Category Archives: कोकण

Konkan Railway: स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीसाठी मुंबई-सावंतवाडी विशेष गाड्या चालविण्यात याव्यात

   Follow us on        

मुंबई, ३० जुलै २०२५: येत्या १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या लांब सुट्टीच्या पार्श्वभूमीवर, कोकणमार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते सावंतवाडी मार्गावर विशेष गाड्या चालवाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कडून करण्यात आली आहे.

मुंबई–कोकण दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, वंदे भारत, तेजस, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस यांसारख्या सर्व गाड्यांचे आरक्षण या काळात प्रचंड गर्दीमुळे प्रतीक्षा यादी अथवा “नो रूम” (REGRET) दाखवत आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वेळेवर अतिरिक्त गाड्यांची घोषणा झाली नाही, तर पनवेल, ठाणे, दादर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याआधीही अशा लांब सुट्ट्यांमध्ये अपुरी रेल्वे व्यवस्था असल्याने रेल्वेरोको, दगडफेक आणि प्रवाशांना आरक्षित तिकीट असूनही चढता न आल्याच्या घटना घडल्या आहेत.

याआधीही प्रवाशांकडून अनेक वेळा विशेष गाड्यांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे यंदाच्या लांब सुट्टीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी रोड आणि बांद्रा टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्यांची तातडीने घोषणा करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.

विशेष गाड्या न सोडल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ई-मेल निवेदनाद्वारे समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

 

कोकण रेल्वेची भरती – २०२५: सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतील पदांसाठी थेट मुलाखती

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागात कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली असून, जम्मू-काश्मीरमधील कटरा ते बनिहाल दरम्यानच्या युएसबीआरएल प्रकल्पासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण २८ पदांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पदांमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (JTA) साठी ४ जागा आणि टेक्निशियन पदासाठी २४ जागांचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांना पाच वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार असून कामकाज समाधानकारक राहिल्यास कालावधी वाढविण्याचा अधिकार कोकण रेल्वेकडे राहील. JTA पदासाठी पात्र उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, IT किंवा संगणक शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेमधील सिग्नल प्रणालीत किमान एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. टेक्निशियन पदासाठी ITI, B.Sc. किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक असून अनुभव नसलेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

JTA पदासाठी मासिक एकूण वेतन ₹४३,३८०/- इतके असेल, तर टेक्निशियनसाठी ₹३७,५००/- इतके वेतन ठरविण्यात आले आहे. त्याशिवाय नियुक्त उमेदवारांना विमा संरक्षण, आरोग्य विमा भत्ता, रेल्वे पास, विश्रांतीगृह, प्रवास भत्ता, सुट्ट्या यांसारख्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

JTA पदासाठी मुलाखत ५ ऑगस्ट २०२५ रोजी, तर टेक्निशियन पदासाठी ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही मुलाखती सकाळी ९ ते १२ दरम्यान नोंदणीसह जम्मूतील त्रिन्ठा, ग्रानमोर येथील कोकण रेल्वेच्या प्रकल्प कार्यालयात पार पडतील. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि स्वमोसताखत प्रतिंसह अर्जाचा नमुना भरून आणणे बंधनकारक आहे.

ही संधी केवळ तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून, कंत्राटी स्वरूपाची असल्याने उमेदवारांनी सर्व अटी व नियम समजून घेऊनच अर्ज करावा. या भरतीबाबत अधिक माहिती व अर्ज नमुना कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.konkanrailway.com उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेच्या या भरतीमुळे तांत्रिक क्षेत्रातील तरुणांना उत्तम संधी उपलब्ध होणार असून जम्मू-काश्मीरमधील प्रकल्पावर कार्य करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

सावंतवाडी स्थानकात गाड्यांच्या थांब्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड (ZBTT) रेल्वे स्थानकात पुन्हा गाड्यांचे थांबे सुरु करण्यात यावे, तसेच काही नव्या गाड्यांनाही थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यांनी १७ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ महामारीपूर्वी १२२०१/१२२०२ (एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस) आणि १२४३४/१२४३१ (ह. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम एक्सप्रेस) या गाड्यांचा सावंतवाडी स्थानकात नियमित थांबा होता. या थांब्यांमुळे स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होत असे. मात्र, या थांब्यांच्या बंदीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचबरोबर १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) या गाडीला देखील सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात, कोकणात हजारो लोक प्रवास करतात आणि थांबा नसल्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयाकडे पुढील मागण्या मांडल्या आहेत:

  • गाडी क्र. १२२०१/१२२०२ आणि १२४३४/१२४३१ साठी सावंतवाडी येथे पुन्हा थांबा सुरू करावा

