कोकण रेल्वेच्या समस्या आणि उपाययोजना: सागर तळवडेकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वे संदर्भात गेल्या काही वर्षांत झालेली जनजागृती वाखाणण्याजोगी असून, युवकांच्या सहभागातून कोकण रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे संपर्क प्रमुख श्री. सागर तळवडेकर यांनी “कोकण रेल्वे समस्या आणि निवारण – माझ्या नजरेतून” या शीर्षकाखाली तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

“कोकण रेल्वे समस्या आणि निवारण.
माझ्या नजरेतून..

नमस्कार मंडळी, काही वर्षापासून कोकण रेल्वे संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंबहुना तळकोकणात जी जनजागृती झालीत ती खरच वाखण्याजोगे आहे. याआपल्या माहिती साठी सांगतो की 2017 ते 2020 पर्यंत सावंतवाडीचे कै. डी के सावंत यांनी जी रेल्वे संदर्भात मुहूर्त बांधली ती आता कुठे रंगू लागली आहे. कोरोना काळात कोणालाही न कळता सावंतवाडी आणि कणकवली स्थानकावरून गाड्या कमी करण्यात आल्या, परंतु तेव्हा याचा विरोध कोणी केला नव्हता, त्यात सावंतवाडी येथील प्रस्तावित टर्मिनसचे काम देखील ठप्प पडले होते.
‎दरम्यानच्या काळात सावंतवाडीतील काही तरुणांनी बॅनर लावून केलेली रेल्वे प्रशासनाची थट्टा पूर्ण जिल्हाभर गाजली होती.आणि येथूनच या सिंधुदुर्गात कोकण रेल्वे महामंडळाविरोधात कोकणवासीयांची नकारात्मकता दिसून यायला लागली.
‎वर्षं 2022, जेव्हा कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली आणि सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेले थांबे कर्नाटक राज्यातील स्थानकांना देण्यात आले तेव्हा सावंतवाडीतील काही युवकांच्या मनात पाल चुकचुकली. आणि इथूनच काल पर्यंत झालेले आंदोलन हे त्याचेच फळ. आणि हो कोकणातील अजून स्थानकांवर पुढेही आंदोलने होतील..!! 

समस्या क्र. १.- कोकण रेल्वे नेमकी कोणाची..??

‎बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या महनीय व्यक्तींमुळे रेल्वे कोकणात आली खरी, परंतु फायदा कोकणाला काही झालाच नाही. मुळात कोकण रेल्वे हे एक महामंडळ असल्याकारणाने याला अर्थसंकल्पीय तरतूदच नाही. त्यामुळे प्रवासी, मालवाहतूक, आदी उत्पन्नावर या महामंडळाला आपला कारभार हाकावा लागतो.
‎उपाय- या महामंडळाचे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करणे.आणि कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करणे. यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांनी आपली संमती देणे आवश्यक आहे.
‎महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केलीय. त्यासाठी आम्ही युवकांनी मेल मोहीम करून हा मुद्दा खासदार धैर्यशील मोहिते, सुनील तटकरे, नरेश म्हस्के, रविंद्र वाईकर आदींकडून लोकसभेत आणि राज्यसभेत उपस्थित केला.(त्यांनी मांडलेला मजकूर आणि आम्ही केलेली मेल मोहिमेतील मजकूर यात १०० टक्के साधर्म्य होते) १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेऊन या विषयाला महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोचवले होते.

समस्या क्र. २.- कोकणी माणसांना तिकिटे, नवीन गाड्या कधी मिळणार..?? खरंच टर्मिनसची आवश्यकता असते का??

