KonkanRailway News: गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्या दिवा चिपळूण मेमू विशेष गाडी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01155 दिवा चिपळूण मेमू विशेष गाडीला दिवा या सुरवातीच्या स्थानकावरून याआधी नियोजित केलेल्या वेळेच्या 10 मिनिटे अगोदर सोडण्यात येणार आहे.
नियोजित वेळेनुसार ही गाडी संध्याकाळी 19:45 या वेळी सुटणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यामधे बदल करून ही गाडी सुधारित वेळेनुसार ही गाडी 10 मिनिटे अगोदर म्हणजे संध्याकाळी 19:35 वाजता सुटणार आहे. हा बदल दिनांक 13 सप्टेंबर पासून असणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे.
MSRTC News: एसटीतील प्रवासात प्रवाशाना आणि वाहकाला नेहमी सतावणारी समस्या म्हणजे सुट्ट्या पैशाची चणचण. या कारणावरून कित्येकवेळा प्रवासी आणि वाहकांमध्ये भांडणे होताना दिसतात. पण आता ही समस्या दूर होणार आहे. कारण एसटीमध्ये सुद्धा तिकिटाच्या पेमेंट साठी क्युआर कोड स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामळे सुट्ट्टे पैसे नसले तरी त्याची चिंता भेडसावणार नाही आहे. या बदलासाठी या महिन्यात सर्वप्रथम एसटीची तिकीट मशिन बदलण्यात येणार आहेत. यामध्ये कोडस्कॅन अपडेट करून घेण्यात येणार असून या महिना अखेरपर्यंत एकाचवेळी ही सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
बदलत्या काळानुसार लाल परी अर्थात् एसटी महामंडळ प्रवाशांना आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे बदलती गरज लक्षात घेऊन एसटीनेही नागरिकांना कॅशलेस तिकीट पेमेंट करण्याचा निर्णय घेतला असून, ऑगस्ट अखेरपर्यंत सध्या असलेल्या तिकीट मशिनमध्ये बदल करण्यात येणार आहे.
क्युआर कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार आहे. आधी ही सिस्टीम अपडेट करून घेण्यात येणार असून, त्यानंतर ही अंमलबजावणी सुरू होईल.आतापर्यंत प्रवाशांना ई-तिकीट दिले जात होते. आता पेमेंटही ई-सेवा प्रणालीद्वारे होणार आहे. गणेशोत्सवाआधी या सेवेला आरंभ होण्याची शक्यता असून चाकरमान्यांना एक नवी सेवा महामंडळाकडून मिळेल.
Vande Bharat Train News : चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे तयार होणारी एकतीसवी वंदे भारत ट्रेन ही देशातील पहिली केशरी रंगाची सेमी-हाय स्पीड एक्सप्रेस असणार आहे. दिनांक 19 ऑगस्ट रोजी चेन्नई उत्पादन युनिटमध्ये या केशरी रंगाच्या वंदे भारत ट्रेनचे अनावरण होण्याची अपेक्षा आहे.
देशभरात 25 वंदे भारत गाड्या धावत असताना, असे आणखी चार रेक या महिन्यात सेवेत येण्यासाठी ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत. तथापि, आणखी दोन वंदे भारत गाड्यांची निर्मिती प्रक्रिया पुढच्या टप्प्यात आहे, त्यापैकी एकतीसवा रेक नवीन कलर कोडनुसार बनवला जाणार आहे.
भारतीय राष्ट्रध्वजापासून प्रेरित होऊन, नवीन वंदे भारत ट्रेन भगव्या रंगाच्या संयोजनात दारावर आणि डब्यांवर हिरव्या रंगाच्या पट्ट्यांसह बनवलेली असेल. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार ड्रायव्हर केबिनच्या पुढील भागाला अधिक सौंदर्यपूर्ण आणि लक्षवेधी बनवण्यासाठी केशरी रंगाच्या आकर्षक रंगसंगती असतील.