  • गाडी क्र. १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) साठी  सावंतवाडी येथे नवीन थांबा मंजूर करावा

या थांब्यामुळे स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होतील आणि संपूर्ण कोकण परिसरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘शिवसेना एक्सप्रेस’

   Follow us on        

मुंबई, दि. २९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाने मोफत विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असून, या सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना वेळेवर आणि विनाखर्च आपल्या गावी गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. मात्र ही मोफत सेवा फक्त पूर्वनियोजित बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

 

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८९६९६६ किंवा ९६६५२७०२३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सव २०२५ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाला अधिक सुलभ व आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या विशेषतः गणेशभक्त, सुट्टीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि गावाकडची वाट धरू इच्छिणाऱ्यांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि त्यांना सुट्टीचा आनंद अधिक निर्बंधांशिवाय घेता येईल.

या विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग व थांबे यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१) क्रमांक ०११३१ / ०११३२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (आठवड्यातून दोनदा): 

गाडी क्रमांक ०११३१ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (आठवड्यातून दोनदा) २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी २२:२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (द्वि-साप्ताहिक) सावंतवाडी रोडवरून २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी २३:२० वाजता सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी १२:३० वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २२ कोच = ३ टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०६ कोच, एसएलआर – ०२.

२) ट्रेन क्रमांक ०११३३ / ०११३४ दिवा जंक्शन – खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक): 

गाडी क्रमांक ०११३३ दिवा जंक्शन – खेड मेमू स्पेशल (दैनिक) २२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५ पर्यंत दररोज दिवा जंक्शन येथून दुपारी १:४० वाजता सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री २०:०० वाजता खेड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३४ खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक) २३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५ पर्यंत दररोज सकाळी ८:०० वाजता खेड येथून निघेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:०० वाजता दिवा जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी निलजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे,दिवाणखवती,कळंबणी बुद्रुक,येथे थांबेल.

रचना : एकूण 08 मेमू कोच.

३) गाडी क्रमांक ०१००४ / ०१००३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष: )

गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष (दैनिक) दर रविवारी म्हणजे २४/०८/२०२५, ३१/०८/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून दर सोमवारी म्हणजेच २५/०८/२०२५, ०१/०९/२०२५ आणि ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

थांबे – करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

या गाड्यांसाठी आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरच त्याची ती जाहीर करण्यात येणार आहे.

कोकणातील नागपंचमी: सर्पपूजेचा श्रद्धेचा सण

   Follow us on        

भारताची संस्कृती ही निसर्गपूजेवर आधारित आहे आणि विविध जीवसृष्टीशी सहअस्तित्वाचा संदेश देणारे सण आपण साजरे करतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी, विशेषतः कोकणातील नागपंचमी ही पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक श्रद्धेची सुंदर अभिव्यक्ती आहे.

नागपंचमीचा पारंपरिक संदर्भ

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यामागे प्राचीन आख्यायिका, धार्मिक कथा आणि लोकसाहित्य आहेत. पुराणानुसार, या दिवशी शेषनागाची पूजा केल्यास भय, रोग, संकट टळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. कोकणात नागदेवतेबद्दल विशेष श्रद्धा असून घराघरांतून या दिवशी सर्पपूजा केली जाते.

कोकणातील सण साजरा करण्याची वैशिष्ट्ये

कोकणातील नागपंचमीची पूजा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली जाते:

नागपंचमीला घरोघरी नागदेवतेच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूर्वी घरोघरी स्त्रिया नदीकाठची किंवा विशिष्ट मऊ माती घेऊन नागदेवतेच्या मूर्ती स्वतः तयार करत असत. आता या मूर्ती बाजारात उपलब्ध होत आहेत. या मूर्ती घराच्या पूजास्थानी ठेवून त्यांची विधिपूर्वक पूजा होते. नागदेवतेला दूध, फळे, लाह्या, नारळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. साखर घालून केलेले दूध सर्पांना अर्पण करणे ही श्रद्धेची खूण मानली जाते. काही घरांमध्ये हळद-कुंकवाने किंवा शाडूने भिंतीवर किंवा उंबरठ्यावर नागाचे चित्र रंगवले जाते. हे चित्र संकटांपासून रक्षण करणारे मानले जाते.

कोकणात जंगल आणि शेतीशी नाते असल्याने सर्पांशी अनेक वेळा थेट सामना होतो. त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण सहअस्तित्व राखण्याचा संदेश या सणातून मिळतो.

