



अहमदाबाद: गुजरातमध्ये पूल कोसळून भीषण अपघात झाल्याची धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळल्याचं सांगितलं जात आहे. आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा गंभीरा पूल कोसळून हा अपघात झाला. पूल कोसळला तेव्हा त्यावरुन वाहनांची ये-जा सुरु होती. त्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा पूल 45 वर्ष जुना असल्याची माहिती आहे.
महिसागर नदीवरील 45 वर्ष जुना गंभीरा पूल कोसळल्याने वडोदरा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात धक्का बसला. वडोदरा जिल्ह्यातील पदराला आनंद जिल्ह्याशी जोडणारा हा पूल बराच काळापासून जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आहे.
महिसागर नदीवरील गंभीरा पुलाचा एक भाग बुधवारी (9 जुलै) सकाळी कोसळला, ज्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. पदराचे पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महामार्गावर सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या वाहनांमध्ये दोन ट्रक आणि दोन व्हॅनचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत चार जणांना सुरक्षित बचावलं आहे आणि इतर अपघातग्रस्तांचा शोध सुरू आहे.
मुजपूर गावाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. दोन ट्रक, एक बोलेरो जीप, दुसरी एक गाडी पूल ओलांडत असताना अचानक पुलाचा एक भाग कोसळला. त्यामुळे दुधडी भरुन वाहणाऱ्या महिसागर नदीत ही चारही वाहनं कोसळली. स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी जमा झाले आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली