



मुंबई : गणपती उत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून ६० दिवस आधी याप्रमाणे आरक्षण सुरू करण्यात येते. यंदाच्या वर्षी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या बहुतांश गाड्या फुल झाल्या असल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजी आहे. यासाठीच रेल्वे प्रशासनाने तारखेनुसार ४५ दिवस, ३० दिवस, १५ दिवस इत्यादी टप्प्याटप्प्यांनी अँडव्हान्स रिझर्वेशन कालावधी (एआरपी) पद्धतीने गणपती विशेष गाड्यांचे बुकिंग उघडण्याचा विचार करावा, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीकडून करण्यात आली आहे.
सध्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अप आणि डाऊन दोन्ही दिशांसाठी एकाच वेळी सुरू केले जाते. त्यामुळे तिकिटे उघडल्यानंतर काही मिनिटांतच बुक होतात, ज्यामुळे प्रवासाचे दोन्ही टप्पे सुरक्षित करणे कठीण होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पर्यायीरीत्या काही अडचणींमुळे निश्चित एआरपी शक्य नसल्यास, अप आणि डाऊन दिशांसाठी बुकिंग वेगवेगळ्या तारखांना उघडावी, जेणेकरून प्रवाशांना त्यांचा संपूर्ण प्रवास नियोजन करण्याची संधी मिळेल, असे संघटनेकडून सांगण्यात आले.
दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे नियमानुसार आयआरसीटीच्या एका आयडीवर प्रत्येक दिवशी फक्त एकच तिकीट काढायचे बंधन आहे. त्यामुळे कोकणात गावी जातानाचे आणि परतीचे तिकीट एकाच दिवशी काढणे शक्य होत नाही.
टप्प्याटप्प्याने आरक्षण कालावधी मिळाला, तर प्रवाशांना दिलासा मिळेल. उत्सवाच्या हंगामात अधिक व्यवस्थित आणि समावेशक प्रवास नियोजन सुनिश्चित होईल. यामुळे तत्काळ कोट्यावर अवलंबून राहणे कमी होईल आणि बुकिंग सिस्टीमचा गैरवापर रोखण्यास मदत होईल.
– अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती.