गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने वेगवान हालचाली घडोत, हीच जनसामान्यांची कामना!
Follow us on



गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर वासी जनतेला आनंदाचं भरतं आलं होतं! कारणही तसंच खास, आपल्या मतदार क्षेत्राचे नामदार खासदार नारायण राणे आपल्या तीन एक्स्प्रेसना संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा या मागणीचे पत्रक घेऊन रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना दिल्ली येथे भेटले. या वेळी कोकण रेल्वेकडून दिलेल्या सकारात्मक प्रस्तावाची प्रत जोडली होती.
योगायोग म्हणजे त्याच दिवशी खासदार सुनील तटकरे हे सुद्धा अंजनी, कोलाड या स्थानकांवर काही एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीसाठी रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला गेले होते. तसा तो दिवस कोकणातील जनतेसाठी आनंदाचा. ऐन गणेशोत्सवात अतिरिक्त रेल्वे गाड्या, आणि सोबत एक्स्प्रेसना थांबा मिळणार म्हणून सगळेच आनंदात!
पण काही दिवसांनी अंजनी,कोलाड स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर झाल्याचे पत्र मिळाले. पण संगमेश्वरच्या जनतेला प्रतिक्षेत ठेवले होते. आता खूप दिवस झाले. जवळपास एक महिना लोटला तरी मागण्यांचा विचार रेल्वे बोर्ड किंवा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला नाही.
दोन्ही कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रेल्वे बोर्ड कोकण रेल्वे बोर्डाने अधिकृत आदेश दिले असल्याचे कळविले. खातरजमा करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, अशा आशयाचे रेल्वे बोर्डाचे पत्र प्राप्त न झाल्याचे सांगितले जात आहे. चेंडूची टोलवाटोलव केली जाते आहे.
नेमकी रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे यांच्या डोक्यात नेमकं चाललंय काय?
एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या मतदार क्षेत्रातील खासदार आपापल्या क्षेत्रातील समस्या घेऊन येतात. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करतात. त्यातील एका खासदारांच्या मागणीला त्वरित हिरवा झेंडा दाखवला गेला. मग मागील दोन अडीच वर्षांपासून कायम पाठपुरावा करीत असलेल्या मागणीला प्रतिक्षा यादीत ढकलून वजनाचा फेरफार रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे प्रशासनाने आमच्या निदर्शनास आणून दिला आहे काय? अशी आगपाखड जनसामान्यांनी केली आहे.
कोंबड्या बकऱ्यांसारखा खचखच गर्दीने भरलेल्या रेल्वेचा प्रवास कोकणी माणूस करतो. कधी जास्तीची अपेक्षा न करणारा कोकणी माणूस कायम अन्याय सहन करतो आहे. संगमेश्वर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज, अनेक धार्मिक स्थळे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे यांमुळे आता पर्यटन वाढले. पण या कंटाळवाण्या रेल्वे प्रवासामुळे पर्यटक नाखुश आहेत.
ऐन सणासुदीच्या दिवसांत अतिरिक्त सोडण्यात येत असलेल्या रेल्वे गाड्या, त्यात मागणी जवळजवळ मान्य झाल्याचा विश्वास यामुळे सगळे चाकरमानी आणि संगमेश्वरची जनता खुशीत होती. पण खासदार नारायण राणे यांच्या भेटीनंतरही उपेक्षित रहावे लागत असेल तर हा मोठ्या प्रतिष्ठेचा विषय आहे. संगमेश्वरच्या या मागण्यांसाठी आमदार, खासदार रेल्वे मंत्र्यांशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. पण तरीही मागण्यांचा विचार होत नाही. प्रतिक्षा यादीत कुठवर संगमेश्वर वासी यांच्या मागण्या घुटमळत ठेवणार? या गणेशोत्सवात थांबे मिळाले तरच बाप्पा पावले म्हणू!
नाहीतर जनसामान्यांचा असंतोष उफाळून येणार,हे मात्र नक्की!
-रुपेश मनोहर कदम/सायले