मुंबई : प्रतिनिधी
राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना कोकणातील विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी न मिळणे या प्रश्नांकडे समाजसेवक आकाश पोकळे यांनी लक्ष वेधले आहे. मतदारांनी विकासाच्या निकषावर मतदान करून कोकणाचे हित जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
पोकळे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाचे काम रखडले असून कोकणातील नागरिकांना या समस्येमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विविध प्रकल्पांबाबत स्थानिकांमध्ये असंतोष असून आंदोलने करताना नागरिकांना पोलिसांच्या काठ्यांचा सामना करावा लागणे ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यातही कोकणातील लोकप्रतिनिधी प्रभावीपणे पुढाकार घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रेल्वे स्थानकांवरील स्टॉल, लहान व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील रोजगारात स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
कोकणाचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांच्या हिताच्या दृष्टीने सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत पोकळे यांनी मतदारांना “विचारपूर्वक मतदान करा आणि कोकणाचे संरक्षण करा” असे आवाहन केले.


