“… जर गाड्याच थांबत नसतील, तर पर्यटक कोकणात येणार कसे?” – दीपक केसरकर

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुरवस्थेवर आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत आवाज उठवत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये लवकरात लवकर विलिनीकरण करावे, जेणेकरून या भागातील रेल्वे प्रश्नांचा कायमस्वरूपी मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी ठामपणे मांडले.

​केसरकर यांनी भाषणादरम्यान नमूद केले की, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांच्या बाह्य सुशोभीकरणाचे काम झाले असले, तरी अंतर्गत प्रवासी सुविधा अद्यापही अपूर्ण आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने पुढाकार घेऊन या सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची विनंतीही त्यांनी सभागृहात केली.

​कोकणच्या पर्यटनावर भाष्य करताना केसरकर यांनी रेल्वे थांब्यांचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. “जर गाड्या स्थानकांवर थांबणारच नसतील, तर पर्यटक कोकणात कसे येणार?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन प्रमुख स्थानकांवर सध्या न थांबणाऱ्या जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. केसरकर यांच्या या पाठपुराव्यामुळे आतातरी कोकणचे हक्काचे सावंतवाडी टर्मिनस पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि प्रवाशांचे हाल थांबतील, अशी आशा कोकणवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search