मुंबई | जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी कोकणातील अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव आंगणेवाडी जत्रा पार पडणार आहे. यामुळे ६ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुंबई/पुणे ते कोकण व कोकण ते मुंबई/पुणे मार्गावर प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
या काळात मतदार, मतदान व शासकीय कर्मचारी, सुरक्षा दल तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी जाणारे व परतीच्या प्रवासातील लाखो भाविक मोठ्या संख्येने प्रवास करतील. मागील अनुभव लक्षात घेता, कोकण रेल्वे मार्गावरील सध्याच्या नियमित गाड्या ही अतिरिक्त गर्दी हाताळण्यासाठी अपुऱ्या ठरण्याची शक्यता असून, यामुळे प्रचंड गर्दी, प्रतीक्षा यादी (वेटिंग), तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
या पार्श्वभूमीवर, ६, ७, ८, ९ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवाव्यात, अशी ठाम मागणी कोकण विकास समिती (शहरी व ग्रामीण विभाग) यांच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रस्तावित विशेष गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असावे अशी विनंती कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे.

या विशेष गाड्यांमुळे कोकणकडे जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यमान सेवांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होईल, तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व शिस्तबद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
तातडीने निर्णयाची अपेक्षा
मागणी निश्चित असून नियोजनासाठी वेळ मर्यादित असल्याने, या विशेष गाड्यांना लवकर मंजुरी देऊन तातडीने अधिसूचना जारी करावी, अशी जोरदार विनंती करण्यात आली आहे. वेळेत सकारात्मक निर्णय झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि स्थानिक प्रशासनालाही नियोजनात मदत होईल.
ही मागणी जयवंत शंकर दरेकर व अक्षय मधुकर महापदी (कोकण विकास समिती – शहरी व ग्रामीण विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे.


