सावंतवाडी: बांदा ते सावंतवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान नियमित एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी आज शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी एसटी डेपोसमोर भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाला ‘रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी’ यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटणार आहेत.
हे आंदोलन जिल्हा परिषद सदस्य श्री. नितीन सावंत आणि पंचायत समिती सदस्य श्री. सदाशिव राणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. बांदा, निगुडे, शेर्ले, इन्सुली, कास, वाफोली, डेगवे, विलवडे, निरवडे, रोणापाल, मडुरा, सोनुर्ली, मळगांव आणि वेत्ये या गावांतील सरपंच, माजी सरपंच, ग्रामस्थ, युवक मंडळे, महिला मंडळे, प्रवासी आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बऱ्याच काळापासून बांदा परिसरातील प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी हक्काची बस सेवा उपलब्ध नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करूनही एसटी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे. जोपर्यंत एसटी प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.


