मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका अमेरिकन महिला पर्यटकाला अवघ्या ४०० मीटर अंतरासाठी १८ हजार रुपये (२०० डॉलर्स) आकारून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ५० वर्षीय टॅक्सी चालक देशराज यादव याला अटक केली आहे. पीडित महिलेने सोशल मीडियावर आपली कैफियत मांडल्यानंतर पोलिसांनी या घटनेची स्वतःहून दखल (Suo-motu FIR) घेतली आणि अवघ्या तीन तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला विमानतळावर उतरल्यानंतर जवळच असलेल्या ‘हिल्टन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यासाठी टॅक्सीत बसली होती. हॉटेलचे अंतर अवघे ४०० मीटर असतानाही, चालकाने तिला थेट हॉटेलवर न नेता अंधेरी पूर्व परिसरात सुमारे २० मिनिटे फिरवले. तिला एका अनोळखी ठिकाणी नेऊन भीती दाखवण्यात आली आणि त्यानंतर हॉटेलवर सोडण्यासाठी १८ हजार रुपयांची मागणी केली गेली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने टॅक्सी क्रमांक (MH 01 BD 5405) आणि आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. पोलिसांनी या प्रकरणी टॅक्सी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.


