हंगामाच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना राज्य परिवहन विभागाने इशारा दिला आहे. नेहमीच्या भाड्यापेक्षा दीडपट किंवा दुप्पट प्रवास भाडे आकारत आहे अशी तक्रार आल्यास त्या व्यावसायिकावर कठोर कारवाई केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात गावी खूप मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जातो. रेल्वे आणि ST बससेवा आपल्या विशेष फेर्या ह्या काळात सोडतात. पण त्या अपुऱ्या पडतात त्यामुळे चाकरमानी खाजगी ट्रॅव्हल्स चा पर्याय निवडतात. ह्या मजबुरीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक घेतात आणि दुप्पट भाडे आकारतात असे निदर्शनास आले आहे. ह्या काळात 700/800 असणारे प्रवासभाडे 1500/2000 च्या घरात जाते आणि ह्याचा फटका चाकरमान्यांचा खिशाला बसतो.
असे प्रकार आढळल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.