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्व

नागपंचमीचा सण हा केवळ धार्मिकच नव्हे, तर पर्यावरणीय जागृतीचा संदेशही देतो. सापांचा परिसंस्थेतील महत्त्वाचा सहभाग असून त्यांचं अस्तित्व शेती आणि निसर्गासाठी आवश्यक आहे. सर्पांना न मारता त्यांना वाचवण्याचा संदेश नागपंचमी देतो.

कोकणातील नागपंचमी हा केवळ एक सण नाही, तर निसर्गाशी नातं जोडणारा, सजीव सृष्टीविषयी आदर निर्माण करणारा आणि पारंपरिक श्रद्धा जपणारा एक संस्कृतिक पर्व आहे. मातीतून मूर्ती बनवणं, नैवेद्य अर्पण करणं, सहअस्तित्वाचा विचार – हे सर्व कोकणातील जीवनपद्धतीचं प्रतिबिंब आहे.

पेंडूर येथे २० फूट लांबीचा महाकाय अजगर आढळल्याने खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

   Follow us on        

पेंडूर (ता. मालवण) – मालवण तालुक्यातील कट्टा-नेरुरपार मार्गे कुडाळ येथे जाणाऱ्या हमरस्त्यावर, पेंडूर गावाच्या हद्दीत सुमारे १५ ते २० फूट लांबीचा एक महाकाय अजगर रस्ता ओलांडताना दिसून आला. रस्त्याने जात असलेल्या गावातील वाहनचालक व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तींनी हा अजगर प्रत्यक्ष पाहिला असून, त्यातील एका युवकाने हा क्षण मोबाईलमध्ये चित्रीत केला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या महाकाय सापाचे पहिल्यांदाच दर्शन झाल्यामुळे गावातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “कधी हा अजगर गुरांना गिळंकृत करेल की काय?” अशी काळजी शेतकऱ्यांच्या मनात आहे.

गावाच्या एका बाजूने वाहणारी कर्ली नदी, तसेच आजूबाजूच्या निसर्गसंपन्न भागामुळे यापूर्वी देखील वन्य प्राणी आढळले आहेत. काही वर्षांपूर्वी, एक भली मोठी मगर पेंडूर तलावात सापडली होती. ती स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या मदतीने पकडून पुन्हा नदीत सोडली होती.

   

याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांची मागणी आहे की, या अजगरालाही तात्काळ पकडून जंगलात सोडावे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या गुरांना किंवा इतर जनावरांना धोका पोहोचणार नाही.

पेंडूर ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाकडून वनविभागाकडे या संदर्भात तात्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात येत आहे.

Kudal: कुडाळ आगारात टेलिफोन आणि एस टी फेऱ्यांचा सावळा गोंधळ

   Follow us on        

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आगाराला जो सावळा गोंधळ चालू आहे तो त्वरीत थांबवावा आणि कायम स्वरुपी नवीन चालू दूरध्वनी देण्याची व्यवस्था करावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. प्रासीद्धिस दिलेल्या पत्रकात बापर्डेकर म्हणाले की कुडाळ डेपोचा कोरोना काळापासून दूरध्वनी नव्हता तो आजमितीस सुस्थितीत नाही. अधून मधुन तिघांचे मोबाईल नंबर बाहेर पेपर फलकावर लावलेले परंतु तो ज्या आधीकारि वर्ग अगर विभाग नियंत्रक,वाहतूक नियंत्रकजवळ असतो ते कधीच फोन उचलत नाही . रिंग वाजून जाते . मुंबई हून कुडाळ रेल्वे स्टेशनला येण्यापूर्वी अगर स्टेशनला आल्यावर अगर मालवाहून कुडाळला जायचं असेल मग स्वतःचा फोन असुदे की इतरांच्या फोन वरून केव्हाही मालवण एस टी बस संबंधी विचारपूस करिता फोन केला तर त्याठिकाणी उपस्थित आणि ज्यांच्याजवळ आहे ते रिंग वाजली तरी फोन उचलत नाही अशावेळी दमून भागून आलेल्या प्रवाशांनी करावं तरी काय .खाजगी वाहन की रिक्षेला भरमसाठ पैसे देऊन प्रवास करावा की कमी पैशात एस टी महामंडळाने प्रवास करण्यास ताटकळत रेल्वे स्टेशनला किंवा मालवण राहावे? असा प्रश्न या पत्रकात विचारला आहे.

