चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या मान्सूनपूर्व (Non-Monsoon) वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला असून, याची अंमलबजावणी त्वरित लागू करण्यात आली आहे. यामध्ये गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.
या सुधारित वेळापत्रकानुसार, चिपळूण स्थानकावर या गाडीची जुनी वेळ १९:४६ / १९:४८ अशी होती. आता ही गाडी चिपळूण स्थानकावर ६ मिनिटे आधी म्हणजे १९:४० वाजता पोहोचेल आणि १९:४२ वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदललेल्या वेळेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे की, प्रवाशांनी इतर स्थानकांवरील अधिकृत वेळापत्रकासाठी ‘नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम’च्या (NTES) संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिकृत अपडेट्ससाठी ‘कोकण रेल्वे मिरर’ (KR Mirror) या ॲपचा वापर करावा जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.


