Author Archives: Kokanai Digital

दादर – रत्नागिरी पॅसेंजरने ‘स्लॉट’ गमावला! मुंबई-कोकणातील लाखो प्रवाशांच्या नाकावर टिच्चून दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी

   Follow us on        

मुंबई : मुंबई आणि कोकणातील लाखो प्रवाशांच्या नाकावर टिच्चून मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या स्लॉटवर आता दादर-गोरखपूर एक्सप्रेस कायमस्वरूपी चालवण्यास मंजुरी दिली आहे. हा मोठा धक्का देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार रवी किशन यांना दिलेल्या अधिकृत पत्रातून ही माहिती समोर आली आहे. विशेष गाडी क्रमांक ०१०२७/०१०२८ ला नियमित दर्जा देऊन ती आता ११०४७/११०४८ दादर-गोरखपूर एक्सप्रेस म्हणून चालवली जाणार आहे. या निर्णयामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

या निर्णयावर माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कोकणातील प्रवाशांच्या अडचणींचा मुद्दा उपस्थित करत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली आहे. विशेषतः कामगार वर्ग आणि स्थानिक प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दादर-रत्नागिरी गाडीचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याने आता ही सेवा दिवा कायमस्वरूपी स्थानकावरून चालवली जाणार आहे. ही गाडी दादर पर्यंत पूर्ववत होण्याची आशाही आता नष्ट झाली आहे.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोरोनापूर्वी दादर ते रत्नागिरी दरम्यान चालविण्यात येत होती. मात्र कोरोना काळात ‘झिरो टाइमटेबल’ च्या नावाखाली दिवा स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आली. मात्र त्यानंतर प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनही आजतागायत तिची सेवा पूर्ववत करण्यात आली नव्हती. ही गाडी दादर पर्यंत नेण्यासाठी स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण यासाठी देण्यात येत होते. मात्र त्याच स्लॉटवर विशेष गाडी ०१०२७/०१०२८ दादर-गोरखपूर ही चालविण्यात आली. याविरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या विरोधात मोर्चाही काढण्यात आला होता आणि दादर – रत्नागिरी पॅसेंजर गाडी पूर्ववत करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र आता हा स्लॉट कायमस्वरूपी दादर-गोरखपूर एक्सप्रेसला दिल्याने त्या मागणीला केराची टोपली दाखविली गेल्याचे दिसत आहे.

या बदलामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेने ऑपरेशनल कार्यक्षमतेचा दाखला देत हा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक प्रवाशांच्या सोयींचा विचार न केल्याची टीका होत आहे. आपली हक्काची गाडी मुंबई बाहेर नेवून त्याजागी ही लांब पल्ल्याची गाडी कायम केल्याने प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

कोकण रेल्वे विलीनीकरणाचा चेंडू कर्नाटक आणि केरळ सरकारच्या कोर्टात

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि गोवा सरकारने कोकण रेल्वे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, कर्नाटक आणि केरळ सरकारने अद्याप यावर आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही किंवा संमती दिलेली नाही. जोपर्यंत ही दोन राज्ये सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही असे विधान लोकसभेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान केले.

लोकसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कोकण रेल्वेच्या सद्यस्थितीवर आणि भविष्यातील विस्तार योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारले. त्यांनी विशेषतः कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा (Doubling) सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) कधी पूर्ण होईल आणि या मार्गावर प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त वंदे भारत गाड्या कधी सुरू होतील, याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

खासदार वायकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मधील तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी स्पष्ट केल्या. त्यांनी सांगितले की, कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेच्या इतर विभागांप्रमाणे नसून ती एक स्वतंत्र कॉर्पोरेशन आहे, ज्यामध्ये भारत सरकारसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ ही चार राज्ये भागधारक (Shareholders) आहेत. यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना या सर्व राज्यांची संमती आवश्यक असते.

कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरणाबाबत बोलताना रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली की, महाराष्ट्र आणि गोवा सरकारने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, कर्नाटक आणि केरळ सरकारने अद्याप यावर आपली स्पष्ट भूमिका मांडलेली नाही किंवा संमती दिलेली नाही. जोपर्यंत ही दोन राज्ये सहकार्य करत नाहीत, तोपर्यंत विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यांनी या राज्यांना वैयक्तिक हित बाजूला ठेवून देशाच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाबाबत त्यांनी स्पष्ट केले की, ७४० किमी लांबीच्या या मार्गावरील काही महत्त्वाच्या ‘चोक पॉइंट्स’ (जिथे वाहतूक कोंडी होते) च्या दुपदरीकरणासाठी डीपीआर तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत रेल्वेचे बजेट लक्षणीयरीत्या वाढवण्यात आले असून, तांत्रिक बाबींची पूर्तता होताच या कामाला गती दिली जाईल. तसेच सुरक्षितता आणि वेग वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेवटी, वंदे भारत सारख्या आधुनिक गाड्यांच्या मागणीवर बोलताना त्यांनी आश्वासन दिले की, रेल्वे नेटवर्कच्या विस्तारासोबतच प्रवाशांची गरज लक्षात घेऊन नवीन गाड्यांचे नियोजन केले जाईल. कोकण रेल्वे हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दळणवळणाचा कणा आहे, त्यामुळे या मार्गावरील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे हे सरकारचे प्राधान्य आहे.

कोकण रेल्वे संबधित प्रलंबित मागण्यांसाठी १ मे रोजी आमरण उपोषणाचा इशारा

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ ‘जल फाउंडेशन कोकण विभाग’ आणि ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती’ आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. येत्या ३० एप्रिल २०२६ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास, १ मे २०२६ (महाराष्ट्र दिन) रोजी कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​प्रशासकीय दिरंगाईचा प्रवाशांना फटका

​या संदर्भात १० सप्टेंबर २०२५ रोजी बेलापूर कार्यालयात जल फाउंडेशनच्या प्रतिनिधींची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. या बैठकीत समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक आश्वासन देण्यात आले होते, मात्र आजपर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

​”आम्ही गेल्या सहा वर्षांपासून रेल्वेकडे विविध मागण्या केल्या आहेत. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी विभाजनासाठी काही उपायही सुचवले आहेत. परंतु रेल्वेकडून दाद मिळत नसल्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येत आहे.”

— अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र.

​प्रमुख मागण्या:

​रत्नागिरी पॅसेंजर (५०१०३/०४): या गाडीतील आरक्षित डबे पुन्हा सुरू करणे.

​मुंबई-चिपळूण नवीन गाडी: मुंबई (CSMT/दादर/LTT) ते चिपळूण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देणारी दैनंदिन गाडी सुरू करणे.

​खेड रेल्वे स्थानक थांबा: जनशताब्दी, गरीब रथ, गोवा संपर्क क्रांती यांसारख्या महत्त्वाच्या गाड्यांना खेड येथे थांबा देणे.

​कोटा (GN Quota): मडगाव-एलटीटी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसमधील सर्व स्थानकांसाठी असलेला मूळ स्टेशन कोटा पूर्ववत करणे.

​गाड्यांचे पुनरुज्जीवन: रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी कोविडपूर्व स्थितीप्रमाणे पुन्हा सुरू करणे.

​अंतिम इशारा

​जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन जाधव यांनी स्पष्ट केले की, १० सप्टेंबरच्या बैठकीनंतर रेल्वेकडून कोणतेही अधिकृत पत्र प्राप्त झालेले नाही. जर ३० एप्रिलपर्यंत ठोस निर्णय झाला नाही, तर १ मे रोजी नाईलाजाने उपोषण सुरू करावे लागेल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी कोकण रेल्वे प्रशासन जबाबदार असेल.

Mumbai Local: ठाणे स्थानकावरील गर्दीवर तोडगा; ठाणेकरांना मिळणार अजून एक रेल्वे स्थानक

नवीन रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची आग्रही मागणी

   Follow us on        

ठाणे : ठाणे आणि मुलुंड या दोन स्थानकांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून एका नवीन स्थानकाची निर्मिती केली जात आहे. हे नवीन स्थानक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर उभारले जात असून, यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी विभागली जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे घोडबंदर रोड, वागळे इस्टेट आणि आसपासच्या परिसरातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​या पार्श्वभूमीवर, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी या नवीन रेल्वे स्थानकाला शिवसेना नेते दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली आहे. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असून, ते आजही जनमानसात अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून या स्थानकाला त्यांचे नाव देणे ही त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे.

