Author Archives: Kokanai Digital

संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या छायाचित्रांचा अपमानजनक वापर

   Follow us on        

हरियाणा: तमाम भारतीयांचे आदर स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नको त्या ठिकाणी लावून अपमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकरी (हरियाणा) येथील मिलन बॅन्केट हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा शौचालयाच्या दरवाज्यांवर लिंग-सूचक चिन्हांसोबत (HE/SHE) वापर केल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, लाखो लोकांनी याला ऐतिहासिक व्यक्तींचा आणि हिंदू आस्थेचा अपमान ठरवले आहे.व्हिडीओमध्ये दिसते की, पुरुष शौचालयाच्या दरवाज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महिला शौचालयावर महाराणी पद्मिनी यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मुघलांविरुद्ध लढणारे महान योद्धा म्हणून पूजले जातात, तर महाराणी पद्मिनी (पद्मावती) या चित्तोडच्या राजपूत राणी आणि धैर्य व बलिदानाच्या प्रतीक मानल्या जातात.

सोशल मीडियावर अनेकांनी याला “निष्काळजीपणा नव्हे, तर जाणीवपूर्वक अपमान” असे म्हटले आहे. काहींनी बॅन्केट हॉल व्यवस्थापनाकडून तात्काळ प्रतिमा काढून टाकणे, सार्वजनिकरीत्या माफी मागणे आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”हा केवळ चूक नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या भावनांवर प्रहार आहे,” असे एका युजर्सने म्हटले आहे.

अद्यापपर्यंत बॅन्केट हॉलच्या व्यवस्थापनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.ही घटना फतेहपूर सिकरी किंवा जवळच्या परिसरात असल्याचे काही पोस्टमध्ये नमूद केले जात असले तरी मुख्यतः हरियाणातील सिकरी येथे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे ऐतिहासिक व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी योग्य आदराने वापर व्हावा, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

 

कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गाचे हवाई सर्वेक्षण पूर्ण; स्थानके आणि बोगद्यांची ठिकाणे निश्चित करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात

   Follow us on        

कोल्हापूर: कोल्हापूर ते वैभववाडी या महत्त्वाच्या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी करण्यात आलेले हवाई सर्वेक्षण (एरियल सर्व्हे) पूर्ण झाले असून प्रकल्पाच्या पुढील कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधून हा रेल्वेमार्ग जाणार असल्याने अनेक मोठे बोगदे आणि उंच पूल उभारण्याचे मोठे आव्हान या प्रकल्पासमोर आहे. हवाई सर्वेक्षणातून मार्गाची अचूक आखणी, स्थानकांची संभाव्य ठिकाणे आणि बोगद्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे जमिनीवरून सर्वेक्षण करणे अवघड ठरत होते. त्यामुळे आधुनिक LiDAR तंत्रज्ञानाचा वापर करून हवाई सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून जमिनीची उंची, झाडे, अडथळे आणि भूभागाचे सविस्तर मॅपिंग करण्यात आले असून त्यामुळे रेल्वेमार्गाचे ‘अलाइन्मेंट’ निश्चित करणे अधिक सुलभ झाले आहे. अंतिम अहवालानंतर भू-संपादन प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर तसेच कर्नाटकातील काही भाग थेट कोकण रेल्वेशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत मोठी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. साखर, गूळ आणि इतर कृषी उत्पादनांची वाहतूक जलद गतीने बंदरांपर्यंत पोहोचू शकणार असल्याने औद्योगिक व आंतरराष्ट्रीय व्यापारालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रस्तावित मार्गामुळे बाजारभोगाव आणि शाहूवाडी परिसरात नवीन स्थानके उभारली जाण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या रेल्वेमार्गामुळे कोकण, दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक यांतील अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार असून पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे.

Konkan Railway: प्रीमियम सेवेचा बोजवारा! मडगाव–मुंबई तेजस एक्सप्रेस तब्बल ११ तास उशिरा

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या अडचणी काही केल्या संपण्याचे नाव घेत नाहीत. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता कोकणातील प्रीमियम समजल्या जाणाऱ्या २२१२० मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेसला बसला आहे. २१ फेब्रुवारी रोजी सुटलेली ही गाडी तब्बल १० तास ५७ मिनिटे (सुमारे ११ तास) उशिराने मुंबईत पोहोचली. विशेष म्हणजे, ही गाडी नियोजित CSMT टर्मिनसऐवजी दादर येथेच थांबवण्यात आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मडगाववरून सुटणारी ही हायस्पीड गाडी मूळ वेळेपेक्षा ६ तास ५५ मिनिटे उशिराने रवाना झाली होती. प्रवासादरम्यान हा उशीर वाढतच गेला आणि दादरला पोहोचेपर्यंत तो जवळपास ११ तासांवर गेला. प्रीमियम तिकीट दर मोजूनही प्रवाशांना रात्रभर स्थानकांवर आणि ट्रेनमध्ये ताटकळत राहावे लागल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ठराविक गाड्यांवर अन्यायाचा संशय

