रत्नागिरी-कोकण रेल्वेत सेवेवर असणारे तिकीट तपासनीस श्री.नंदु मुळ्ये यांनी दाखवुन दिलेल्या प्रामाणिकपणा आणि सतर्कतेमुळे दादर – सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला त्याची गाडी मध्ये विसरलेली लाखोंचा ऐवज असणारी बॅग पुन्हा मिळाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 20 तारखेला प्रवासी सौ.जाधव या आपली एक बॅग गाडीतच विसरून विलवडे या स्थानकावर उतरली. त्या गाडीत सेवेवर असणारे तिकीट तपासनीस श्री.नंदु मुळ्ये याना ती बॅग आढळून आली. आजूबाजूला कोणताच प्रवासी नसल्याने त्यांना संशय आला म्हणुन त्यांनी त्या डब्यातील प्रवाशांकडे चौकशी केली. या चौकशीत ही बॅग तेथील कोणाचीच नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कमर्शियल कंट्रोल मध्ये कळविले तसेच बॅगेत मिळालेल्या आधार कार्ड वरून त्यांचा PNR क्रमांक मिळवला व स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क केला. विलवडे स्टेशन मास्तरांनी बॅग विसरल्याबाबत आपणास कळवले असल्याचे सांगितले.
सदर बॅग RPF कणकवली यांच्याजवळ सुपूर्द करून ताबडतोब RPF कर्मचाऱ्यांनी प्रवासी सौ.जाधव यांना फोन करून कळवून ओळख पटवून देऊन कणकवली येथे समक्ष भेटून बॅग नेण्यास सांगितले.
या बॅगमध्ये दागिने व रोख रक्कम ₹१,००,०००/- होते.
या घटनेत तिकीट तपासनिस श्री.नंदु मुळ्ये,श्री.मिलिंद राणे, श्री.सदानंद तेली, श्री.विठोबा राऊळ, श्री.अजित परब, अटेंडंट श्री.तानावडे यांनी सतर्कता दाखवून रत्नागिरी कोकण रेल्वेची प्रतिमा उंचावली आहे, अशी पोचपावती इतर प्रवाशांनी दिली
नवी मुंबई – कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा तसेच आजूबाजूच्या परिसरातील हापूस आंब्याला जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (GI टॅग) मोहर उठली आहे. यामुळे हापूसचं मूळ कोकणच असल्याचं व तिथे पिकणारा हापूस हाच खरा हापूस असल्यावरही शिक्कामोर्तब झालं आहे. GI टॅग असो वा नसो या भागातील आमचा हाच खरा हापूस म्हणून खूप पूर्वीपासून आंबा प्रेमींकडून कधीच ही मान्यता मिळाली आहे.
पण बाजारपेठेत इतर भागातील खासकरून कर्नाटक आणि आंध्रा राज्यातील आंबे हापूस आंबे म्हणून विकले सर्रास विकले जात आहेत. विक्रेत्यांमध्ये उत्तर भारतीय विक्रेत्यांचा समावेश जास्त असतो. आपल्या कडील आंबा हापूस आंबाच आहे असे बोलून तो विकला जातो. देवगड आंब्याच्या बॉक्स मध्ये पण ‘कर्नाटक आंबा’ भरून विकला जात आहे. यामुळे मूळ हापूस आंब्याच्या उत्पदकांवर अन्याय होतो. ग्राहकांची पण फसवणूक होते.
आंबे खरेदी करताना थोडीशी खबदारी दाखवली तरी आपली फसवणूक टाळता येत येईल.
बाजारभाव– बाजारात आंबे खरेदीसाठी जाताना हापूस आंब्याचा सध्याचा दर काढा. त्यासाठी सोशल माध्यमाचा उपयोग केला जाऊ शकतो. फेसबुक आणि व्हाटसअँप वर अनेक विक्रते हापूस आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या दरांपेक्षा जर बाजारातील विक्रेता खूपच कमी किमतीत विकत असेल तर तो हापूस आंबा नसू शकेल.
सुगंध– चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो. नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित येतो. हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.
साल– पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.
देठ – अस्सल हापूस आंब्याचा देठ खोल असतो.
फळाच्या रंगाकडे लक्षपूर्वक बघितलं तरीही प्रमुख फरक जाणवू शकतो. जर आंबा कृत्रिमरित्या पिकवला असेल तर तो पिवळाधमक आणि एकाच रंगाचा वाटतो.
हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून सहजरित्या ओळखू शकतो. ड्युपलिकेट हापूस आतून पिवळ्या रंगाचा असतो.
नैसर्गिकरित्या पिकलेला अस्सल हापूस आंबा हा खालच्या टोकाशीसुद्धा गोलाकार आणि वजनदार असतो.
शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते. त्यात कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे कळते.
या फसवणुकीपासून वाचण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे हे आंबे कोकणातील विक्रेत्यांकडून घेणे. हे विक्रेते आपल्या परिसरातील, आपल्या परिचयातील किंवा सोशल मीडिया वर आपला व्यवसाय करत असतात. त्यांच्याकडून आंबे खरेदी केल्यास अशी फसवणूक टाळता येईल.
कोकण भूमी प्रतिष्ठान आणि ग्लोबल कोकणचे अध्यक्ष संजय यादवराव यांच्या लेखणीतून……
ग्लोबल कोकणची गेली पाच वर्ष प्रमुख मागणी….माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कोकणसाठी एमएमआरडीए आणि सिडको याप्रमाणे स्वतंत्र विकास प्राधिकरण बनवणार या घोषणेचे स्वागत. या संदर्भात हा लेख
मूलभूत आणि पायाभूत विकासाच्या विषयांमध्ये भविष्यात कोकणात काही चांगले घडावे ही कोकणवासीयांची अपेक्षा.
गेली वीस बावीस वर्ष वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही कोकणात काम करतोय. खूप घोषणा झाल्या भावनिक आव्हाने झाले पण प्रत्यक्ष विधायक विकासाच्यां योजना फार कमी राबवल्या गेल्या. प्रत्यक्षात गोष्टी खूप कमी घडल्या. पर्यटन हापूस आंबा मत्स्य उद्योग या कोकणच्या मुख्य विषयांसाठी काही विशेष घडले नाही. माननीय मुख्यमंत्री पुढील दोन-तीन वर्षात खूप काही करतील अशी अपेक्षा.
गेली जवळपास 13 वर्ष कोकण हायवे ची आम्ही वाट पाहतोय. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे मे महिन्यामध्ये एक लाईन पूर्ण होईल आणि डिसेंबर पर्यंत दोन्ही लेन पूर्ण होतील या त्यांच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. तेरा वर्षे थांबलो अजून सहा महिने थांबू वर्षभर सुद्धा थांबू पण ठरल्याप्रमाणे पूर्ण करावे ही विनंती. या हायवे मध्ये अनेक चुका आहेत सर्विस रोड नाहीयेत ,शाळेतल्या मुलांना क्रॉसिंगच्या व्यवस्था नाहीत , ठरल्याप्रमाणे झाडे लावली नाहीत, अतिशय असुरक्षित हायवे आहे यावर सुद्धा भविष्यात काम होईल ही अपेक्षा.
समृद्धी महामार्ग प्रमाणे कोकणात मोठा ग्रीनफिल्ड हायवे बनवला जाईल ही घोषणा याचे स्वागत. समृद्धी महामार्ग सारखा हायवे जर मुंबई ते गोवा तयार झाला तर पाच तासांमध्ये मुंबईवरून मालवण पर्यंत जाता येईल जे आज समृद्धी महामार्गावर शक्य झाले आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या प्रयत्नातूनच समृद्धी महामार्ग पूर्ण झाला. या दोन्ही नेत्यांनी मनावर घेतलं तर कोकणचा हा महामार्ग सुद्धा दोन-तीन वर्षात पूर्ण होऊ शकतो. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी कोस्टल हायवे ची सुद्धा घोषणा केली. केंद्र सरकारच्या ज्या गतीने पायाभूत सुविधांचा विकास करत आहे त्याच गतीने जर कोकणासाठी या पायाभूत सुविधांचा विकास पुढील दोन-तीन वर्षात झाला तर कोकण आमुलाग्र बदलू शकेल. कोकणातील लोकांच्या शासनाकडून फार अपेक्षा नाही पण किमान पायाभूत सुविधा विकसित व्हाव्यात ही रास्ता अपेक्षा आहे. त्या दृष्टीने सरकार प्रयत्न करायला सुरुवात झाली हीच आमच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे.
