



मुंबई, दि. 22 ऑगस्ट 2025 : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – माडगाव (MAO) दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस (गाडी क्र. 22229/22230) मध्ये तात्पुरत्या काळासाठी आठ डब्यांऐवजी सोळा डबे लावले जाणार आहेत.
रेल्वेच्या सूचनेनुसार, सध्या या गाडीत ८ डब्यांचा वंदे भारत रेक आहे. मात्र प्रवाशांचा वाढता ताण कमी करण्यासाठी वंदे भारत आता १६ डब्यांच्या रेकसह धावणार आहे. ही वाढीव सुविधा मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी कोणत्या दिवशी सुविधा?
मुंबईहून (गाडी क्र. 22229) : 25 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 29 ऑगस्ट 2025
माडगावहून (गाडी क्र. 22230) : 26 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 30 ऑगस्ट 2025
प्रवाशांना होणारा फायदा
या बदलामुळे हजारो प्रवाशांना अतिरिक्त आसनांची उपलब्धता होणार आहे. विशेषत: सणासुदीच्या दिवसांत प्रवासी तिकिटांची प्रचंड मागणी असते. त्यामुळे प्रवाशांना या तात्पुरत्या वाढीव डब्यांचा मोठा लाभ मिळेल, अशी रेल्वे प्रशासनाची अपेक्षा आहे.
आरक्षणाची सोय
वाढीव डब्यांनुसार आरक्षण व्यवस्थाही तत्काळ अद्ययावत करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. प्रवाशांनी आपली तिकिटे वेळेत आरक्षित करून घ्यावीत, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
“प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आम्ही तात्पुरती ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आगामी सणासुदीमध्ये प्रवाशांना प्रवासाचा त्रास होऊ नये हीच आमची भूमिका आहे,” असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.