सिंधुदुर्ग, २ जानेवारी : कोकण किनारपट्टीवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अभिनव उपक्रम राबवला आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ‘सचेत’ पोर्टलचा वापर करून पर्यटकांच्या मोबाईलवर थेट खबरदारीचे एसएमएस आणि सूचना पाठवल्या जात आहेत.
हा उपक्रम केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण कोकण किनारपट्टीसाठी लागू करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावाला मान्यता देत हे संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली. ३१ डिसेंबर रोजी अनेक पर्यटकांना हे अलर्ट मिळाले, ज्यामुळे ते अधिक सतर्क झाल्याचे दिसून आले.
पर्यटकांना पाठवल्या जाणाऱ्या मुख्य सूचना अशा :
भरती-ओहोटीची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय समुद्रात उतरू नये.
स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
नौकाविहार करताना लाईफ जॅकेटचा वापर अनिवार्य करावा.
अतिगर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
आपत्कालीन मदतीसाठी टोल-फ्री क्रमांक १०७७ किंवा ११२ वर संपर्क साधावा.
‘सचेत’ पोर्टलचा आतापर्यंत पूर, चक्रीवादळ किंवा वीज कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींच्या पूर्वसूचनांसाठीच वापर होत होता. मात्र, पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्याचा असा वापर करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे.
देवबाग पोलिस पाटील भानुदास येरागी म्हणाले, “अशा संदेशांमुळे पर्यटकांमध्ये जनजागृती होते. मनोरंजनाच्या नादात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होतं, पण हे अलर्ट जबाबदारीची जाणीव करून देतात.”
वेंगुर्ले नायब तहसीलदार राजन गवस यांनी सांगितले, “हे संदेश स्थानिक प्रशासनासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत. पर्यटक आता समुद्रात उतरताना आवश्यक दक्षता घेत आहेत.”
प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे कोकणातील पर्यटनाला सुरक्षिततेची मजबूत साथ मिळाली आहे. पर्यटकांनी या सूचनांचे पालन करून सुरक्षित सुट्टीचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