प्रवाशांनी आरोप केला आहे की, कोकण रेल्वे मार्गावरील काही ठराविक गाड्या वारंवार उशिराने धावत आहेत.

११०९९ कुर्ला–मडगाव एक्सप्रेस ही गाडी नियमितपणे रात्री १२.४५ वाजण्याऐवजी पहाटे ५ ते ६ वाजता सुटत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. दोन महिने आधी आरक्षण करूनही वेळेवर पोहोचण्याची खात्री उरलेली नसल्याने तळकोकणातील चाकरमान्यांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्न

कोकणातील प्रवाशांचे हाल होत असताना स्थानिक खासदार आणि आमदार गप्प का, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. “असा प्रकार इतर राज्यांत घडला असता, तर तेथील लोकप्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला असता,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

रेल्वे प्रशासनावर टीका

वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका होत आहे. ‘प्रीमियम सेवा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस एक्सप्रेसचीच अशी अवस्था असेल, तर इतर गाड्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोशल मीडियावरही रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याची आणि प्रवाशांचा मानसिक छळ सुरू असल्याची टीका होत आहे.

काही प्रवाशांनी तर वंदे भारत एक्सप्रेसला प्राधान्य देण्यासाठी तेजस वारंवार उशिराने चालवली जाते का? असा संशयही व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Mumbai Local: बंद दारांची नॉन एसी लोकल महिना अखेरपर्यंत ताफ्यात

   Follow us on        

मुंबई: मुंबई लोकलमध्ये होणारी गर्दी आणि दरवाज्यात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एसी लोकलप्रमाणेच आता स्वयंचलित बंद दरवाजे असलेली नॉन-एसी लोकल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. गेल्या वर्षी मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता, या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा नवा उपाय शोधण्यात आला आहे.

​मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल फेब्रुवारी अखेरीस चेन्नईच्या आयसीएफ (ICF) मधून मुंबईत दाखल होईल, तर दुसरी गाडी मार्च महिन्यात येण्याची शक्यता आहे. या गाड्यांची चाचणी यापूर्वीच कुर्ला कारशेडमध्ये यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, सुरुवातीला या लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण दरम्यान चालवल्या जाऊ शकतात.

​या निर्णयाचे स्वागत होत असले तरी, तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे धोकेही वर्तवले आहेत. वाहतूक तज्ज्ञ विवेक पै यांच्या मते, दरवाजे बंद असल्यामुळे प्रवासी फुटबोर्डवर उभे राहू शकणार नाहीत, ज्यामुळे अपघाती मृत्यू नक्कीच कमी होतील; मात्र मुंबईतील प्रचंड गर्दी पाहता डब्यांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. जर डब्यांमध्ये योग्य व्हेंटिलेशन किंवा हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसेल, तर प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू शकते. तसेच, जर तांत्रिक कारणामुळे दरवाजे बंद झाले नाहीत, तर रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने सर्व तांत्रिक बाजू आणि प्रवाशांची सोय विचारात घेणे गरजेचे आहे.

अखेर प्रतिक्षा संपली! मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा १ मार्चपासून सुरू; पहा पूर्ण वेळापत्रक आणि तिकीट दर.

   Follow us on        

मुंबई: कोकण किनारपट्टीवरील प्रवासाला अधिक वेगवान आणि सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्रालयाने ‘मुंबई ते विजयदुर्ग’ थेट रो-पॅक्स फेरी सेवा सुरू केली आहे. ‘M2M Princess’ या अत्याधुनिक जहाजाद्वारे ही सेवा पुरवली जाणार असून, यामुळे प्रवाशांना रस्ते मार्गाच्या त्रासातून सुटका मिळून आरामदायी समुद्र सफारीचा आनंद घेता येणार आहे.

​या फेरी सेवेचे उद्घाटन रविवार, १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता मुंबई (फेरी व्हार्फ) येथून होणार आहे.

