पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) तर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना” अंतर्गत पुण्यातून अष्टविनायक यात्रेची दुसरी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ही दुसरी यात्रा आयोजित करण्यात येत असून, ४ व ५ एप्रिल २०२६ (शनिवार व रविवार) या दोन दिवसांच्या कालावधीत ही यात्रा पार पडणार आहे.
या यात्रेदरम्यान प्रवाशांना सर्व सुखसोयींसह अष्टविनायकाचे दर्शन घडवण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी विशेष किटचीही व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांमार्फत प्रवाशांची काळजी घेतली जाणार असून सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची हमी दिली जात आहे.
या यात्रेसाठी प्रति व्यक्ती पॅकेज दर जाहीर करण्यात आले आहेत. पुरुषांसाठी ३,५०० रुपये, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३,००० रुपये, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी २,४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. इच्छुक प्रवाशांनी त्वरित नोंदणी करून या धार्मिक यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाकडून करण्यात आले आहे. बुकिंगसाठी संबंधित आगाराशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.
पहिल्या अष्टविनायक यात्रेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर,आता घेऊन येत आहोत दुसरी यात्रा…..🌸 pic.twitter.com/9T4hrE2DsI
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) March 19, 2026


