मुंबई: मध्य रेल्वेच्या कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी रात्री कचरा उचलणाऱ्या ‘मक स्पेशल’ लोकलला भीषण आग लागल्याची घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ज्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास ही आग लागली. ही आग कचरा उचलणाऱ्या मक स्पेशल लोकलच्या पहिल्या डब्याला लागली होती. या डब्यामध्ये रेल्वे रुळांवरून गोळा केलेला कचरा आणि गाळ भरलेला होता. आग लागली तेव्हा हा डबा कुर्ल्यातील ईएमयू सायडिंगवर उभा होता.
आग विझवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला तातडीने ओव्हरहेड केबलचा वीज पुरवठा खंडित करावा लागला.विद्याविहार आणि सायन दरम्यान रात्री ८:३८ ते ८:५५ या वेळेत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.वीज पुरवठा खंडित केल्यामुळे ‘अप’ धीम्या मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे थांबली होती, ज्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
सुदैवाने, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कचऱ्याला आग लागल्याने धुराचे लोट परिसरात पसरले होते, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