​फेरीचे वेळापत्रक

​नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे:

​मुंबई ते विजयदुर्ग: प्रत्येक बुधवार आणि शनिवार सकाळी ८:०० वाजता.

​विजयदुर्ग ते मुंबई: प्रत्येक गुरुवार आणि रविवार दुपारी १२:०० वाजता.

​प्रवासी आणि वाहनांचे भाडे दर

​प्रवाशांच्या सोयीसाठी विविध श्रेणी आणि वाहनांसाठी वेगवेगळे दर आकारले जाणार आहेत:

१. प्रवासी वर्ग:

​इकोनॉमी: रु. ३,२००

​प्रीमियम इकोनॉमी: रु. ५,०००

​बिझनेस: रु. ७,०००

​फर्स्ट क्लास: रु. ९,०००

​२. वाहन दर (कार प्रकार):

​लहान (S): रु. ६,०००

​मध्यम (M): रु. ७,०००

​मोठी (L): रु. ८,०००

​अतिरिक्त मोठी (XL): रु. ९,०००

​दुचाकी (बाईक): रु. १,०००

​सायकल: रु. ६००

​टीप: बुकिंग आणि अधिक माहितीसाठी प्रवासी www.m2mferries.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

​कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक रहिवाशांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार असून, पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Railway Recruitment: पश्चिम रेल्वेकडून ५,१४९ अप्रेंटिस पदांसाठी भरती; अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू 

   Follow us on        

मुंबई: भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे (Western Railway) विभागात आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मुंबई यांनी २०२५-२६ या वर्षासाठी ५,१४९ apprentis उमेदवारांच्या अप्रेंटिस पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

​महत्त्वाचे तपशील:

​एकूण पदे: ५,१४९

​विभाग: मुंबई (BCT), वडोदरा, अहमदाबाद, राजकोट, भावनगर, रत्नागिरी आणि विविध कार्यशाळा (Workshops).

​प्रमुख पदे (Trades): फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पेंटर, स्टेनो आणि इतर.

​पात्रतेचे निकष:

​१. शैक्षणिक पात्रता: किमान ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI (NCVT/SCVT) प्रमाणपत्र आवश्यक.

२. वयोमर्यादा: २१ मार्च २०२६ रोजी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. (SC/ST उमेदवारांना ५ वर्षे, तर OBC उमेदवारांना ३ वर्षे वयात सवलत असेल).

​निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क:

​निवड पद्धत: या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. १० वीचे ५०% गुण आणि ITI मधील ५०% गुण यांच्या सरासरीवर आधारित गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल.

​अर्ज शुल्क: १०० रुपये (SC/ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे).

​अर्जाची मुदत आणि पद्धत:

​इच्छुक उमेदवारांनी https://www.rrc-wr.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

​अर्ज सुरू होण्याची तारीख: २१ फेब्रुवारी २०२६

​अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ मार्च २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत)

​विशेष टीप: रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारी (Apprentice) यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना भविष्यात रेल्वेच्या ‘लेव्हल १’ मधील कायमस्वरूपी भरतीमध्ये २०% जागा राखीव ठेवल्या जातात, ज्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

वारसा की भंगार? मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्याचा प्रयत्न फसतो आहे

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील मोटार बस सेवेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असतानाच, दक्षिण मुंबईतील जे.जे. उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या तीन नॉन-एसी डबल डेकर बसेसवरून नवा वाद उफाळून आला आहे. सन २०२१ मध्ये सुमारे ६९ लाख रुपये खर्च करून या बसेसचे रूपांतर कॅफे, ग्रंथालय आणि आर्ट गॅलरीमध्ये करण्यात आले होते. मात्र, आजच्या घडीला या बसेस कुलूपबंद असून त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. या स्थितीमुळे स्थानिक रहिवासी आणि बस प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​स्थानिक रहिवाशांच्या मते, या बसेसमुळे परिसरातील पार्किंगमध्ये अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर आणीबाणीच्या काळात रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांना जाण्यासाठी लागणारा रस्ताही या बसेसमुळे रोखला जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. दुसरीकडे, बस प्रेमी आणि इतिहासकारांनी या बसेसच्या दुरवस्थेवर बोट ठेवले आहे. चुकीचा रंग आणि निकृष्ट दर्जाच्या दुरुस्तीमुळे या बसेसचे ऐतिहासिक मूल्य नष्ट झाले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही उत्साही नागरिकांनी तर या बसेस विकत घेऊन त्या पुन्हा पर्यटन मार्गावर चालवण्याची तयारी दर्शवली आहे. एकीकडे ऐतिहासिक वारसा जतन करण्याची ओढ आणि दुसरीकडे व्यावहारिक अडचणी, अशा कात्रीत या ऐतिहासिक बसेस सध्या अडकल्या आहेत.

