



सावंतवाडी : संपूर्ण महाराष्ट्रात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन जिल्हा कारागृहे आहेत. पैकी एक ब्रिटिशकालीन सर्वात जुने जिल्हा कारागृह सावंतवाडी येथे असून दुसरे सिंधुदुर्गनगरी येथे अलीकडेच उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील गुन्ह्यांची संख्या पाहता सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे, त्यामुळे सावंतवाडीतील ब्रिटीशकालीन कारागृह पर्यटनासाठी वापरून त्याठिकाणी ‘कारागृह पर्यटन’ ही संकल्पना राबवता येऊ शकते, त्याने जिल्ह्याच्या पर्यटनला एक नवी दिशा मिळेल, असे मत रविवारी आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. केसरकर यांनी ‘कारागृह पर्यटन’ या संकल्पनेवर विशेष भर दिला. कोणत्याही जिल्ह्यात दोन कारागृह नाहीत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुन्हेगारी दर पाहता, सिंधुदुर्गनगरी येथील कारागृह पुरेसे आहे. सावंतवाडी येथील कारागृह सुमारे 150 वर्षांपूर्वीचे असून ते आता रिकामे झाले आहे.
काही दिवसांपूर्वी या कारगृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने येथील सर्व कैद्यांना सिंधुदुर्गनगरीतील कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यामुळे, या ऐतिहासिक कारागृहाचा उपयोग ‘कारागृह पर्यटन’ साठी करता येईल.यामुळे पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळेल. सावंतवाडीला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असल्याने, असे अभिनव पर्यटन उपक्रम सुरू झाल्यास त्याचा जिल्ह्याला निश्चितच फायदा होईल, असे आ. केसरकर म्हणाले.
राज्यातील ऐतिहासिक कारागृहातील ठिकाणे आणि घटनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती होण्यासाठी यापुर्वी येरवडा कारागृहात ‘कारागृह पर्यटन’ सुरुवात केली होती. राज्यातील अनेक कारागृहे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योतर काळातील ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाकडून ऐतिहासिक ठिकाणे आणि संदर्भांचे जतन केले जातात. चित्रपटात दाखविले जाणारी कारागृहे आणि प्रत्यक्षातील कारागृहे पाहण्याची सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असते. कारागृहे आतून कसे दिसते, कैद्यांना कसे ठेवले जाते, याची नागरिकांमध्ये उत्सुकता असते. मात्र, कारागृहात विविध गुन्ह्यांतील कैदी शिक्षा भोगत असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टीने कारागृहात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही.
मात्र, आता राज्य सरकारने कारागृहातील ऐतिहासिक स्थळे दाखवून, घटनांचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने राज्यातील कारागृहांत ‘कारागृह पर्यटन’ सुरू करण्याची घोषणा त्यावेळी केली होती.