



सावंतवाडी: बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाच्या प्रस्तावित आखणीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. आंबोली येथील संवेदनशील परिसरातील पर्यावरणावर होणारा परिणाम टाळण्यासाठी आणि ३० किलोमीटर लांबीचा भव्य बोगदा खोदण्याची आवश्यकता टाळण्यासाठी आता केसरी-फणसवडे या पर्यायी मार्गाचा वापर केला जाणार आहे. यामुळे केवळ १० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदून हा महामार्ग थेट मळगावला जोडला जाणार आहे.
या बदलामुळे आंबोलीतील इको सेन्सिटिव्ह भाग आणि बागायती क्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गाची गरज टळणार आहे. ज्यामुळे स्थानिक पर्यावरण आणि कृषी क्षेत्राचे संरक्षण होईल.
आमदार दीपक केसरकर यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, “शक्तीपीठ” महामार्गाच्या प्रस्तावित आखणीत बदल करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आंबोली येथील इको सेन्सिटिव्ह आणि बागायतीच्या भागातून जाणारा महामार्ग आता अन्य भागातून वळवण्यात येणार आहे. यामुळे केसरी-फणसवडे या मार्गाचा वापर केला जाणार असून, आंबोलीतील तब्बल ३० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्याची गरज लागणार नाही. त्याऐवजी फक्त १० किलोमीटर लांबीचा बोगदा खोदून हा महामार्ग मळगावला जोडला जाईल.” या बदलामुळे प्रकल्पाच्या खर्चातही बचत होण्याची शक्यता आहे, तसेच पर्यावरणीयदृष्ट्या अधिक शाश्वत पर्याय निवडला गेल्याने स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. शक्तीपीठ महामार्गाचे काम आता अधिक गतिमान होण्याची अपेक्षा आहे.