PC: Sayyed Sameer Abedi

 

 

लोकल गाड्यांमध्ये होणाऱ्या गर्दीवर उपाय! दोन मेट्रो मार्गांचा अंबरनाथ- बदलापूरपर्यत विस्तार होणार

   Follow us on        

अंबरनाथ: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि पायाभूत सुविधांसाठी तब्बल ४,८९७.१९ कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सादर झालेल्या या अर्थसंकल्पात मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो मार्ग १४ (कांजूरमार्ग-बदलापूर) या प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या निर्णयामुळे कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील लाखो नागरिकांना मुंबईशी थेट, वेगवान आणि आरामदायी कनेक्टिव्हिटी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मेट्रो मार्ग ५ अंतर्गत ठाणे ते भिवंडी ते कल्याण असा २४.९ किमी लांबीचा आणि १५ स्थानकांचा मूळ मार्ग असून, त्याचा विस्तार कल्याणहून दुर्गाडी, उल्हासनगर, अंबरनाथ (मेट्रो ५अ) पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो ५ साठी १,३०९.३० कोटी रुपये तर मेट्रो ५अ साठी १८३.३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या विस्तारामुळे अंबरनाथ शहर थेट मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार असून, उल्हासनगरमार्गे चिखलोलीपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. परिणामी, लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दीतून सुटका होऊन नागरिकांना वातानुकूलित मेट्रोमधून सुखकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मेट्रो मार्ग १४ हा कांजूरमार्ग ते बदलापूर दरम्यान सुमारे ३८ ते ४५ किमी लांबीचा प्रस्तावित मार्ग असून तो देशातील सर्वात लांब मेट्रो मार्गांपैकी एक ठरणार आहे. या मार्गावर कांजूरमार्ग, विक्रोळी, शिळफाटा, महापे, घणसोली, ऐरोली, तुर्भे, दिघा, अंबरनाथ आणि बदलापूर अशी महत्त्वाची स्थानके असणार आहेत. या प्रकल्पासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काटई नाका ते बदलापूरपर्यंतचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार असून, या मार्गामुळे बदलापूर आणि अंबरनाथला मुंबईच्या पूर्व उपनगरांशी थेट जोडणी मिळेल. सध्या रस्त्याने १.५ ते २ तास लागणारा प्रवास केवळ ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे कर्जत-कसारा लोकलमधील गर्दी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रवास वेळेत ३० ते ४० टक्क्यांनी घट होऊ शकते. मध्यमवर्गीय चाकरमान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार असून, रोजच्या प्रवासासाठी एसी मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच बदलापूरच्या निसर्गरम्य परिसरात आणि अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक वाढून रिअल इस्टेट आणि स्थानिक उद्योगांना चालना मिळेल.

हे सर्व प्रकल्प २०३० पर्यंत पूर्णत्वास जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकार आणि MMRDA च्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कल्याण-डोंबिवली-अंबरनाथ-बदलापूर पट्ट्यातील विकासाला नवी गती मिळणार असून, मुंबई महानगर प्रदेश अधिक सुसंगत, आधुनिक आणि वेगवान होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

Railway Updates: ‘बोर्डिंग पॉईंट’ बदलण्याच्या नियमांत बदल होण्याची शक्यता

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवासाचे मुख्य स्टेशन म्हणजेच ‘बोर्डिंग पॉईंट’ बदलण्याच्या नियमात मोठी सवलत देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मांडला आहे.

सध्याच्या नियमानुसार, प्रवाशांना केवळ पहिल्या आरक्षण चार्टची (First Reservation Chart) तयारी होईपर्यंतच आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, आता हा बदल दुसऱ्या आरक्षण चार्टची (Second Reservation Chart) तयारी होईपर्यंत करण्याची परवानगी देण्याबाबत रेल्वे बोर्डाने ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम’ (CRIS) कडे तांत्रिक व्यवहार्यतेची विचारणा केली आहे.

