Category Archives: कोकण
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीकच्या माभळे येथील शासकीय विश्रामगृहाजवळ वृक्षतोड सुरू आहे. याची वनविभागाने चौकशी करावी, अशी मागणी येथील वनप्रेमींनी केली आहे.
महामार्गावरील माभळे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वनविभागाकडे पर्यावरणप्रेमींनी तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली तसेच ती झाडे जप्तही केली होती. त्यानंतर पुन्हा झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अवैध असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भारतीय रेल्वे माहिती किंवा सुचना प्रसिद्धसाठी सोशल मीडिया चा मोठ्या प्रमाणात वापर करते. त्यात फेसबुक, ट्विटर ही माध्यमे वापरली जातात. त्याचबरोबर रेल्वेचा प्रत्येक विभाग स्वतःचे अधिकृत संकेतस्थळ याकरिता वापरते. या माध्यमातून रेल्वे संबधित माहिती उदा. मेगाब्लॉक, विशेष गाड्यांची घोषणा आणि ईतर माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवते. कोकण रेल्वे सुध्दा या माध्यमातून ही माहिती आपल्या प्रवाशांना देते. मात्र कोकणरेल्वे वर विशेष गाड्यां संबधित होणार्या घोषणा उशिराने होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. कोकण रेल्वे माहिती प्रसिद्ध करेपर्यंत विशेष गाड्यांचे आरक्षणही चालू होऊन फुल्ल झालेले असते.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर काल कोकण रेल्वेने आपल्या संकेतस्थळावर आणि समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या वास्को द गामा – मुझफ्फरपूर 07309/07310 विशेष गाडीच्या प्रसिद्धी पत्रकाचे (Press Note) चे देता येईल. या विशेष गाडीच्या फेर्या दिनांक 17 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने या गाडीचे प्रसिद्धीपत्रक अगदी एक दिवस आधी म्हणजे 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे. तोपर्यंत या गाडीचे आरक्षण फुल होऊन प्रतीक्षायादी खूपच वर पर्यंत जावून पोचली आहे. कोकणच्या प्रवाशांना या गाडीची कल्पना नसल्याने या गाडीचा फायदा उत्तरप्रदेश तसेच पाश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना झाला आहे.
ही गोष्ट पहिल्यांदाच झाले असे नाही. असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. पाश्चिम आणि मध्य रेल्वे ज्या विशेष गाड्या चालवते त्या गाड्यांची माहिती कोकण रेल्वे योग्य वेळेत आपल्या प्रवाशांपर्यत का पोहोचवत नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाला या गाड्यांची कल्पना नसते असे होऊच शकत नाही. कारण कोणतीही विशेष गाडी चालविण्यासाठी त्या योजनेत संबधित विभागाला सामील करून घेऊनच विशेष गाडी सोडण्यात येते. तर मग यामागचे कारण काय? प्रवाशांच्या सेवेपेक्षा आर्थिक फायदा बघून रेल्वे असे जाणूनबुजून तर करत नाही ना? अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
अर्धवट माहिती का?
कित्येकदा रेल्वे प्रशासन विशेष गाड्यांची घोषणा तर करते मात्र आरक्षणाची तारीख जाहीर करत नाही. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होतो. विशेष गाड्यांची माहिती प्रसिद्ध करताना त्यासोबत आरक्षणाची तारीख ही जाहीर करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती वाढली आहे.
आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.
मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे. 20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.
कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सिंधुदुर्ग, १५ एप्रिल :देहदान व अवयवदान यातील मूलभूत फरक समजून घेणं गरजेचं आहे. देहदान नैसर्गिक मृत्यू नंतर करता येते. त्यासाठी मृत्य व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची इच्छा असल्यास संपूर्ण देह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरिरशास्त्र विभागाच्या ताब्यात स्वतः नातेवाईक यांनी दान करावा लागतो. त्यापुर्वी दोन्ही डोळ्यांचे नेत्रपटल म्हणजे डोळ्यावरची पारदर्शक काच व त्वचा दान करता येते. पण त्या साठी प्रशिक्षित तज्ञांची टीम घरी किंवा दवाखान्यात नेऊन नेत्र व त्वचादान स्विकारतात पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सध्या तरी नेत्र व त्वचापेढी नसल्याचे आपल्या जिल्ह्यातील व्यक्ती यांना नेत्र व त्वचादाना साठी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गाठावे लागले . पण वेळेअभावी या गोष्टी अशक्य आहेत. नेत्र व त्वचा शिवाय हाडं, अस्तिमज्जा, हृदयाची झडपा, मज्जा पेशी, रक्तवाहिन्या इतकेच नाही तर शरिराचे हात, पाय व डोक्यावरील केस पण दान करुन सुमारे पन्नास रुग्णांना एक मृत व्यक्ती व्याधी मुक्त करू शकतो.
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान स्विकारण्याची सोय करण्यात आलेली असून मृत व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांची ईच्छा असल्यास व्यक्तीच्या मृत्यूनंतर देह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शरिरशास्त्र विभागात स्विकारण्याची सोय केलेली आहे अशी माहिती जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अवयव व देहदान महासंघचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. संजीव लिंगवत यांनी कळविले आहे.
अलीकडेच त्यांनी सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज जोशी व शरिरशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता थेटे यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली. मृत्यू समयी एडस्,कोरोना, कर्करोग सारखा महाभयंकर रोग असल्यास किंवा मृत्यू आत्महत्या, विषप्राशन, गळफास घेऊन झाल्यास अश्या व्यक्तींना देहदान, नेत्रदान, त्वचा दान करता येतं नाही. ईश्वराने शरिराचा कोणताही भाग टाकाऊ बनविला नाही, फक्त आपल्या अज्ञानामुळे आपण शरिर जाळुन टाकतो किंवा मातीत मिसळतो, भारतीय समाज सामाजिक, धार्मिक अंधश्रद्धांच्या परंपरागत गैरसमजुतीं मध्ये अडकुन बसलेला असुन काळानुसार यात बदल घडवून आणणे आवश्यक आहे. कालानुरूप सती जाणं , स्त्री शिक्षण, बालविवाह सारख्या बाबतीत बदल झाले असून देहदान बाबतीत सुद्धा हे बदल हळूहळू होतील अशी आशाही डॉ. संजीव लिंगवत यांनी व्यक्त केली.