सिंधुदुर्ग: समुद्र किनारपट्टीवर पाण्याचा अंदाज न आल्याने नागरिक बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा बुडणाऱ्या व्यक्तींना मनुष्याचा सहभाग न घेता रिमोट द्वारे वाचविण्याचे यंत्र पुणे येथील एका कंपनी द्वारे बनवण्यात आले आहे. समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) रिमोट द्वारे नियंत्रित करून बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ले नवाबाग समुद्र किनारी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
स्वतः जिल्हाधिकारी यांनीही रिमोट द्वारे या यंत्राची माहिती घेऊन कृतीद्वारे अनुभव प्रात्यक्षिक अनुभवले. कंपनीचे पुणे येथील भूषण चिंचोले यांनी वेंगुर्ले नवाबाग समुद्रात या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांना करून दाखविले. यावेळी रिमोट वर चालणाऱ्या या यंत्राचे प्रात्यक्षिक बघितल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी त्याच स्वतः वापरून प्रात्यक्षिक केले आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, तहसीलदार ओंकार ओतारी, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, मंडळ अधिकारी विनायक कोदे, तलाठी सायली आदुर्लेकर, भाजप वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तसेच पोलीस पाटील, कोतवाल, नागरिक उपस्थित होते.
हे यंत्र समुद्रात दीड किलो मीटर पर्यंत बुडणाऱ्या व्यक्ती पर्यंत जाऊ शकते. एका वेळी तीन व्यक्तींना समुद्राच्या पाण्यावर आपल्या सोबत तरंगत ठेऊ शकते. तसेच एक व्यक्ती बुडत असेल तर त्या व्यक्तीला तरंगत पकडून किनाऱ्यापर्यंत आणू शकते.

Facebook Comments Box