​रेल्वे बोर्डाचे संचालक संजय मनोचा यांनी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रवाशांना अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी हा प्रस्ताव विचाराधीन आहे. जर या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली, तर प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या साधारण ३० मिनिटे आधीपर्यंत (दुसरा चार्ट तयार होईपर्यंत) आपले बोर्डिंग स्टेशन बदलता येईल. वंदे भारत सारख्या वेगवान गाड्यांच्या बाबतीत ही वेळ मर्यादा १५ मिनिटे असू शकते. सध्या पहिला चार्ट गाडी सुटण्याच्या १० ते २० तास आधी तयार केला जात असल्याने प्रवाशांना ऐनवेळी स्टेशन बदलण्यात अडचणी येतात. नवीन बदल लागू झाल्यास ऐनवेळी प्रवास नियोजन बदलणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

धक्कादायक! NCERT च्या अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशाच गायब..

   Follow us on        

नवी दिल्ली: एनसीईआरटीने इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात असलेला 1759 सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला असून राजस्थानमधील राजपूत घराण्यांच्या दबावाखाली एनसीईआरटीने हा खोडसाळपणा केल्याचा आरोप नागपूरकर भोसले राजघराण्याचे वर्तमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी केला आहे.

ऐन शिवजयंती दिवशीच मुधोजीराजांनी एनसीईआरटीने केलेला खोडसाळपणा उघडकीस आणल्यामुळे आता नव्या वादळाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुस्तकातून हटवलेला 1759 सालच्या मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा पुस्तकात पुन्हा प्रकाशित करण्याची मागणी मुधोजीराजांनी नागपुरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलताना केली आहे.

​NCERT च्या पाठ्यपुस्तकात १७५९ सालातील मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट होता. या नकाशामध्ये उत्तरेत पेशावर (आजचे पाकिस्तान) पासून ते दक्षिणेत तंजावरपर्यंत मराठ्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसत होते. ‘अटक ते कटक’ असा हा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांच्या मनातून पुसून टाकण्याचा हा राजकीय कट असल्याचा आरोप मराठा इतिहासप्रेमींकडून केला जात आहे.

​RTI मधून झालेला धक्कादायक खुलासा

​या प्रकरणावर माहितीच्या अधिकाराखाली (RTI) प्रश्न विचारण्यात आले होते की, हा नकाशा हटवण्यासाठी कोणते ऐतिहासिक पुरावे वापरले किंवा कोणत्या तज्ज्ञांनी हा सल्ला दिला? यावर उत्तर देताना NCERT ने म्हटले आहे की, “यासंबंधीची कोणतीही माहिती किंवा कागदपत्रे त्यांच्या फाईल्समध्ये उपलब्ध नाहीत.” कोणत्याही पुराव्याशिवाय हा नकाशा का हटवला गेला, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

​या प्रकरणातील आरोपांचे स्वरूप अत्यंत गंभीर असून प्रामुख्याने दबावाचे राजकारण आणि हेतुपुरस्सर दुर्लक्ष यांवर बोट ठेवण्यात आले आहे. आंदोलकांचा असा दावा आहे की, काही तक्रारदार गट आणि तथाकथित राजघराण्यांच्या राजकीय दबावाला बळी पडून NCERT ने मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा हा चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यातच, ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनानंतर NCERT च्या समितीवर एकाही तज्ज्ञ मराठा इतिहासकाराची नियुक्ती करण्यात आली नाही, ज्यामुळे समितीमध्ये इतर प्रादेशिक लॉबींचा प्रभाव वाढला आणि मराठा इतिहासाला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरू झाले, असा आरोप केला जात आहे. हा केवळ तांत्रिक किंवा शैक्षणिक बदल नसून, मराठ्यांनी संपूर्ण भारतावर मिळवलेले प्रभुत्व विद्यार्थ्यांच्या स्मृतीतून पुसून टाकण्याचा आणि पर्यायाने मराठा अस्मितेवर घाला घालण्याचा हा एक मोठा राजकीय कट असल्याचे अभ्यासकांचे आणि इतिहासप्रेमींचे म्हणणे आहे.

​या निर्णयाच्या विरोधात समाज माध्यमांवर #SaveMarathaHistory ही मोहीम जोरात सुरू झाली आहे. खासकरून मराठी एकीकरण समितीने यावर मोठा आक्षेप घेतला आहे. मराठा साम्राज्याने देशाला परकीय आक्रमकांपासून वाचवले, तोच इतिहास पाठ्यपुस्तकातून गायब करणे हे ऐतिहासिक सत्याचा अपलाप करणारे आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.

NCERT ने हा नकाशा पुन्हा समाविष्ट करावा आणि इतिहासाची छेडछाड थांबवावी, अशी मागणी इतिहासप्रेमी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search