एम एम आर डी ए आणि सिडको प्रमाणे कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण द्यावे ही मागणी गेली तीन-चार वर्ष आम्ही ग्लोबल कोकणच्या माध्यमातून लावून धरली आहे. यावर्षी स्वराज्य भूमी कोकण महोत्सवात ही मागणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही प्रमुख नेत्यांकडे मी स्वतः केली.
आजच्या कोकणातील सभेमध्ये कोकणासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरणाची घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली याबद्दल मला विशेष आनंद आहे. एम एम आर डी ए किंवा सिडको ला सरकारला पैसे द्यावे लागत नाहीत, उलट सरकार अडचणीत असेल तर ही महामंडळ सरकारला मदत करतात. या प्राधिकरणाला जगभरातून आणि वर्ल्ड बँक ,एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून प्रकल्पांसाठी निधी उभा करण्याचे अधिकार आहेत. यामुळेच मुंबईतील सर्व पूल मेट्रो रेल्वे शिवडी नहावा सी लिंक सागारी पुल यासारखे मोठमोठे प्रकल्प एमएमआरडीए राबवत आहे. अशीच आर्थिक क्षमता आणि विशेष अधिकार असलेले प्राधिकरण कोकणासाठी आवश्यक आहे. ज्या पद्धतीने साउथ ईस्ट एशियामध्ये विशेषता फुकेत ,बाली इंडोनेशिया इथे पर्यटनाची पंचतारांकित गावे विकसित केली आहे अशा स्वरूपाची काही जागतिक दर्जाच्या पर्यटन सुविधा असलेली गावे कोकणात विकसित केली पाहिजेत आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून जगभरातून कोकणात गुंतवणूक आणून अशा स्वरूपाच्या पायाभूत प्रकल्प विकसित करता येणं शक्य आहे. एमएमआरडी आणि सिडको सारखे श्रीमंत प्राधिकरण कोकणासाठी असेल तर याच प्राधिकरणाच्या निधीमधून ज्या पद्धतीने मुंबई मेट्रो किंवा शिवडी न्हावा सी लिंक ब्रिज असे मोठे मोठे प्रकल्प एमएमआरडीए राबवते अशाच पद्धतीने तारकर्ली, गणपतीपुळे, दापोली मुरुड , काशीद ,बोर्डी, केळवे …..यासारखी गावे पर्यटनाच्या सर्व सुविधांनी युक्त करता येतील आणि यामुळे. विशेषता सागरी पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकेल. पर्यटना शिवाय ,मोठमोठे फिशरीचे पार्क, आयटी पार्क ,ऑटोमोबाईल पार्क बायोटेक्नॉलॉजी ,नॅनोटेक्नॉलॉजी, इनोव्हेशन पार्क कोकणात वेगवेगळ्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारे व पर्यावरण पूरक प्रकल्प या प्राधिकरणाच्या माध्यमातून राबवता येऊ शकतील. लवकरच हे प्राधिकरण प्रत्यक्षात येईल आणि या माध्यमातून कोकणाच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल ही अपेक्षा. या प्राधिकरणाच्या नियोजन आणि संयोजनामध्ये स्थानिक तज्ञ मान्यवरांचा सहभाग घेतला पाहिजे.