​खासदार नरेश म्हस्के यांनी या मागणीबाबत रेल्वे मंत्रालयाकडे आणि राज्य सरकारकडे औपचारिक पाठपुरावा सुरू केला आहे. या संदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रस्तावावर वेगाने कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. ठाणे शहराच्या अस्मितेशी जोडले गेलेले हे नाव प्रवाशांच्या भावनांशी देखील जुळलेले असल्याचे त्यांनी नमूद केले असून, या प्रस्तावामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

​हे नवीन स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या देखील सुटण्यास मदत होईल. सध्या या स्थानकाचे काम वेगाने सुरू असून, त्याला ‘आनंद दिघे’ यांचे नाव मिळाल्यास ठाणेकरांसाठी हे स्थानक ऐतिहासिक महत्त्वाचे ठरेल. आता या प्रस्तावावर रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदलापूर – नवी मुंबई रेल्वेने जोडण्याच्या हालचालींना वेग

   Follow us on        

ठाणे: बदलापूर आणि वांगणी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान ‘कासगाव’ (चामटोली) येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात प्रस्ताव मागविला असून, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन स्थानकापासून नवी मुंबईतील कामोठेपर्यंत थेट रेल्वे मार्ग टाकण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास बदलापूर परिसरातील नागरिक थेट लोकलने नवी मुंबईला जो़डले जातील.

​वाढत्या प्रवासी संख्येवर उपाय आणि टर्मिनसचा दर्जा

बदलापूर आणि आसपासच्या भागात नागरी वस्ती झपाट्याने वाढत असल्याने रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे, ज्यामुळे सध्याचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बदलापूर स्थानकाला ‘टर्मिनस’चा दर्जा देण्याची मागणी केली. या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतचा तांत्रिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

​कासगाव स्थानकाचे महत्त्व आणि प्रवाशांना दिलासा

बदलापूर शहराच्या वेशीवरील ग्रामपंचायतींमध्ये लोकसंख्या वाढत आहे, मात्र मुंबईकडे जाण्यासाठी या प्रवाशांना बदलापूर किंवा वांगणी स्थानकावर अवलंबून राहावे लागते. वांगणीतून लोकलची संख्या कमी असल्याने प्रवाशांचे हाल होतात. अशा वेळी बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगाव येथे नवीन स्थानक झाल्यास स्थानिकांचा प्रवास सोपा होईल. तसेच, येथून कामोठेपर्यंत नवा मार्ग झाल्यास नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे.

​भविष्यातील सुविधा आणि वंदे भारत एक्सप्रेस

रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर स्थानकात अतिरिक्त फलाट उपलब्ध होणार आहेत. यामुळे बदलापूर ते पुणे दरम्यान ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याबाबत अभ्यास करण्याच्या सूचनाही रेल्वेमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच, फलाटांची लांबी वाढल्यामुळे भविष्यात अनेक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना बदलापूर स्थानकात थांबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, रेल्वे व्यवस्थापकांना या सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चीपी विमानतळाला १००% VGF मंजूर! मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार;

चीपी विमानतळाला १००% व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) मंजूर!

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळ (Chipi Airport) ला १००% Viability Gap Funding (VGF) मंजूर झाली आहे. यामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग (चीपी) ही हवाई सेवा आता आठवड्यातील सातही दिवस नियमितपणे सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानभवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, “चीपी विमानतळाला पूर्ण VGF सुविधा मिळाल्यामुळे आता ही सेवा खंडित होणार नाही. कोकणातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक नागरिकांच्या प्रवासासाठी ही मोठी सुविधा ठरेल.”

VGF म्हणजे काय?

VGF चा पूर्ण अर्थ Viability Gap Funding असा होतो.

