Author Archives: Kokanai Digital

Mumbai Water Metro: १० जलमार्ग, २१ स्थानके आणि २२१ किमी लांबी.. मुंबईची ‘वॉटर मेट्रो’ अशी असेल

   Follow us on        

मुंबई: कोची वॉटर मेट्रोच्या जागतिक यशानंतर आता मुंबई महानगर क्षेत्रातही (MMR) जलवाहतुकीचे मोठे जाळे निर्माण होणार आहे. मुंबईच्या अथांग किनारपट्टीचा आणि खाड्यांचा वापर करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने ‘वॉटर मेट्रो’ प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) स्वीकारला असून, या कामाला आता वेग आला आहे. बंदरे मंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पाची माहिती दिली. हा प्रकल्प सुमारे २,४०० कोटी रुपयांचा असून, यामुळे मुंबईकरांना रेल्वे आणि रस्त्यांव्यतिरिक्त एक वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संपूर्ण मुंबई आणि उपनगरांना जोडणारे १० जलमार्ग (Routes) विकसित केले जाणार आहेत. या जलमार्गांचे एकूण जाळे सुमारे २१५ किलोमीटर लांबीचे असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण २१ आधुनिक टर्मिनल्स (स्थानके) उभारली जाणार असून, ७० पेक्षा जास्त बोटींचा ताफा या मार्गांवर धावणार आहे. यामध्ये वसई-मीरा भाईंदर-ठाणे-वाशी-नवी मुंबई विमानतळ, बोरीवली-मार्वे-वर्सोवा-वांद्रे आणि गेटवे ऑफ इंडिया ते नवी मुंबई यांसारख्या महत्त्वाच्या दुव्यांचा समावेश आहे. तसेच दक्षिण मुंबईला जोडण्यासाठी वांद्रे-वरळी-नरिमन पॉईंट असा जलमार्गही प्रस्तावित आहे.

​या प्रकल्पामुळे मुंबईतील रस्ते आणि लोकल ट्रेनवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित २१ स्थानकांमध्ये वसई, मीरा भाईंदर, गायमुख (ठाणे), कोलशेत, मुंब्रा, कल्याण (गणेश घाट), ऐरोली, वाशी, बेलापूर, गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, वांद्रे, वरळी आणि वर्सोवा यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला असून, हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. जर या प्रकल्पाची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली, तर मुंबईची किनारपट्टी ही शहराच्या वाहतुकीची नवीन ‘लाईफलाईन’ ठरू शकते.

 

रेल्वे प्रवासासाठी ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी असलेल्या सवलती सुरू करा- खासदार संजय दीना पाटील

   Follow us on        

​नवी दिल्ली: ​रेल्वे प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत पुन्हा चालू करावी अशी मागणी खासदार संजय दीना पाटील यांनी काल लोकसभेत केली.

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आता प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधताना खासदार संजय दीना पाटील यांनी लोकसभेत मुंबई आणि उपनगरातील लोकल गाड्यांच्या फेऱ्या तातडीने वाढवण्याची मागणी केली. प्रवाशांची वाढती संख्या आणि उपलब्ध गाड्यांचे प्रमाण यात मोठी तफावत असल्याने सामान्य मुंबईकरांचे हाल होत असून, रेल्वे प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

​रेल्वे प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केल्याबद्दल खासदार पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोना काळापासून ही सवलत बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. ही सवलत केवळ आर्थिक मदत नसून तो त्यांचा सन्मान आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कोणताही विलंब न लावता ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे सवलत तात्काळ बहाल करावी, जेणेकरून त्यांना या उतारवयात आर्थिक दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

​सर्वसामान्य जनतेच्या धार्मिक भावनांचा विचार करून रेल्वेने तीर्थक्षेत्रांसाठी विशेष योजना आखावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी मांडली. अयोध्या, वाराणसी आणि वैष्णोदेवी यांसारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. अशा प्रवाशांसाठी रेल्वेने ‘स्वस्त दरातील विशेष टुरिस्ट पॅकेज’ सुरू केल्यास सामान्य नागरिकांना कमी खर्चात आणि सुरक्षितपणे देवदर्शन करणे शक्य होईल, असे पाटील यांनी नमूद केले.

