बदलापूर: मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकात धावती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात आज एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, यामध्ये गाडी फलाटावरून सुटत असताना ती पकडताना महिलेचा तोल गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, या अपघातानंतर रेल्वेच्या ढिसाळ नियोजनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नेमकी घटना काय?
सकाळच्या गर्दीच्या वेळी (Peak Hours) बदलापूर स्थानकावर ही घटना घडली. समोर आलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओनुसार, लोकल फलाटावरून वेग घेत होती. त्याच वेळी या महिलेने डब्यात चढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा पाय घसरला आणि ती थेट रेल्वे आणि फलाट यांच्यातील फटीत पडली. उपस्थित प्रवाशांनी आरडाओरड करेपर्यंत आणि गाडी थांबेपर्यंत खूप उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू झाला
अपघाताला जबाबदार कोण?
बदलापूर रेल्वे स्थानकावरील या दुर्दैवी अपघाताकडे पाहिल्यास, प्रथमदर्शनी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती महिलाच याला जबाबदार असल्याचे भासते. मात्र, या अपघाताला केवळ वैयक्तिक चूक मानणे तांत्रिकदृष्ट्या सोपे असले, तरी त्यामागील ईतर कारणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेच्या विस्कळीत नियोजनाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. बदलापूर ते दादर हा साधारण तासाभराचा प्रवास आता चक्क दीड ते पावणेदोन तास घेत आहे. सकाळी नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांवर कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्याचे प्रचंड दडपण असते आणि रेल्वेच्या ‘लेट-लतीफी’मुळे हे दडपण अधिकच वाढते. याच मानसिक तणावातून प्रवासी जीव धोक्यात घालून धावती गाडी पकडण्याचा धोका पत्करतात.
या परिस्थितीला रेल्वेचे विसंगत प्राधान्यक्रम मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. सकाळी जेव्हा नोकरदार वर्गाची सर्वाधिक गर्दी असते (पीक अवर्स), तेव्हा प्रशासनाकडून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जाते. बदलापूरहून निघालेली लोकल गाडी ठाण्यापर्यंत वेळेत पोहोचते, परंतु त्यानंतर फास्ट ट्रॅकवर एक्सप्रेस गाड्यांची रांग असल्याने लोकलचा वेग बैलगाडीसारखा होतो. जलद मार्ग पूर्णपणे ‘जाम’ झाल्यामुळे लोकल गाड्या रखडतात.
हे रोजचेच झाले असल्याने कामावर वेळेवर पोहोचण्यासाठी आणि लेट मार्क वाचवण्यासाठी बहुतेक जणांना आता आपल्या नेहमीच्या गाडी आधी अर्धा पाउण तासतास पूर्वीची गाडी पकडावी लागत आहे. प्रवाशांची खासकरून महिला वर्गाची जी आपली घरची कामे आटोपून नोकरी करतात त्यांची खूपच मोठी धावपळ होत आहे. अशा धावपळीत गाडी पकडताना असे अपघात होत आहेत.
रेल्वे प्रशासनाने यावर लवकरात लवकर याकडे लक्ष देवून गाड्यांचे लेटमार्क कमी करावेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ 👇