काजू साठी तेराशे कोटीचे पॅकेज घोषित झाले आहे याचे मनापासून स्वागत मात्र या पॅकेजमधून काजूच्या उद्योजकांना कर्जमुक्त होण्यासाठी मदत मिळावी आणि काजूबीला हमीभाव मिळावा ही अपेक्षा आहे आणि यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. अशीच मदत अंबा बागायतदारांना मिळणे आवश्यक आहे. याचाही पाठपुरावा अंबा बागायतदार संघटना करत आहेत. पर्यटन उद्योग छोटे छोटे प्रकल्प करण्यासाठी उद्योगांना मिळते तशी पस्तीस टक्के सबसिडी मिळावी आणि औद्योगिक दराने वीज मिळावे याकरता आम्ही पाठपुरावा करत आहोत. सरकारने याकरता सकारात्मक तयारी दाखवली आहे. गेली दोन-तीन वर्ष कोकणातील शेतकऱ्यांना बागायतदारांना अवाच्या सव्वा विज बिले येत आहेत याकरता वीज नियामक मंडळाकडे आम्ही म्हणणे मांडले आहे मात्र या शेतकऱ्यांची वीज बिले शेती दरानेच दिली पाहिजेत. या दृष्टीने सुद्धा पाठपुरावा सुरू आहे.
संपूर्ण कर्जमाफी किंवा वीज बिल माफी अशा स्वरूपाच्या व्यवस्थेला अडचणीत आणणाऱ्या अपेक्षा कोकणवासीय कधी करत नाहीत, मात्र आवश्यक त्या पायाभूत सुविधा विकसित झाल्या व कोकणात उद्योग उभारण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्मिती झाली सहजपणे परवानग्या मिळाल्या तर कोकण प्रचंड विकसित होईल आणि हे करण्याची कोकणातल्या तरुणांची प्रचंड क्षमता आहे. घोषणा घोषणा राहू नये त्या प्रत्यक्षात याव्यात हा आमचा आग्रह आहे. यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आमच्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही करत राहू.
एका चांगल्या दिशेने काही घोषणा झाल्या दिशा मिळाल्या
या अगोदर कोकणच्या मूलभूत विकासासाठी खूप कमी गोष्टी घडल्यात त्यामुळे आम्ही कोकणवासीय साशंक असणे हे नैसर्गिक आहे. पण सकारात्मक राहून भविष्यात कोकणात चांगले बदल घडतील आणि कोकण विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा करूया. मी माझे मनोगत व्यक्त केले आहे आणि मला यावर खूप राजकीय चर्चा अपेक्षित नाही. कोकण विकासाच्या विषयावर नक्कीच चर्चा व्हावी आणि त्याचे स्वागत आहे.
रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ डिगेवाडी बस स्थानकासमोर आज सकाळी १०.३० वाजता बोलोरो आणि स्कूल बसला समोरासमोर भीषण अपघात घडला.अपघातात स्कूल बसमधील १४ विद्यार्थी बचावले.
येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्याबाबचे दिशादर्शक फलक उभारण्यात न आल्याने व काहीजण चुकीच्या दिशेने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत.
विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा कार चालक संदीप सावंत हा रत्नागिरीहून खेडकडे निघाला होता. कामथे डिगेवाडी बस स्थानकासमोर स्कूलची बस अचानक विरुद्ध दिशेने आल्याने समोरासमोर धडक झाली. यात कार जागीच पलटी झाली. या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बस मधील सर्व विध्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे. बोलोरो गाडीतील बँक कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग – देवगड तालुक्यात साळशी येथे उभ्या दगडात कोरलेली दोन कातळशिल्पे (पेट्रोग्लिफ्स) आढळली आहेत. जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे अनेक ठिकाणी आढळतात. मात्र, उभ्या दगडात कोरलेली कातळचित्रे कोकणात प्रथमच सापडली असल्याचा दावा देवगड तालुका इतिहास संशोधन मंडळाने केला आहे.
