



सावंतवाडी: रविवारी चराठे-ओटवणे रस्त्यावर झालेल्या अपघतात कारिवडे गावातील ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजारातून दुचाकीवरून घरी जात असताना येथील एका वळणावर त्याचा दुचाकीवरून ताबा सुटून ती एका मोठ्या दगडावर आढळली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या रुग्णालयात गंभीर जखमी रुग्णांना उपचार करण्याची सोय नसल्याने रुग्णालय प्रशासनाने त्याला बांबुळी येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले.
मात्र तिथे कोणतीही रुग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना रुग्णवाहिका शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. १०८ वरून मागवलेली रुग्णवाहिका बांद्यावरून जवळपास सव्वा ते दिड तासाने आली. रुग्णाला घेऊन ती रुग्णवाहिका निघाली खरी मात्र बांबुळी रुग्णालयात पोहोचेपर्यंत परशुरामची प्राणज्योत मालवली.
वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती आणि परशुरामवर वेळेत उपचार चालू झाले असते तर त्याचा जीव वाचवता आला असता. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा जीव गेला. असे अजून किती बळी प्रशासन घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. L
सावंतवाडी तालुक्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे ही मागणी खूप वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रखर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ते अजून काही वर्षे होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. मात्र ते होईपर्यंत किमान गंभीर जखमी रुग्णांना गोवा राज्यात जलद गतीने नेण्यासाठी रुग्णवाहिका तरी उपलब्ध करून द्यावी. येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाला गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देऊन सरळ आपले हात वर करतात. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो. साहजिकच याबाबत त्यांना कल्पना नसल्याने खूप वेळ वाया जातो. येथील प्रशासन अशा गंभीर जखमी रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी एक-दोन रुग्णवाहिका का ठेवू शकत नाही हा पण एक प्रश्नच आहे.
सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चे काय झाले?
१६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना या हॉस्पिटलच्या कामास गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी या हॉस्पिटलसाठीची जागा सध्याच्या कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच असावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र काही राजकीय मंडळी हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंबकर यांनी सावंतवाडीतील ‘यशराज मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ या पर्यायी प्रकल्पाला महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की जागेचा वाद सुटला तरी हॉस्पिटल उभारणीस किमान तीन वर्षे लागतील. त्यामुळे सध्या या प्रकल्पाची वाटचाल ठप्प झाली असून अद्याप कोणतेही ठोस पाऊल पुढे पडलेले नाही.
सावंतवाडी आणि आजूबाजूचा परिसर अजूनही अशा प्रकारच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी गोवा राज्यावर अवलंबून आहे. सावंतवाडीत एक सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पटिल व्हावे ही मागणी राजकीय इच्छा शक्ती अभावी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.