Follow us on




Konkan Railway: कोकण रेल्वे महामंडळाने कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दरम्यान सुरू केलेल्या रो-रो (Ro-Ro) कार ट्रान्सपोर्टेशन सेवेला आता नवा थांबा मिळाला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सोयीसाठी नांदगाव रोड स्थानकावर या सेवेसाठी अतिरिक्त थांबा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कार मालकांसाठी ही सेवा अधिक लवचिक आणि उपयोगी ठरणार आहे. आता प्रवासी कोलाड, नांदगाव रोड किंवा वेर्णा या कोणत्याही स्थानकावरून कार लोड आणि अनलोड करू शकतील.
या सेवेसाठी नोंदणीची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कोलाड ते वेर्णा दरम्यान एका कारसाठी भाडे ₹७८७५/- (५% GST सहित) आहे, तर कोलाड ते नांदगाव दरम्यानचे भाडे ₹५४६०/- इतके आहे. प्रत्येक कारसाठी ₹४०००/- नोंदणी शुल्क आकारले जाईल, जे सेवेसाठी पात्र ठरल्यास अंतिम भाड्यातून वजा केले जाईल. मात्र, जर १६ हून कमी बुकिंग्स प्राप्त झाल्या तर सेवा रद्द करण्यात येईल आणि नोंदणी शुल्क परत करण्यात येईल.
कार लोड झाल्यानंतर चालक किंवा सहप्रवाशांना कारमध्ये बसून प्रवास करण्याची परवानगी नसेल. त्याऐवजी प्रवाशांनी रेल्वेच्या कोचमध्ये 3AC किंवा 2S वर्गात तिकिट काढून प्रवास करावा लागेल. एका कार बुकिंगवर ३ प्रवासी (२ जण 3AC आणि १ जण 2S) प्रवास करू शकतात. अतिरिक्त प्रवासी केवळ रिक्त जागा उपलब्ध असल्यासच प्रवास करू शकतील.
या नव्या थांब्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. कोलाडहून वेर्णाकडे जाणारी सेवा दुपारी ३ वाजता सुटेल आणि नांदगाव रोडवर रात्री १० वाजता पोहोचेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता वेर्णा स्थानकात आगमन होईल. वेर्णाहून परतीच्या प्रवासात गाडी दुपारी ३ वाजता सुटेल, नांदगावला रात्री ८ वाजता पोहोचेल आणि कोलाडला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचेल.
नोंदणीसाठी कोलाड, वेर्णा किंवा कणकवली (नांदगावसाठी) स्थानकावर संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी आणि अटी व शर्तींसाठी अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.