



गोवा: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गोव्यातून रेल्वेने थेट पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने कॅसल-रॉक येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅसलरॉक-मिरज एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७३३४) ही रेल्वे ४ ते ९ जुलै या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गोव्यातून निघणाऱ्या भाविकांना आता थेट पंढरपूरला रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
रेल्वेने आजपर्यंत कोकण रेल्वे मार्गे पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही!
कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली होती. मात्र यावेळीही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.