मालवण आगार व्यवस्थापनाला मानाव लागतं ते मालवण आगाराच्या सर्व अधिकारी ,कर्मचारी यांना कारण त्यांचा कोरोना काळापासून दूरध्वनी आणि वाहतूक काही अपवाद वगळता आजपर्यंत बंद नाही.वाहतूकही कुडाळ ची बंद नाही.कुडाळला विचारले तर त्याचं एकच उत्तर मालवणवाल्याच आम्हाला काही विचारू नका ती आली तर सोडू परंतु कित्येकवेळा रेल्वे स्टेशनला न जाता कुडाळ आगारातूंनच बस वळविली जाते.याला जबाबदार कोण? याचे मूळ कारण कुडाळ आगाराला वाली नाही त्याचे बाप हे वर्क शॉप ठिकाणी बसतात तक्रार घेऊन दूरवर त्यांच्या पर्यंत जाणे कोणत्याही प्रवाशांना शक्य नाही.कुडाळ मालवण कुडाळ एस टी फेऱ्याना प्रवाशांन बरोबर शाळा ,कॉलेज विद्यार्थी तर कित्येक वेळा सरकारी कर्मचारी असतात मग अचानक एखादी गाडी रद्द करणे कारण नसताना उशिरा एस टी सोडणे प्रवाशांसोबत पर्यटक इतरांना कितपत परवडणार याची माहिती संबंधित अधिकारी यांनी द्यावी .प्रवाशांनी लेखी तक्रार पुस्तकात तक्रार केली तर त्याच निरसन होत नाही.याला जबाबदार कोण आहेत. तरी येत्या पंधरा दिवसांत आगार व्यवस्थापक आणि आगार प्रमुख तसेच दूरध्वनी यांची व्यवस्था कायमस्वरूपी डेपोला ज्याठिकांनाहून जिल्ह्यातील बस सोडल्या जातात त्याठिकाणी करावी.अन्यथा आंदोलन करावे लागेल याची सूचना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे सुरेश बापर्डेकर यांनी दिली आहे

   

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडीच्या स्लीपर डब्यांत कायमस्वरूपी वाढ

   Follow us on        

Railway Updates: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून ह. निजामुद्दीन (दिल्ली) ते एर्नाकुलम (केरळ) दरम्यान चालणाऱ्या ‘दुरंतो एक्सप्रेस’ (गाडी क्रमांक १२२८४ / १२२८३) मध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त डब्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

लांब पल्ल्याची ही गाडी साप्ताहिक स्वरूपात धावत कोकण रेल्वे मार्गे जाते. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि मागणी लक्षात घेता, डब्यांची रचना पुढीलप्रमाणे बदलण्यात येत आहे:

 

   

सध्याची कोच रचना (एकूण १९ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०३
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१

सुधारित कोच रचना (एकूण २२ LHB डबे):
फर्स्ट एसी (1A) – ०१
सेकंड एसी (2A) – ०२
थर्ड एसी (3A) – १०
स्लीपर क्लास – ०६ (पूर्वीपेक्षा ३ डब्यांनी वाढ)
पँट्री कार – ०१
जनरेटर कार – ०१
एसएलआर – ०१

यामुळे प्रवाशांना विशेषतः स्लीपर प्रवर्गात अधिक जागा उपलब्ध होणार आहे.

सुधारित कोच रचना लागू होण्याच्या तारखा:
गाडी क्र. १२२८४ (ह. निजामुद्दीन – एर्नाकुलम) : दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ पासून
गाडी क्र. १२२८३ (एर्नाकुलम – ह. निजामुद्दीन) : दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून

गाडीच्या मार्गातील थांबे, वेळापत्रक आणि इतर तपशीलांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES (National Train Enquiry System) मोबाईल अ‍ॅप डाउनलोड करा. प्रवाशांनी याबदलांची नोंद घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Weather Updates: पुढील २४ तास महत्त्वाचे! मुंबईसह कोकणातील किनारपट्टी जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी

   Follow us on        

Weather Update: पुढील २४ तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट भागात रेड अलर्ट दिला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.

किनारपट्टी भागात उंच लाटांचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS) यांच्याकडून महाराष्ट्रातील विविध किनारपट्टी जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार, २४ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजल्यापासून ते २६ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वाजेपर्यंत समुद्रात लाटांची उंची सुमारे ३.८ मीटर ते ४.७ मीटर पर्यंत असू शकते.

हा इशारा विशेषतः ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील किनारपट्टी भागांसाठी लागू आहे. समुद्रात निर्माण होणाऱ्या उंच लाटा आणि संभाव्य वादळवाऱ्यांमुळे समुद्र परिस्थिती अतिशय अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे, लहान होड्यांचे मालक, मासेमारी करणारे आणि किनारपट्टीवरील रहिवासी यांना खबरदारीचे उपाय घेण्याचे आणि या कालावधीत समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडूनही स्थानिक पातळीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, समुद्र किनारी जाणाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search