दि. 19 नोव्हेंबर 2025 | नवी मुंबई
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्स लिमिटेड (BCSSL) यांनी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) केला असून, कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन सेवा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू झाली आहे. हा करार 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे करण्यात आला.
या संयुक्त उपक्रमाअंतर्गत, प्रारंभी तीन स्टेशन — मडगाव जंक्शन, रत्नागिरी आणि उडुपी — येथे सेवा चाचणी तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. ब्ल्यू क्लाउड कंपनी अत्याधुनिक 5G तंत्रज्ञान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर व सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणारी अग्रणी संस्था असून या सहकार्याद्वारे स्टेशन परिसर आणि रेल्वे डब्यांमध्ये 5G Fixed Wireless Access (FWA) सेवा तसेच इन-स्टेशन आणि इन-ट्रेन डिजिटल मनोरंजन प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या प्रकल्पाचा उद्देश प्रवाशांना जलद इंटरनेट सेवा, वास्तविक वेळेतील माहिती आणि उच्च दर्जाचे मनोरंजन उपलब्ध करणे आहे. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आधुनिक होण्याची अपेक्षा आहे.
POC (Proof of Concept) दरम्यान दोन्ही संस्थांकडून तांत्रिक व कार्यप्रणालीची क्षमता तपासली जाईल, तसेच भविष्यात सेवा विस्ताराचे नियोजन सुलभ होईल. मॉडेल यशस्वी ठरल्यास या सुविधांचा विस्तार कोकण रेल्वेच्या इतर स्थानकांवरही करण्यात येईल. तसेच हा प्रकल्प दीर्घकालीन महसूल-वाटप (Revenue Sharing) पद्धतीवर व्यावसायिक स्वरूपात राबवला जाईल.
या प्रसंगी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा म्हणाले:
“ब्ल्यू क्लाउड सॉफ्टेक सोल्युशन्ससोबतची भागीदारी आमच्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्याच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. 5G कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल मनोरंजन प्रणालींच्या माध्यमातून कोकण रेल्वेला आधुनिक करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल उचलत आहोत. या सहकार्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक समृद्ध होईल आणि भारतीय रेल्वे क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला जाईल.”
![]()


