नवी दिल्ली: यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली असून, राज्याला राज्यांच्या श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गणेशोत्सव आणि आत्मनिर्भरता’ या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथाने उपस्थितांची मने जिंकली. या चित्ररथावर पारंपरिक लेझीम नृत्य सादर करणाऱ्या महिला पथकाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. राज्यांच्या या स्पर्धेत जम्मू-काश्मीरने दुसरे, तर केरळने तिसरे स्थान पटकावले आहे.
लष्करी दलांमध्ये भारतीय नौदलाला सर्वोत्तम संचलन तुकडीचा बहुमान मिळाला आहे. तर निमलष्करी दलांमध्ये दिल्ली पोलीस ही सर्वोत्तम तुकडी ठरली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांच्या चित्ररथांमध्ये सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘वंदे मातरम’ संकल्पनेवरील चित्ररथाला पहिले पारितोषिक देण्यात आले. या चित्ररथातून वंदे मातरम गीताचा १५० वर्षांचा वारसा आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे योगदान अतिशय देखण्या पद्धतीने मांडण्यात आले होते.
लोकपसंती (Popular Choice) श्रेणीमध्ये मात्र निकाल काहीसे वेगळे राहिले. यामध्ये नागरिकांनी आसाम रेजिमेंटला सर्वोत्तम लष्करी तुकडी आणि गुजरातच्या चित्ररथाला राज्यांच्या श्रेणीमध्ये पहिले स्थान दिले आहे. गुजरातच्या चित्ररथाची संकल्पना ‘स्वदेशीचा मंत्र’ यावर आधारित होती. लोकपसंती श्रेणीत उत्तर प्रदेश दुसऱ्या आणि राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर राहिले. या सर्व विजेत्यांना ३० जानेवारी रोजी एका विशेष सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.


