चीपी विमानतळाला १००% व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर!
Follow us onमुंबई: महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळ (Chipi Airport) ला १००% Viability Gap Funding (VGF) मंजूर झाली आहे. यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग (चीपी) ही हवाई सेवा आता आठवड्यातील सातही दिवस नियमितपणे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानभवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, “चीपी विमानतळाला पूर्ण VGF सुविधा मिळाल्यामुळे आता ही सेवा खंडित होणार नाही. कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक नागरिकांच्या प्रवासासाठी ही मोठी सुविधा ठरेल.”
VGF म्हणजे काय?
VGF चा पूर्ण अर्थ Viability Gap Funding असा होतो.
मराठीत याचा अर्थ व्यवहार्यता अंतर निधी किंवा व्यवहार्यता अंतर अनुदान असा होतो. काही महत्त्वाच्या प्रकल्प (उदा. विमानतळ, रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी) आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आणि समाजासाठी खूप गरजेचे असतात. पण खासगी कंपनीसाठी ते पूर्णपणे नफा कमावणारे (financially viable) नसतात – म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असते.अशा प्रकल्पांना खासगी भागीदार (Private sector) पुढे येण्यासाठी सरकार VGF म्हणून एकदा किंवा टप्प्याटप्प्याने अनुदान (ग्रँट) देते. हे अनुदान कर्ज (loan) नाही, तर थेट मदत असते. यामुळे प्रकल्पाची “व्यवहार्यता अंतर” (viability gap) भरून काढली जाते आणि प्रकल्प सुरू होऊ शकतो.
चीपी विमानतळासाठी १००% VGF मंजूर झाल्याचा अर्थ – विमानतळ चालवण्यासाठी लागणारा निधीचा मोठा भाग सरकार देईल, जेणेकरून विमान कंपनीला तोटा होणार नाही आणि मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान रोजची विमानसेवा सुरू राहू शकेल.