तालुक्यातील साळशी येथील नैसर्गिक ओहोळालगतच एक प्राचीन पुष्करणी आहे. या भागात नुकताच सिमेंट काँक्रिटचा बंधारा बांधण्यात आला. तेव्हा या भागातील वाढलेली झाडी तोडून साफसफाई करण्यात आली. बंधाऱ्यालगतच सुमारे दहा-पंधरा फूट उंचीचा मोठा दगड आहे. या दगडावर काहीतरी लिपी कोरलेली असल्याचे वाटल्याने साळशी येथील मुकुंद भटसाळस्कर यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या योगेश धुपकर यांना याबाबत माहिती दिली. कोणता तरी शिलालेख सापडल्याचे कळताच तातडीने मंडळातर्फे साळशी मोहीम आखण्यात आली. या वेळी अभ्यासकांना दोन पेट्रोग्लिफ्स म्हणजेच कातळचित्रे सापडली. या नैसर्गिक भव्य दगडावर एका बाजूस दगड तासून सपाट केला असून, त्यावर दोन प्राणी कोरलेले आहेत.
गेल्या काही वर्षांत रत्नागिरीपासून कुडाळ, वेंगुर्लेपर्यंत दीड हजाराहून अधिक कातळचित्रे अनेक संशोधकांच्या व हौशी अभ्यासकांच्या प्रयत्नांतून उजेडात आली. ही सर्वच कातळचित्रे जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली आहेत. जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे हे कोकणचे वैशिष्ट्य आहे; मात्र, साळशी येथे उभ्या दगडात कोरलेले कातळचित्र आढळले आहे. या कातळचित्रांचा शोध घेण्याच्या मोहिमेत पुरातत्त्व अभ्यासक रणजित हिर्लेकर यांच्याबरोबर योगेश धुपकर व अजित टाककर सहभागी झाले.
रत्नागिरी | मुंबई गोवा महामार्गावर वन्यजीवांचे अपघातांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांचे मार्ग निश्चित करून त्यांना भुयारी मार्ग किंवा उड्डाणमार्ग तयार करण्याची गरज आहे. त्यासाठी वन्यजीवांच्या अपघातांच्या जागा निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आता या मार्गावर सावधगिरी म्हणून वन्यप्राण्यांच्या बाधित अधिवासाचा अभ्यास सुरू केला आहे.
महामार्गावरून भरधाव जाणारी वाहने आणि हॉर्नच्या आवाजाने प्राणी बुजतात. त्यामुळेही अपघात होण्याचा धोका असतो. त्याचाही विचार करून पुलाखाली व भुयारात ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यापुढे कोणत्याही भागात रस्ता, महामार्ग किंवा पूल बांधायचा झाल्यास आणि आजूबाजूला जंगल असेल, तर सर्वांत आधी वन्यजीवांच्या येण्या-जाण्याचा मार्ग सुरक्षित करण्यावर प्राधान्य देण्यात येणार आहे.
ज्या भागात वन्यजीवांचे नैसर्गिक मार्ग आहेत त्या भागातून महामार्ग उभारला जात असताना वन्यजीवांचे मार्ग बंद होतात. अशावेळी वन्यजीवांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या घटना समोर येतात. वन्यजीवांचे अपघात होत असलेल्या ठिकाणी रस्ते रंदीकरण करत असताना त्यांना विनाअडथळा प्रवास करता यावा यासाठी पर्यायी मार्ग उभारण्याची गरज आहे. समृद्धी महामार्गात असा प्रयोग करण्यात आला. मात्र, इतर ठिकाणी तसे प्रयोग अजूनही झालेले नाही. वन्यजीवांच्या अपघाताची नोंद होत नसल्याने त्यांचे मार्ग बंद होऊन त्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वन्यजीवांच्या मार्गांचा आणि अपघात स्थळांचा अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : बेलसर-वाल्हा-लोणंद पासून भोर तालुक्यातून महाड जवळ कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग होऊ शकतो. तसे सर्वेक्षण करुन याबाबत निर्णय घ्यावा, असा एक मोठा पर्याय खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला सुचवला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा कोणताही रेल्वेमार्ग सध्या नाही. इतकेच नाही, तर कोकणातील विविध बंदरे आणि सागरी मार्गांवरील मालवाहतूक करण्यासाठी राज्याच्या पूर्व भागाला जोडणारा समर्पित असा रेल्वेमार्गही कोणता नाही. हे पाहता लोणंद पासून भोर मार्गे महाड मध्ये रेल्वे मार्ग झाल्यास या रेल्वेमार्गाचा पश्चिम महाराष्ट्रातील माल आणि प्रवासी वाहतूकीसाठी खूप मोठा फायदा होईल, असे खासदार सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शिवाय ही वाहतूक आर्थिक दृष्ट्याही स्वस्त होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित आहे. याचा परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी मोठा फायदा होणार असून यासाठी येथील दळणवळण व्यवस्था मजबूत आणि लोकांच्या सोयीची असणे आवश्यक आहे. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला कोकण रेल्वेशी जोडणारा रेल्वेमार्ग असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
असा मार्ग झाला तर पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी हे तालुके, खडकवासला विधानसभा मतदार संघ तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, वाई, माण आदी भागाबरोबरच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागाच्या औद्योगिक आणि इतर विकासाला चालना मिळू शकेल. हा मार्ग पुणे – मिरज – बंगळूर या मार्गाला देखील जोडता येईल. हा मार्ग अतिशय कमी अंतराचा असून तो जनतेच्या सोयीचा आहे. त्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण करुन याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.