भारतातील पहिल्यावहिल्या स्वदेशी डिझाइन आणि निर्मित सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेनने प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभव दिला आहे. हाय स्पीड, सुधारित सुरक्षा मानके आणि जागतिक दर्जाची सेवा ही या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत.स्वयंचलित दरवाजांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत गाड्यांचा वेग वेगवान आहे आणि त्यांचा वेग ताशी 160 किमी आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग सीट्ससह, रिक्लाइनिंग एर्गोनॉमिक सीट्स आणि आरामदायी आसनांसह ट्रेनमध्ये उत्तम राइडिंग आराम आहे.प्रत्येक आसनासाठी मोबाईल चार्जिंग सॉकेटच्या सुविधेसह, ट्रेनमध्ये एक मिनी पॅन्ट्री आहे ज्यामध्ये हॉट केस, बाटली कुलर, डीप फ्रीझर आणि गरम पाण्याचा बॉयलर आहे.याशिवाय प्रत्येक डब्यात आपत्कालीन खिडक्या, अग्निशामक यंत्रणा आणि सीसीटीव्हीची व्यवस्था आहे.
पनवेल :मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पनवेलमध्ये तोफ धडाडली आहे. पनवेल येथे आज संपन्न झालेल्या मनसे निर्धार मेळाव्यामध्ये राज ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.
▪️ आज मी इथं मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय.
▪️ कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. अहो, आपण चंद्रावर जाऊ शकतो पण महाराष्ट्रात रस्ते चांगले बंधू शकत नाही का?
▪️ २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही?
▪️ फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक जायला ८ तास लागतात… लोकांचे ह्या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं?
▪️ भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका.
▪️ लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं गाडीत झोपून जाणार. यानंतर “मी तुला दिसलो का? मी होतो का.” म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का?
▪️ अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले. बहुधा भुजबळांनी सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं.
▪️ मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं की अहो समृद्धी रस्ता करून इतके दिवस झाले पण अजून तुम्ही फेन्सिंग का नाही केलं? रस्त्यावर अनेक प्राणी येत आहेत, त्यांचे अपघात होत आहेत, गाड्यांचे अपघात होत आहेत. इतकी साधी गोष्ट पण सरकारच्या लक्षात येऊ नये ?
▪️ आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या.
▪️ मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?
▪️ आधी नाणार मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली, कोकणी माणसाच्या हजारो एकर जमिनी कोणी बळकवल्या? ह्याचा शोध घेतलाच गेला पाहिजे.
▪️ मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत.
▪️ जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला. निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागतील आणि आमची भोळीभाबडी जनता त्यांना पुन्हा भुलणार असेल तर ह्याच नरकयातना पुन्हा भोगाव्या लागतील.
▪️ २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.
▪️ गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही.
▪️ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री.
▪️ ३७० कलम रद्द झाल्यावर काय सांगितलं की कोणीही आता काश्मिरात जमीन घेऊ शकता. मला आनंद आहे की ३७० रद्द झाला. मी तर अभिनंदन पण केलं होतं.
▪️ पण तुम्ही कश्मीर असो, हिमाचल असो की आपल्या ईशान्य भारतातील राज्य तिथे कोणत्याही बाहेरच्या माणसाना जमीन घेता येणार नाही. मग हा नियम महाराष्ट्रात का नाही ? बरं मला सांगा ३७० झाल्यावर तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये कोणीही जमीन घेऊ शकतो मग आत्तापर्यंत अदानी किंवा अंबानी समूहाने जमीन का नाही घेतली ?
▪️ शिवडी-न्हावाशेवा रस्ता होणार तेव्हा बघा रायगड जिल्ह्याची काय अवस्था होते. तिथल्या जमिनी आधीच परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत आणि पुढे जाऊ परिस्थिती अशी होणार कि फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार.
▪️ मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात माझा मंडणगडचा तालुकाध्यक्ष तर एक शीख सरदार आहे.
▪️ अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग, त्यावर एकदा छोटं विमान आदळलं, त्याच्याखाली एकदा बॉंम्बस्फोट झाला होता तरीही बिल्डिंग दणकट आहे. ती बिल्डिंग १४ महिन्यांत झाली होती. आणि आपल्याकडे वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्ष लागतात आणि मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं?
▪️ अमेरिकेत १९२७ च्या महामंदीच्या काळात सरकारने लोकांना पैसा देता यावं म्हणून अमेरिकेत रस्त्यांचं जाळं उभारलं, त्याच्यावर आजची अमेरिका उभी राहिली.
