रत्नागिरी │ २० नोव्हेंबर २०२५
कोकण रेल्वे महामंडळातील कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कता, तात्काळ निर्णयक्षमता आणि समन्वयाच्या मदतीने रेल्वेतून पळून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा शोध लावण्यात येऊन त्याला सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस (क्र. १२६१९) मध्ये प्रवास तपासणी करताना मुख्य प्रवासी तिकीट तपासनीस (एचडी टीई) श्री. प्रदीप झेड. शिरके यांनी गुरुवारी (२० नोव्हेंबर) जनरल कोचमध्ये तिकीटाविना प्रवास करणारा विद्यार्थी वेशातील अल्पवयीन मुलगा आढळला. त्याच्याकडे शाळेची पिशवी असल्याने संशय निर्माण झाला. चौकशीदरम्यान मुलगा घरातून पळून आल्याची माहिती मिळताच श्री. शिरके यांनी तातडीने कमर्शियल कंट्रोलला कळवून रत्नागिरी स्थानकात रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) सहाय्याची मागणी केली.
काही वेळातच RPF पथकाने रत्नागिरी येथे हजर राहून मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. पुढील पडताळणीत संबंधित मुलगा गोवा येथील वास्को-द-गामा येथील शाळेतून बेपत्ता झाल्याचे उघड झाले असून, त्याच्या पालकांनी शोधासाठी माहिती सर्वत्र प्रसारित केली होती.
मुख्य तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची जागरूकता, कमर्शियल कंट्रोल विभागाचा तातडीचा प्रतिसाद आणि RPF च्या समन्वयातून मुलाचा शोध लागला व त्याचे कुटुंबीयांशी सुरक्षित पुनर्मिलन शक्य झाले, अशी माहिती कोकण रेल्वे महामंडळाने प्रसिद्धीपत्रकात दिली.
![]()