मराठीत याचा अर्थ व्यवहार्यता अंतर निधी किंवा व्यवहार्यता अंतर अनुदान असा होतो. काही महत्त्वाच्या प्रकल्प (उदा. विमानतळ, रस्ते, रेल्वे, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण इत्यादी) आर्थिकदृष्ट्या फायद्याचे आणि समाजासाठी खूप गरजेचे असतात. पण खासगी कंपनीसाठी ते पूर्णपणे नफा कमावणारे (financially viable) नसतात – म्हणजे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असते.अशा प्रकल्पांना खासगी भागीदार (Private sector) पुढे येण्यासाठी सरकार VGF म्हणून एकदा किंवा टप्प्याटप्प्याने अनुदान (ग्रँट) देते. हे अनुदान कर्ज (loan) नाही, तर थेट मदत असते. यामुळे प्रकल्पाची “व्यवहार्यता अंतर” (viability gap) भरून काढली जाते आणि प्रकल्प सुरू होऊ शकतो.

चीपी विमानतळासाठी १००% VGF मंजूर झाल्याचा अर्थ – विमानतळ चालवण्यासाठी लागणारा निधीचा मोठा भाग सरकार देईल, जेणेकरून विमान कंपनीला तोटा होणार नाही आणि मुंबई-सिंधुदुर्ग दरम्यान रोजची विमानसेवा सुरू राहू शकेल.

 

 

 

 

 

 

 

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी हालचालींना वेग

   Follow us on        

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांना पर्यावरणपूरक पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पावर शिक्कामोर्तब केले आहे. विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार असून, यासाठी आवश्यक बोटींची बांधणी करण्यासाठी स्वदेशी शिपयार्ड विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

​स्वदेशी बनावटीच्या बोटींवर भर

​मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, जलप्रवासी वाहतुकीसाठी लागणाऱ्या आधुनिक बोटींची बांधणी आपल्याच शिपयार्डमध्ये व्हावी. यासाठी देशातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक शिपयार्ड सुविधा विकसित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. “शिपयार्ड विकसित करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका,” असे आदेश देतानाच, दुसऱ्या टप्प्यात बोटींच्या बांधणीसाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा निश्चितीला प्राधान्य देऊन जलवाहतुकीला गती देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

​DPR प्राप्त; लवकरच प्रत्यक्ष अंमलबजावणी

​मुंबई महानगर प्रदेशासाठी वॉटर मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) शासनाला प्राप्त झाला आहे. मुंबईतील वाढती गर्दी आणि रस्ते वाहतुकीवरील ताण पाहता, जलवाहतूक हा एक सुरक्षित आणि माफक दरातील पर्याय ठरणार आहे. या बैठकीला बंदरे मंत्री नितेश राणे, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे आणि महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

​या प्रकल्पामुळे मुंबई आणि आसपासच्या खाडी परिसरातील दळणवळण सुलभ होऊन सामान्यांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. लवकरच मुंबईच्या किनाऱ्यावर आधुनिक वॉटर मेट्रोचे जाळे नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

 

सुरक्षित आणि वेगवान डिलिव्हरीसाठी पोस्टाची ‘२४ स्पीड पोस्ट’ आणि ‘४८ स्पीड पोस्ट’ प्रीमियम सेवा सुरू

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय टपाल विभागाने खाजगी कुरियर कंपन्यांना तगडी स्पर्धा देण्यासाठी १७ मार्च २०२६ रोजी ‘२४ स्पीड पोस्ट’ ही आपली नवीन प्रीमियम सेवा अधिकृतपणे सुरू केली आहे. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते नवी दिल्लीत या सेवेचे औपचारिक उद्घाटन झाले. ही सेवा प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख महानगरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दस्तऐवज आणि पार्सलची पुढील दिवशी (D+1) हमी दिलेली डिलिव्हरी मिळणार असून, ही सेवा तातडीच्या कामांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

​ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून यामध्ये ओटीपी (OTP) आधारित हस्तांतरणाची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे पार्सल केवळ अधिकृत व्यक्तीलाच प्राप्त होईल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि एसएमएस अलर्टची सुविधा मिळेल. विशेष म्हणजे, जर डिलिव्हरीमध्ये विलंब झाला, तर ग्राहकांना पैसे परत मिळण्याची ‘मनी-बॅक गॅरंटी’ देखील भारत पोस्टने दिली आहे. ‘२४ स्पीड पोस्ट’ सोबतच टपाल विभागाने ‘२४ स्पीड पोस्ट पार्सल’ आणि ‘४८ स्पीड पोस्ट’ (दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी) या सेवाही सुरू केल्या आहेत. ई-कॉमर्सच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या त्वरित सेवेच्या अपेक्षा लक्षात घेऊन भारत पोस्टने आपले हे डिजिटल आणि वेगवान लॉजिस्टिक्सचे पाऊल उचलले आहे.

 

 

 

भांडुप स्थानकावर एसी लोकलचा थरार; अनियंत्रित वेगामुळे रेल्वे प्लॅटफॉर्म ओलांडून पुढे!

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर आज, १७ मार्च २०२६ रोजी सकाळी एक थरारक घटना घडली. CSMT हून कल्याणच्या दिशेने जाणारी ९५७११ क्रमांकाची जलद एसी लोकल भांडुप स्थानकात निर्धारित वेळेत पोहोचली खरी, मात्र प्लॅटफॉर्मवर थांबण्याऐवजी ती वेगाने पुढे निघून गेली. स्थानकात प्रवेश करताना गाडीचा वेग अधिक होता आणि मोटरमनने ब्रेक लावूनही गाडीचे अनेक डबे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे ओव्हरशूट झाले. या अनपेक्षित प्रकारामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये प्रचंड भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद झालेली नाही.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या ओव्हरशूटच्या घटनेमुळे ट्रेनला सुमारे ६ मिनिटांचा उशीर झाला. दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत, विशेषतः ब्रेकिंग आणि स्पीड कंट्रोलच्या तांत्रिक बाबींवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, भविष्यात अशा धोकादायक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

बंद दरवाजे असल्याने अनर्थ टळला. 

सुदैवाने ही एसी लोकल असल्याने तिचे दरवाजे बंद होते, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला; अन्यथा वेगातील गाडीतून प्रवासी खाली पडण्याची भीती होती.

१ कोटींचा ‘सुपर’ टीटीई! मुंबईच्या तिकीट तपासनीसाने बनवला रेल्वेचा नवा रेकॉर्ड.

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने चालू आर्थिक वर्षात कर्तव्याचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक (CTI) मोहम्मद शम्स यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कडक मोहीम राबवत १ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या विक्रमी टप्प्यापर्यंत पोहोचणारे ते मुंबई विभागातील पहिले तिकीट तपासनीस ठरले असून, त्यांच्या या कामगिरीची रेल्वे वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

​मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मोहम्मद शम्स यांनी १ एप्रिल २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत आपल्या नियमित तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई केली. या सुमारे साडे अकरा महिन्यांच्या काळात त्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडत विनातिकीट प्रवास करणाऱ्या एकूण ११,४८३ प्रवाशांना पकडले. या मोहिमेतून त्यांनी रेल्वेच्या तिजोरीत एकूण १.०३ कोटी रुपये दंड स्वरूपात जमा केले आहेत, जो एका वैयक्तिक कर्मचाऱ्यासाठी अत्यंत मोठा आकडा मानला जातो.

​मोहम्मद शम्स यांच्या या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल खुद्द ‘डीआरएम मुंबई सीआर’ (DRM Mumbai CR) यांनी घेतली आहे. रेल्वे प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या यशाचा गौरव केला असून, त्यांना मिळालेला हा ‘मैलाचा दगड’ इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी शम्स यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

​रेल्वे प्रशासनाने या निमित्ताने प्रवाशांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, त्यांनी रेल्वेने प्रवास करताना नेहमी वैध तिकीट किंवा पास सोबत ठेवावा. विनातिकीट प्रवास करणे हा केवळ दंडनीय अपराध नसून, त्यामुळे रेल्वेच्या साधनसामग्रीवर विनाकारण ताण पडतो. सन्मानाने आणि कायदेशीर मार्गाने प्रवास करून रेल्वेला सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search