​शेवटी, मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा अधिक कार्यक्षम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केवळ घोषणा न करता जमिनीवर प्रत्यक्ष बदल दिसायला हवेत, तरच मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि सुखाचा होईल. रेल्वे अर्थसंकल्पात आणि नियोजनात मुंबईच्या लोकल प्रवाशांच्या मागण्यांना प्राधान्य मिळावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

Sawantwadi: मळगाव घाटीत रस्त्यावर डिझेल सांडल्याने अपघात; ५ ते ६ दुचाकीस्वार जखमी

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २० : सावंतवाडी–रेडी मार्गावरील मळगाव घाटीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडल्याची घटना समोर आली आहे. डी. के. टुरिझमच्या परिसरापासून ते मुख्य वळणाखालील भागापर्यंत रस्त्यावर डिझेल पसरल्याने संपूर्ण मार्ग अत्यंत घसरडा बनला आहे.

या घसरड्या रस्त्यामुळे पाच ते सहा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्यावर सांडलेले डिझेल वेळेत साफ करण्यात आले नसल्याने आणि रात्रीच्या अंधारामुळे धोका अधिक वाढला होता. विशेषतः दुचाकीस्वारांना या ठिकाणी वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघात होण्याची शक्यता कायम आहे.

दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, वाहनांचा वेग कमी ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्यावर सांडलेले डिझेल साफ करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.

Sawantwadi Terminus: कोचिंग टर्मिनलपाठोपाठ आता ‘वॉटरिंग’ सुविधाही निसटली!

कोकणकरांच्या नशिबी फक्त स्थानके ‘स्किप’ करणाऱ्या गाड्या!

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्यातील जनतेला कोकण रेल्वेवरील त्यांचे हक्काचे टर्मिनस म्हणुन प्रतिक्षेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडली आहे. सावंतवाडीला ‘कोचिंग टर्मिनस’चा दर्जा मिळण्याची आस लावून बसलेल्या कोकणी चाकरमान्यांना आता मोठा धक्का बसला असून, टर्मिनस तर लांबच पण आता गाड्यांमध्ये पाणी भरण्याची (Coach Watering Facility) सुविधाही सावंतवाडीच्या हातातून निसटल्याचे स्पष्ट झाले आहे.

​मडगाव आणि उडुपीचे कल्याण, सावंतवाडीचे काय?

​रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार, गोव्यातील मडगाव स्थानकाचा समावेश देशातील पहिल्या ४८ प्रमुख स्थानकांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे २०३० पर्यंत मडगाव येथील कोचिंग फॅसिलिटी दुप्पट करण्यात येणार आहे. दुसरीकडे, कर्नाटकच्या उडुपी स्थानकावर आता ‘कोच वॉटरिंग’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने (KRCL) घेतला आहे. या दोन मोठ्या हालचालींमुळे सावंतवाडीचे महत्त्व तांत्रिकदृष्ट्या कमी होत असून, येथे भविष्यात प्रवासी टर्मिनल दर्जाच्या सुविधा मिळणे कठीण होणार आहे.

कर्नाटकचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी आणि खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी संसदेत या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळेच केआरसीएलने १० फेब्रुवारी रोजी उडुपी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून पाणीपुरवठ्याबाबत हमी मागितली आहे.

​भविष्यातील धोके आणि परिणाम

गाड्यांना थांबे नाहीत: या सुविधा असल्यास सावंतवाडी स्थानकावर दक्षिणेकडे जाणार्‍या गाड्यांना थांबे मिळवणे सोपे झाले असते. आता या सुविधा दक्षिणेकडे गेल्याने या गाड्या या स्थानकास स्किप करून पुढे जातील.

​गाड्यांच्या विस्तारीकरणावर मर्यादा: सावंतवाडीत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने येथून नवीन गाड्या सोडणे किंवा सध्याच्या गाड्यांचा विस्तार करणे तांत्रिकदृष्ट्या ‘फिजिबल’ नसल्याचे कारण रेल्वे प्रशासन पुढे करू शकते.

​पर्यटनावर गदा: सावंतवाडी हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, रेल्वे सुविधांचा अभाव राहिल्यास पर्यटकांच्या संख्येत घट होऊन स्थानिक व्यापारावर त्याचा विपरीत परिणाम होईल.