▪️ माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे.
▪️ ह्या आंदोलनंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावं. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावं. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे, त्याचं संवर्धन करूया.
मुंबई : वांद्रे येथील एका लोकप्रिय रेस्टॉरंट मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर केलेल्या एका ग्राहकाला चक्क उंदीर आढळला आहे. त्याच्या ताटात उंदीर आढळल्याची तक्रार केल्यानंतर वांद्रे येथील एका लोकप्रिय रेस्टॉरंटच्या व्यवस्थापक आणि दोन स्वयंपाकींना मंगळवारी अटक करण्यात आली.
रविवारी रात्री पापा पांचो दा ढाब्यावर जेवण कमी चवीचे असल्याचे गोरेगावस्थित अनुराग सिंग या बँक अधिकाऱ्याने सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. हे रेस्टॉरंट दोन दशकांहून अधिक काळ पंजाबी खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय आहे.
वांद्रे येथे दिवसभर खरेदी केल्यानंतर रविवारी रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सिंग यांनी सांगितले की त्यांनी ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये उंदीराचे बाळ आढळले. सुरुवातीला तिने याकडे लक्ष दिले नाही आणि चिकनचा तुकडा समजून त्यातील काही खाल्ले. बारकाईने पाहणी केल्यावर त्याला कळले की तो उंदराचे बाळ आहे.
जेव्हा त्यांनी वेट स्टाफकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी माफी मागितल्याचे सांगितले, परंतु व्यवस्थापक आणखी 45 मिनिटे पुढे आला नाही. सिंग म्हणाले की, करीत उंदीर सापडल्यानंतर लगेचच आजारी वाटले, ज्यापैकी काही त्याने आधीच खाल्ले होते. घरी परतताना त्यांनी काही औषधे लिहून दिलेल्या डॉक्टरांचा सल्ला घेतला.
वांद्रे पोलिस अधिकाऱ्याने हॉटेल व्यवस्थापक विवियन सिक्वेरा आणि दोन स्वयंपाकी यांच्या अटकेची पुष्टी केली. “त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 272 (विक्रीच्या अन्नात भेसळ) आणि 336 (कोणत्याही व्यक्तीचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असलेल्या अविचारी किंवा निष्काळजी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असे अधिकाऱ्याने सांगितले. तिघांचीही जामिनावर सुटका झाली. ते म्हणाले की ते आता रेस्टॉरंटच्या मांस पुरवठादाराची चौकशी करत आहेत.
वेंगुर्ले : तुळस गावातील चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांच्या घरा समोर एक दुर्मिळ प्रकारचा साप आढळून आला आहे. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार अति दुर्मिळ असा ‘कॅस्ट्रोज कोरल साप’ Castro Coral Snake असल्याचे समजते.
याबाबत सर्विस्तर वृत्त असे कि तुळस गावातील चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांना त्यांच्या घरासमोर एक वेगळ्या प्रकारचा साप दिसला. त्यांनी सर्पमित्र महेश राऊळ यांना कॉल करून त्या ठिकाणी ताबडतोब बोलाविले. सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्या सापाचे निरीक्षण केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा अति दुर्मिळ असा कॅस्ट्रोज कोरल साप आहे, त्यांनी लगेचच त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. २०२१ मध्ये सर्पमित्र श्री महेश राऊळ यांना असा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळला होता. दोन वर्षांनी पुन्हा एकदा हा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळून आला.
सिंधुदुर्ग मध्ये या सापाची नोंद ही तिसऱ्या वेळा झाली आहे. त्यामध्ये वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांना हा साप मृत अवस्थेत आढळला होता. आणि त्यानंतर सात ते आठ वर्षांनी दोन वेळा जीवंत साप महेश राऊळ यांनाच मिळाला आहे. या सापाचे संशोधन हेमंत ओगले यांनी केले आहे.हा साप विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा आणि फारसा दृष्टीस पडत नाही. याचा रंग ब्राऊन ब्लॅक असून पोटाखालून पूर्णपणे भगवा असतो. आणि त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे धोतक मानले जाते. दगडाखाली आणि पाला पाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक सरडे पाली गांडूळ इत्यादी आहे.
साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते.पूर्ण वाढलेला साप हा करंगळी एवढा जाड असतो त्याच्याबरोबर त्याच्या डोक्यावर भगवी जाड रेषा असते आणि हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्याजवळ येऊ नका असा इशारा देत असतो. हा दुर्मिळ साप पुन्हा एकदा मिळाल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता जगाच्या नकाशावर झळकली आहे. याआधी बरेचसे पशुपक्षी प्राणी जे अति दुर्मिळ आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आढळलेले आहेत. दरम्यान तुळस येथे या रेस्क्यूच्या वेळी त्यांच्यासोबत वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव सचिन परुळकर आणि गुरुदास तिरोडकर आणि सद्गुरु सावंत आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
Mumbai Goa HIghway News : मुंबई – गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील ४२ किलोमीटरच्या रस्त्यापैकी २३ किलोमीटर सिंगल लेनचा रस्ता पूर्ण झाला आहे. पेवर मशीनच्या माध्यमातून रोज कमीत कमी १ कि.मी. आणि जास्तीत जास्त १.५. कि. मी काम करण्याचं टार्गेट आहे. निश्चितंच गणेशोत्सवापूर्वी मुंबई – गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे काम पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काळ व्यक्त केला आहे. काल त्यांनी मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा केला होता त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई गोवा पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की,मुंबई – गोवा महामार्ग ५५० कि. मी. चा रस्ता आहे. या महामार्गाचे काम वेगवेगळ्या १० पकेजेस सुरू आहेत.
पहिल्या टप्प्यातील पनवेल ते कासू या ४२ कि. मी. पैकी २२ कि. मी. सिंगल लेन काम पूर्ण झालेले आहे. या रस्ते बांधणीच्या कामासाठी नव्याने तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे९ मीटरच्या असणारया पेवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम चालत आहे. पेवर जवळ जवळ एका दिवसामध्ये ९०० मीटर काम होत आहे. आज मुंबई -गोवा महामार्गावर पहिल्या पॅकेजमध्ये २ पेवर मशीन्स काम करत आहेत. पहिल्या टप्यामध्ये साडेचार मीटरचे दोन पेवर काम करत आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये असेच दोन पेवर काम करत आहेत. या कामासाठी एक टार्गेट आहे, एक मशीन दर दिवशी कमीत कमी १ कि.मी. आणि जास्तीत जास्त १.५. कि. मी. रस्त्याचे या पेवरच्या माध्यमातून काम सुरू आहे.
पावसाने साथ दिली पाहिजे अशी आम्हीही प्रार्थना करत आहोत, पण जरी पावसाने साथ दिली नाही व रिमझिम पाऊस पडला तरी यामध्ये काम करता येऊ शकतं. त्या पद्धतीने काम आता सुरू आहे. खात्री आहे की, मुंबई – गोवा महामार्गाचं सिंगल लेनचे काम येत्या गणपती पूर्वी नक्की पूर्ण होईल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई गोवा महामार्गावरील रायगड मधील जे काम प्रामुख्याने प्रलंबित आहे ते काम आता नवीन CTB टेक्नोलॉजीने सुरु आहे. देशभरामध्ये अशा प्रकारच्या काही मशीन आहेत, या नवीन तंत्रज्ञानामध्ये चार ते पाच मशीनचा सेट असतो. त्यामधील तीन मशीनचा सेट आणलेला आहे आणि त्यामाध्यमातून काम सुरु झालं आहे. येणाऱ्या काळात ८ ते १० मशीन उपलब्ध करून रस्ता पूर्ण करण्याचं काम करणार असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले
मुंबई गोवा महामार्गाचे रायगड जिल्ह्यातील काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने गणेशोत्सवापूर्वी येणार्या दिवसात जड वाहनांसाठी हा जर बंद केला तर आम्हाला जलदगतीने काम करता येईल आणि त्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जातोय. पाली, निजामपूर मार्गे वाहतूक वळवण्याबाबत विचार सुरू आहे हे काम जलदगतीने कस होईल याकडे लक्ष दिल जात आहे असेही त्यांनी सांगितले.