या आधीही कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. कराड ते चिपळूण तसेच कोल्हापूर ते वैभववाडी लोहमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यापैकी कोल्हापूर ते वैभववाडी या लोहमार्गाला मंजुरी मिळाली आहे पण निधीअभावी त्याचे काम अजूनही चालू झाले नाही आहे.
Konkan Railway News :गाडी नंबर 12284 / 12283 H. Nizamuddin – Ernakulam Jn. – H. Nizamuddin Duronto Weekly Express या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. या गाडीचे स्लीपरचे ६ डबे एसी डब्यांमध्ये परावर्तीत केले जाणार आहे. ५ थर्ड एसी आणि १ सेकंड एसी डबे त्या जागी जोडले जाणार आहेत.
हा बदल दिनांक गाडी क्रमांक 12284 H. Nizamuddin – Ernakulam Jn या गाडीसाठी दिनांक 22 जुलै 2023 पासून तर 12283 H. Nizamuddin – Ernakulam Jn या गाडीसाठी दिनांक 25 जुलै 2023 पासून अंमलात आणला जाणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या गाडीला पनवेल आणि रत्नागिरी येथे थांबा आहे.
सिंधुदुर्ग | जिल्ह्यातील महिलांना स्वयंरोजगाराचा पर्याय निर्माण करून देऊन त्याचे आर्थिक सबलीकरण करण्यासाठी सिंधुदुर्ग बँकेने ‘अबोली ऑटो रिक्षा’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेबाबत मागील महिन्यात इच्छुक महिलांना पुढे येण्यासाठी आवाहन केले होते. या योजनेचा शुभारंभ उद्या शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता सौ. निलमताई राणे यांच्या हस्ते होणार आहे.
हा समारंभ जिल्हा बँकेचे प्रधान कार्यालय ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडला जाणार असून तेथे सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी ३ महिलांना अबोली रिक्षाचे वितरण करण्यात येणार आहे.
या योजनेच्या द्वारे महिला जिल्ह्यात पिंक ऑटो रिक्षा चालवताना दिसणार आहेत व त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीच्या व्याजदरात जिल्हा बँक अर्थसहाय्य करणार असून प्रशिक्षणासह, बॅच रिशा परमिटचा खर्च आमदार नितेश राणे स्वतः करणार आहेत जिल्हा बँकेने या योजनेसाठी ९% सवलतीच्या जाहीर केला असून किमतीच्या८५% कर्ज पुरवठा जिल्हा बँक करणार आहे उर्वरित १५ टक्के कर्ज पुरवठा हा पहिल्या येणाऱ्या पाच महिलांसाठी स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच, परमिट यासाठी लागणारा खर्च पहिल्या पाच महिलांसाठी आमदार नितेश राणे हे करणार आहेत.
जनमताचा कौल – सरकारने राज्यसरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी निवृत्तीयोजना पुन्हा लागू करावी का?