​कोकणी माणसावर अन्याय: सावंतवाडीकडे याच पद्धतीने दुर्लक्ष झाले, तर भविष्यात प्रवाशांना केवळ ‘थ्रू’ (जाणाऱ्या-येणाऱ्या) गाड्यांवर अवलंबून राहावे लागेल.

​काय आहे ‘कोच वॉटरिंग’ सुविधेचे महत्त्व?

​रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी स्वच्छ पाणी भरण्याची ही प्रक्रिया आहे. ज्या स्थानकावर ही सोय असते, तेथे लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणे सोपे होते. राज्य सरकारने पाण्याचा स्रोत आणि पाइपलाईन उपलब्ध करून दिल्यास रेल्वे प्रशासन स्वतःचा प्लांट उभारते. मात्र, सावंतवाडीत अशा हालचाली दिसत नसल्याने स्थानक केवळ नावापुरतेच उरते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वेवर दक्षिणेकडील खासदारांचा ‘होल्ड’ 

यावरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की गोवा आणि दक्षिणेकडील लोकप्रतिनिधींचा कोकण रेल्वे प्रशासनावर वर्चस्व आहे. त्यामुळे ते आपल्या भागातील प्रवाशांना सोयीच्या असणार्‍या गोष्टी सहजपणे करताना दिसत आहेत. कोकणातील खासदारांना या विषयाचे गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट होत असून, येथील रेल्वे प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

एसटी संगे तीर्थाटन: पाहिल्या फेरीच्या यशानंतर अष्टविनायक यात्रेची पुण्याहून दुसरी फेरी जाहीर

   Follow us on        

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) तर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजना” अंतर्गत पुण्यातून अष्टविनायक यात्रेची दुसरी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यात्रेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ही दुसरी यात्रा आयोजित करण्यात येत असून, ४ व ५ एप्रिल २०२६ (शनिवार व रविवार) या दोन दिवसांच्या कालावधीत ही यात्रा पार पडणार आहे.

या यात्रेदरम्यान प्रवाशांना सर्व सुखसोयींसह अष्टविनायकाचे दर्शन घडवण्यात येणार आहे. प्रवाशांसाठी विशेष किटचीही व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. एसटी कर्मचाऱ्यांमार्फत प्रवाशांची काळजी घेतली जाणार असून सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची हमी दिली जात आहे.

या यात्रेसाठी प्रति व्यक्ती पॅकेज दर जाहीर करण्यात आले आहेत. पुरुषांसाठी ३,५०० रुपये, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३,००० रुपये, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी २,४०० रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. इच्छुक प्रवाशांनी त्वरित नोंदणी करून या धार्मिक यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाकडून करण्यात आले आहे. बुकिंगसाठी संबंधित आगाराशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन वाहने दाखल

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला मोठी चालना मिळाली असून, पोलीस दलासाठी प्राप्त झालेल्या नवीन वाहनांचा हस्तांतरण सोहळा आज, १९ मार्च २०२६ रोजी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमादरम्यान नवीन वाहनांची पारंपरिक पद्धतीने पूजा करून ती पोलीस दलाच्या सेवेत समर्पित करण्यात आली. या नवीन वाहनांमुळे पोलिसांची गस्त अधिक प्रभावी होणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

 

पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले की, या वाहनांमुळे स्थानिक पोलिसांच्या कामाला अधिक गती मिळेल आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. पोलीस दलाच्या सुसज्जतेसाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Konkan Railway: मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत बदल

   Follow us on        

चिपळूण: कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांच्या मान्सूनपूर्व (Non-Monsoon) वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला असून, याची अंमलबजावणी त्वरित  लागू करण्यात आली आहे. यामध्ये गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चिपळूण स्थानकावरील वेळेत सुधारणा करण्यात आली आहे.

या सुधारित वेळापत्रकानुसार, चिपळूण स्थानकावर या गाडीची जुनी वेळ १९:४६ / १९:४८ अशी होती. आता ही गाडी चिपळूण स्थानकावर ६ मिनिटे आधी म्हणजे १९:४० वाजता पोहोचेल आणि १९:४२ वाजता सुटेल. प्रवाशांनी या बदललेल्या वेळेची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे की, प्रवाशांनी इतर स्थानकांवरील अधिकृत वेळापत्रकासाठी ‘नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम’च्या (NTES) संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिकृत अपडेट्ससाठी ‘कोकण रेल्वे मिरर’ (KR Mirror) या ॲपचा वापर करावा जेणेकरून प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही.

