सावंतवाडी, ता.०३ –
चराठा-नमसवाडी रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृताचे नाव परशुराम प्रकाश पोखरे (वय ३२) असे आहे. हा अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, परशुराम पोखरे हे म्हापसा येथील एका कंपनीत नोकरी करत होते. रविवारी सुट्टीमुळे ते काही कामानिमित्त गावी आले होते. चराठा येथे चिकन घेऊन ते आपल्या घरी परत जात होते. दरम्यान, ओटवणे रस्त्यावर ग्रामपंचायतीपासून सुमारे ५० मीटर अंतरावर असलेल्या नमसवाडी येथील चढावावर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी बाजूच्या दगडाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की, परशुराम गाडीसह रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खूप गंभीर असल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.