चिपळूण :चिपळूण तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी एकास ताब्यात घेतले आहे.तसेच त्याच्याकडून ‘तुईया’ Plum Headed Parakeet या प्रजातीच्या पोपटाची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ असे एकूण १२ पक्षी आढळून आले आहेत.
या प्रकरणी जितेंद्र धोंडू होळकर, (रा.कोंढेमाळ, चिपळूण) याला ताब्यात घेतले आहे. तो विशिष्ट प्रजातीचे पोपट पकडून विक्री करत असलेबाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश्री कीर, वनपरिमंडळ अधिकारी दौलत भोसले, उमेश आखाडे, सुरेश उपरे व वनरक्षक राजाराम शिंदे, अश्विनी जाधव इत्यादी वनविभागाचे अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जितेंद्र होळकर याच्या कोंढेमाळ येथील राहत्या घरी व गुरांच्या गोठ्यामध्ये अचानक धाड टाकली.
त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये पहाणी केली असता घराशेजारील प्रभाकर जिवा करंजकर यांच्या लाकडाच्या खोपटीत दोन पिंजऱ्यामध्ये पोपट प्रजातीमधील ‘तुईया’ (प्लम हेडेड पॅराकीट) या प्रजातीची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ पक्षी आढळून आले. या पक्षांबाबत जितेंद्र होळकर याच्याकडे विचारणा केली असता हस्तगत करण्यात आलेल्या दोन पिंजऱ्यातील एकूण १२ पोपट हे माझेच आहेत. मी गुरे चारण्यासाठी गावाजवळील डोंगरावर गेलो असताना लाकडाच्या डोलीतून सुमारे ४-५ महिने व १ वर्षापूर्वी ताब्यात घेतले आहेत. तसेच यापुर्वी मी १० ते १२ जणांना पोपट विकले असल्याचे सांगितले. जितेंद्र धोंडू होळकर यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
सावंतवाडी: सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री गाडी पकडत असताना एका प्रवाशाचा अपघात झाला. संदीप रामचंद्र वरक असे त्या प्रवाशाचे नाव असून तो ओवाळिये या गावाचा आहे. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला बांबुळी येथे दाखल करण्यात आले आहे.
स्थानकावरच्या प्रवाशांच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित
अपघात नक्की कसा झाला त्याची पूर्ण माहिती आजून आली नाही. मात्र एक गंभीर बाब सावंतवाडी स्थानकावरच्या प्रवाशांच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल पुढे आली आहे. हा अपघात झाल्यानंतर जखमी प्रवासी प्लॅटफॉर्म वर अर्धातास तसाच मदतीशिवाय पडून होता. गाडी पास झाल्यावर प्लॅटफॉर्म वरच्या लाईट्स बंद झाल्या होत्या. त्यामुळे हा अपघात झाला हे तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले नाही. जखमी प्रवाशाने आपल्या मोबाईल फोन वरून स्थानका जवळच्या नातेवाईकांना संपर्क साधून मदत मिळवली.
त्यांनी जखमी युवकाला ताबडतोब उपजिल्हा रुग्णायालयात दाखल केले.
याप्रकरणी नातेवाईकांनी स्टेशन मास्तरांना जाब विचारला असता स्थानकावर फक्त स्टेशन मास्टर आणि गार्ड असे दोनच कर्मचारी रात्रीच्या वेळी होते, वरिष्ठांच्या आदेशामुळेच सर्व लाईट्स गाडी गेल्यावर बंद केल्या होत्या त्यामुळे या अपघाताची कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी एक महत्वाचे स्थानक असून त्याला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र या स्थानकावर त्या दर्जाच्या सुविधा का नाही देण्यात येत आहे असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.
ठाणे :गुलामी छळाच्या जाचेतून, येणाऱ्या लोकशाही माणुसकीत ताठ मानेने जगण्यासाठी ज्या थोर वीरांनी आपल्या प्राणाची अहूती देत १५ ऑगस्ट १९४७* रोजी म्हणजेच आजच्या सुमारे ७६ वर्षापूर्वी माणसातल्या माणुसकीला स्वतंत्र्य मिळून दिले. या ७६ वर्षात लोकशाही कृषिप्रधान भारत देशाने प्रचंड प्रमाणात प्रगती केली. त्या वेळच्या घडामोडीच्या परंपरा काही अंशी भारत देशाने साथ करीत अधिकाधिक यशाची शिखरे गाठलीत.