‎कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या ह्या बारामाही फुल धावतात, त्यामुळे आपला कोकणी माणूस हा वेटींग वरच राहतो.याला मूळ कारण काय असावे बरे..?? काही लोक म्हणतील एजंट..!!परंतु मी म्हणतो याला एजंट कारणीभूत नाही, एजंट हे तांत्रिक कारण असूच शकत नाही. मूळ कारण हे टर्मिनस सुविधा आहे.
‎कोकणात टर्मिनस नसल्याकारणाने येथून गाड्या सोडण्यावर निर्बंध येतात.त्यामुळे कोकणसाठी नवीन गाडी सोडायची म्हटल्यावर ती गोव्यातील मडगाव स्थानकापर्यंत सोडली जाते,आणि इथेच सगळा खेळ होऊन जातो. कारण गोव्यात बाराही महिने पर्यटकांचा भरणा चालू असतो, गोव्यातील मडगाव आणि थिवी हे स्थानक प्रवासी संख्या आणि उत्पन्नात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणून गाडी जर गोव्यापर्यंत गेली तर सर्वात जास्त तिकीट कोटा ही तेथील स्थानकांना अधिक मिळतो आणि आपली कोकणी जनता वेटींग वर मूग गिळून गप्प राहते आणि आपला रोष एजंट वर काढते.
‎उपाय – कोकणाला जर कोकणमर्यादित गाड्या हव्या असतील, पुरेसा तिकीट कोटा हवा असेल तर कोकणात स्वतंत्र टर्मिनसची नितांत आवश्यकता आहे.
त्यासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे टर्मिनस मंजूर केले खरे परंतु कोकणवासीयांचा निद्रस्त भूमिकेमुळे हे टर्मिनस गेले १० वर्ष रखडले.
सावंतवाडीत जर टर्मिनस आणि कोचिंग डेपो झाला तर त्याचा फायदा फक्त सावंतवाडीला होणार नसून तर संपूर्ण कोकणला त्याचा फायदा होईल. ज्या प्रमाणे तुतारी एक्सप्रेस मध्ये फक्त कोकणी मनुष्य मुंबई पर्यंतचा प्रवास करतो तसाच प्रवास अजून काही गाड्या सावंतवाडी वरून सुरू झाल्यास होईल. त्यासाठी परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस आणि कोचिंग डेपोची आवश्यकता आहे.

समस्या क्र. ३.- कोकण रेल्वे महामार्गाचे दुहेरीकरण कधी..??वाढीव थांबे कधी मिळणार..??सिंधुदुर्गात १५ गाड्या का थांबत नाहीत??येथील प्रवासी सुविधांचे काय..??

‎कोकण रेल्वे हे केंद्राचा रेल्वे मंत्रालय संलग्न महामंडळ आहे,ज्या मध्ये ४ राज्यांची हिस्सेदारी आहे. आणि सदर महामंडळ सध्या कर्जाच्या खाईत आहे, आजमितीस या महामंडळावर हजारो कोटीच्या घरात कर्ज आहे.
‎उपाय – आजचा घडीला कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण दुहेरीकरण करण्यासाठी किमान ४० हजार कोटींची गरज आहे.जे एका महामंडळाला झेपण्यासारखे नाही. याचकारणाने सध्या या मार्गाचे दुहेरीकरण होणे शक्य नाही.या महामंडळाने टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव प्रत्येक राज्यसरकारला पाठवला होता परंतु त्याचे घोडे पुढे धावलेच नाहीत.
‎थांब्यासंदर्भात बोलायचे झाले तर त्याला मोठा जन लढा उभारावा लागतो कारण जो पर्यंत मागणी करत नाही तो पर्यंत त्याचा वर कारवाई होत नाही. मी एक रेल्वेचा अभ्यासक म्हणून हा मुद्दा उपस्थित केला होता परंतु तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्याचे एक कारण म्हणजे आपली उदासीनता.त्यामुळेच कदाचित सिंधुदुर्गात एकूण १५ गाड्या थांबत नाहीत, त्यात सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेली राजधानी एक्सप्रेस व गरीब रथ एक्सप्रेस आणि कणकवली स्थानकातून काढलेली हिसार कोइंबतूर एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.

‎येथील प्रवासी सुविधासंदर्भात बोलायचे झाले तर आम्ही सिंधुदुर्गातील तरुण युवक गेले दोन वर्षे याचा पाठपुरावा करत आहोत याचे फलित म्हणजे वैभववाडी येथे पादचारी पूलचे काम सुरू आहे ( ओंकार लाड व टीम चे प्रयत्न), कणकवली येथे प्लॅटफॉर्म २ वर २५० मीटरचा COP ( कव्हर ऑन प्लॅटफॉर्म) म्हणजेच निवारा शेड, व खाली जाणारा सरकता जिना.(सुनीत चव्हाण आणि टीम). सिंधुदुर्ग येथे PRS सुविधा, वांद्रे मडगाव एक्स्प्रेसचा थांबा (शुभम परब आणि टीम).
सावंतवाडी येथे अप्रोच रोडचे काम ९० टक्के पूर्ण, PRS सुविधा पूर्णवेळ सुरू, वांद्रे – मडगाव व नागपूर मडगाव एक्स्प्रेसचे थांबे मिळाले, प्लॅटफॉर्म ३ वर १७० मीटरचा COP आणि लिफ्ट प्रस्तावित/ मंजूर. (सागर, मिहिर, भूषण आणि टीम) आदी.
मंडळी, या काही महत्त्वाचा समस्या जे मला वाटतात. याव्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतील आणि माझ्याकडून काही चुकल्या असतील.तर त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवू शकता. मी आणि माझी संपूर्ण टीम त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू.‎‎आपल्या सूचनांचे नक्कीच स्वागत करून मी थांबतो.”


‎- ‎सागर तळवडेकर
‎उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.
‎संपर्क प्रमुख, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र.

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search