Mumbai: मुंबई उपनगरीय रेल्वेतील अपघातांचे नेमके कारण शोधण्यासाठी आणि तपासात पारदर्शकता आणण्यासाठी मध्य रेल्वेने लोकल गाड्यांच्या मोटर कॅबिनबाहेर हाय-क्वालिटी CCTV कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहिती अधिकारांतर्गत (RTI) विचारलेल्या प्रश्नानंतर ही बाब समोर आली आहे.
सध्या रेल्वे रुळांवरील अपघात, आत्महत्या किंवा तांत्रिक बिघाड यांसारख्या घटनांच्या तपासासाठी केवळ मोटरमनचे विधान किंवा प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवर अवलंबून राहावे लागते, ज्यात अनेकदा विसंगती आढळतात. आता या कॅमेऱ्यांमुळे रेल्वे प्रशासनाकडे ठोस पुरावे उपलब्ध होणार असून, अपघातासाठी मोटरमन जबाबदार आहे की बाह्य घटक, हे स्पष्ट होण्यास मदत होईल. यामुळे मोटरमनवर होणारे खोटे आरोपही थांबतील. मध्य रेल्वेच्या ताफ्यातील १६४ लोकल गाड्यांपैकी १६१ मोटर कॅबिनवर हे कॅमेरे आधीच कार्यान्वित झाले असून, उर्वरित कॅमेरे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. या निर्णयामुळे भविष्यातील रेल्वे अपघात तपास अधिक अचूक आणि पारदर्शक होणार आहे.