Mumbai Local: मुंबईकरांना रेल्वेकडून गुढीपाडव्याची भेट! पश्चिम रेल्वेच्या १६ लोकल सेवा आता १५ डब्यांच्या!

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला असून, १९ मार्च २०२६ म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तापासून १६ उपनगरीय लोकल सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या १२ डब्यांच्या असलेल्या या १६ सेवा आता १५ डब्यांच्या करण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे चर्चगेट-विरार-डहाणू मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

​या नवीन बदलामुळे पश्चिम रेल्वेवरील १५ डब्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या आता २११ वरून २२७ वर पोहोचणार आहे. विशेष म्हणजे, एकूण उपनगरीय सेवांची संख्या १,४१४ इतकीच राहणार असली, तरी डब्यांच्या वाढीमुळे एकाच वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. प्रत्येक १५ डब्यांच्या ट्रेनमुळे साधारणपणे २० ते २५ टक्के अतिरिक्त प्रवाशांना सामावून घेता येईल, जे विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसच्या वेळेत (पीक आवर्स) प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

​एकीकडे पश्चिम रेल्वेने आपल्या ताफ्यात सुधारणा केल्याने समाधान व्यक्त होत असताना, दुसरीकडे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. मध्य रेल्वेवर अद्यापही १५ डब्यांच्या गाड्यांची संख्या कमी असून प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याकडे प्रवाशांनी लक्ष वेधले आहे. मात्र, पश्चिम रेल्वेच्या या महत्त्वाच्या पावलामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात प्रवाशांना अधिक मोकळी जागा आणि सुखकर प्रवास मिळणार आहे.

“… जर गाड्याच थांबत नसतील, तर पर्यटक कोकणात येणार कसे?” – दीपक केसरकर

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या दुरवस्थेवर आमदार दीपक केसरकर यांनी विधानसभेत आवाज उठवत राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच, कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये लवकरात लवकर विलिनीकरण करावे, जेणेकरून या भागातील रेल्वे प्रश्नांचा कायमस्वरूपी मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी ठामपणे मांडले.

​केसरकर यांनी भाषणादरम्यान नमूद केले की, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांच्या बाह्य सुशोभीकरणाचे काम झाले असले, तरी अंतर्गत प्रवासी सुविधा अद्यापही अपूर्ण आहेत. जोपर्यंत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने पुढाकार घेऊन या सुविधांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करावी. या गंभीर विषयावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची विनंतीही त्यांनी सभागृहात केली.

​कोकणच्या पर्यटनावर भाष्य करताना केसरकर यांनी रेल्वे थांब्यांचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. “जर गाड्या स्थानकांवर थांबणारच नसतील, तर पर्यटक कोकणात कसे येणार?” असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला. कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन प्रमुख स्थानकांवर सध्या न थांबणाऱ्या जलद गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. केसरकर यांच्या या पाठपुराव्यामुळे आतातरी कोकणचे हक्काचे सावंतवाडी टर्मिनस पूर्णपणे कार्यान्वित होईल आणि प्रवाशांचे हाल थांबतील, अशी आशा कोकणवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर रविवारी धावणार ‘विकेंड स्पेशल’ एक्सप्रेस

   Follow us on        

मडगाव: आठवडा अखेरीस होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहकार्याने मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे वेळापत्रक आणि थांबे खालीलप्रमाणे आहेत:

​गाडी क्र. ०१००४ / ०१००३ मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव विशेष

​गाडी क्र. ०१००४ (मडगाव – LTT): ही गाडी २२ मार्च २०२६ (रविवार) रोजी मडगाव जंक्शन येथून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​गाडी क्र. ०१००३ (LTT – मडगाव): ही गाडी २३ मार्च २०२६ (सोमवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल

थांबे: मडगाव जंक्शन, करमळी, थिविम, सावंतवाडी टर्मिनस, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस.

​डब्यांची रचना: एकूण २० डबे (१८ स्लीपर क्लास आणि २ एसएलआर).

​आरक्षण: गाडी क्र. ०१००४ साठीचे आरक्षण १९ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होईल.

​कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search