जसे शरीरातील रक्तवाहिन्या डोक्यापासून पायापर्यंत जात शरीराला जगण्यासाठी चालना देतात; त्याचप्रमाणे भारतातील रेल्वे हा दळणवळणाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा भारतीय रेल्वे मार्ग कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर पर्यंत पसरलेला आहे. तोच महाराष्ट्रातील २६ जानेवारी १९९८ रोजी मराठी कोकणवासीय खेडेगावतल्या जनतेची शहराशी नाळ जोडावी यासाठी प्राध्यापक मधू दंडवते साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील राजधानी मुंबई ते सावंतवाडी रोड यादरम्यान वा पार कर्नाटक पर्यंत सुखकर आणि सुरक्षित कमी खर्चिक वेळ असा कोकण रेल्वे मार्ग* प्रवास सुरू केला.
त्याच कोकणातल्या मातीतल्या कोकण वासियांनी आपला खेडेगाव जपत; कोकणाई जगत, आपल्या सहबंधूंना एकत्र करीत कोकणवासी यांच्या समस्या आणि अडीअडचणी, सूचना यावर कार्य करण्यासाठी कोकणवासी यांचा आवाज शहरी करणापर्यंत पोहोचेल याकरीता प्रवासी बंधूंची सन २००९ साली कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे संघटना अस्तित्वात नव्हे प्रत्यक्षात आणून मोठ्या प्रमाणात कार्यशील राहात आहे. या संघटनेने भारतीय स्वातंत्र्य दिनाचे ७६ वे अमृत महोत्सव साजरा करीत सालाबाद प्रमाणे १५ ऑगस्ट २०२३ चा स्वातंत्र्य दिन सोहळा रांगोळी प्रदर्शित करीत ठाणे स्थानकात मधल्या महत्त्वाच्या प्रवासी पुलावर भव्यदिव्य सुटसुटीत रांगोळी काढीत भारतीय स्वतंत्र दिनाचा ७६ वा अमृत महोत्सवाचा प्रदर्शनीय सोहळा छोटे खानी साजरा केला. या संघटनेस ठाणे स्थानकातील स्थानक निर्देशक श्री अरुण प्रताप सिंह, स्थानक मुख्यप्रबंधक श्री तावडे साहेब, स्थानक उपप्रबंधक, रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व कर्मचारी वर्ग, मुख्य तिकीट तपासनीस आणि सर्व कर्मचारी वर्ग यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यावेळी तसेच खालील आवर्जून उपस्थिती असलेले संघटनेचे सभासद आणि कार्यकारी पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
संघटनेचे सदस्य श्री राजू कांबळे (प्रमुख सल्लागार) यांच्या अधिपत्याखाली श्री . दर्शन कासले (सचिव), श्री. सुजित लोंढे (अध्यक्ष) श्री. संभाजी ताम्हणकर (खजिनदार), श्री. संतोष पवार,/श्री संतोष निकम (मा. अध्यक्ष/मा. उपाध्यक्ष) श्री. यशवंत बावदाणे (सल्लागार), श्री. तुषार साळवी (सल्लागार), श्री. महेश धाडवे (सल्लागार), श्री. विजय जगताप (सल्लागार), श्री. सुहास तोडणकर (संपर्क प्रमुख), श्री. विकास कांबळे, श्री.राजू कदम, श्री. प्रमोद घाग, श्री. नामदेव चव्हाण, श्री. गोविंद आमडोसकर, श्री. अमित चव्हाण, श्री. अनंत लोके, श्री. नागेश गुरव, श्री.गोपीचंद गुरव, श्री. विजय चव्हाण, श्री. सुजित नार्वेकर, श्री. रूपेश शिंदे, श्री. शरद धाडवे, श्री. साहील सकपाळ, श्री. वेदांत सावंत, श्री परेश गुरव, श्री. जितेंद्र बाईत (सर्व सभासद) आदि, त्याचबरोबर रांगोळी कला रेखाटक श्री. विलास सावंत आणि दिलीप सावंत यांचे अनमोल सहकार्य मिळाले.