण आढळून आली होती. जी वनविभागाच्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाली होती. आणि आता पुन्हा चौकुळ येथे पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने या पट्टयातील वाघांचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
Facebook Comments Box